Rashtra Sevika Samiti

महिलांचे राष्ट्रीय विचारांनी प्रेरित कार्य

संपूर्ण समाजाला सुखी आणि बलशाली करून भारताला परमवैभवाच्या शिखरापर्यंत नेण्याचा विराट संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी स्थापना झाली. संघाचा विस्तार होत गेला आणि त्याचा महिलांच्या मनावरही प्रभाव पडू लागला. आत्मसंरक्षणाची क्षमता महिलांमध्ये कशी येईल? त्यांचे जीवन स्वावलंबी कसे होईल? त्याचे आत्मबल कोणत्या मार्गाने जागृत होईल? अशा अनेक प्रश्नांचे चिंतन लक्ष्मीबाई केळकर करीत असत. त्यांनी संघाच्या शिस्तबद्ध शाखा पाहिल्या. या शाखांच्या माध्यमातून मुलांमध्ये होणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाची अनुभूती घेतली. याच मार्गाने मार्गक्रमण केले तर महिलांसाठी जे कार्य आपण करू इच्छित आहोत, त्यालाही दिशा मिळेल, असे त्यांना वाटले. याच अपेक्षेने लक्ष्मीबाई केळकर यांनी संघसंस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवार यांची भेट घेतली.

संघाच्या शाखांमध्ये महिलांना प्रवेश का नाही याचे समाधानकारक उत्तर मिळाल्यावर मावशी जी यांनी संघाने स्वीकारलेले ध्येय आणि कार्यपद्धती समजून घेतली, आत्मसात केली. वंदनीय मावशी यांनी १९३६ मध्ये विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर हिंदूराष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली.

‘आर.एस.एस.’ या इंग्रजी अक्षरांशी साधर्म्य साधणाऱ्या राष्ट्र सेविका समितीच्या कार्याची सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय विचारांशी कटिबद्ध असणाऱ्या महिलांच्या कार्याचा शुभारंभ झाला. राष्ट्र सेविका समितीच्या कार्याचा विस्तार आज देशातील प्रत्येक राज्यात आणि जवळपास प्रत्येक जिल्ह्यात झाला आहे. पाच हजारांहून अधिक शाखा, एक हजारांहून अधिक सेवा प्रकल्प, ५२ शक्तिपीठे ही समितीच्या कार्याची ओळख झाली आहे.

समितीच्या शाखांमध्ये जाणाऱ्या सेविकांनी देशाच्या फाळणीच्या काळात सुरक्षेची जबाबदारी निभावली. १९६२, १९६५ आणि १९७१च्या युद्धकाळात त्याचप्रमाणे आणीबाणीच्या काळ्या आणि कठीण काळातही समर्पित भावाने कार्य केले. कोणत्याही नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मित संकटकाळात तत्परतेने मदतकार्य सुरु करणे हा सेविकांच्या दृष्टीने स्वाभाविकच झाले आहे.

संघाचा विस्तार करतानाच संघाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनसंघ, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, किसान संघ या संस्थांच्या रूपात प्रचंड प्रमाण कार्य केले आहे. या सर्वच क्षेत्रांत महिलांनीही आपली जबाबदारी निभावली आहे असे या संघटनांचा इतिहासच हे सांगतो.

केवळ इतकेच हे कार्य नाही. पुढे छोट्याशा खेड्यापासून वैश्विक स्तरापर्यंत जे आयाम संघविचार घेऊन कार्यरत झाले, त्या सर्व कार्यांमध्ये, त्याच्या निर्णय प्रक्रिया व नेतृत्व यामध्ये महिलांचे मोठे योगदान राहिले आहे ही देखील महत्त्वपूर्ण बाब आहे. आणीबाणीच्या काळात मिसा कायद्यांतर्गत जेव्हा पुरुष कार्यकर्ते कारागृहात बंदिवान होते तेव्हा महिलांनी आपले घर सांभाळले. त्यांच्यासह सत्याग्रही होऊन आपल्या दुर्गारुपाचा परिचय करून दिला. आज सुमारे दीड लाख घरांमध्ये संघाचे सेवा प्रकल्प सुरु आहेत. यातील प्रत्येक प्रकल्पात महिला शक्तीचा समावेश आहे. अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. ग्रामविकास, कुटुंब प्रबोधन, धर्म जागरण, सामाजिक समरसता या सर्व गतीविधींमध्ये महिला पूर्ण क्षमतेने आपल्या जबाबदाऱ्या निभावत आहेत.

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. सात हजार कार्यकर्त्यांनी २९ राज्यांतील ४६५ जिल्ह्यांत हे सर्वेक्षण केले. स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र ‘दृष्टी’च्या वतीने हे कार्य करण्यात आले. भारतीय संस्कृतीत स्त्री शक्तीच्या अपार महिम्याचे कथन करण्यात आले आहे. ही शक्ती केवळ मूर्तीबद्ध नाही. तर ती कार्यरत शक्ती आहे. संघ स्वयंसेवकांच्या घराघरात तिचे अस्तित्व आहे. संघकार्यात ती सक्रिय आहे. संघकार्यास पूर्णत्व देणारी ती एक राष्ट्रशक्ती आहे.

सुनीला सोवनी
(लेखिका मुक्त पत्रकार आणि राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुख आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button