RSS

जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी कार्यरत संघ

लेखमाला – विश्वगुरु भारत – संघाचे अंतिम ध्येय – भाग १

भारताचे जागतिक ध्येय विश्वकल्याणाचे आहे. वैभव शिखरावर आरूढ शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली भारतच केवळ विश्वकल्याणाचा मार्ग दाखवू शकतो. आध्यात्मिकतेची डूब असलेल्या आपल्या सनातन संस्कृतीने भारतीयांसोबतच जगभरातील  पंथोपपंथ आणि विचारप्रवाह यांना मजबूत पाया दिला आहे. आपली संस्कृती आणि आपली सामाजिक संरचना यांतील सौहार्दाच्या गुणाचे प्रकटीकरण म्हणजेच हिंदू राष्ट्र(HINDU RASHTRA).

पुनर्गठित, पुनरुत्थित, संपूर्ण  विश्वाला प्रकाशमान करणाऱ्या परमतेजस्वी आणि अखिल मानवजातीच्या आदरास पात्र भारताचे स्वप्न वास्तवात उतरण्याला आता प्रत्यवाय नाही.

पुनरुत्थित व प्रकाशमान भारताची संकल्पना केवळ राजकीय वा भौगोलिक एककाशी संबंधित नाही. एका अखंडित भूभागावरील शतकानुशतके चालत आलेल्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रकटन हिंदुत्वामध्ये किंवा  हिंदू असण्यात होते. हिंदुत्व(HINDUTVA) ही धार्मिक परंपरा नव्हे तर एक जीवनमार्ग आहे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. भारतात जन्मलेले आणि वाढलेले पंथोपपंथ हे त्याच एका जीवनमार्गाची वेगवेगळी प्रकटीकरणे आहेत.

राज्य बनण्यासाठी सलग भूभाग पुरेसा असतो. पण, एक समान सांस्कृतिक धागा आणि ती संस्कृती व तो भूभाग यांच्याबद्दल आत्मीयता असलेला लोकसमाज यांनीच राष्ट्र बनते. त्यामुळे या भूमीशी ज्यांची भावनिक नाळ जोडली गेली आहे अशा सर्वांचा समावेश हिंदूराष्ट्रात होतो. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा(RSS) तात्विक आधार आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी राष्ट्राची ही सांस्कृतिक संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. 

या देशाला मातृभू, पितृभू, पुण्यभू मनणारा प्रत्येक भारतीय, मग तो मंदिर, गुरुद्वारा, चर्च किंवा मशीद यापैकी कोठेही जाणारा असो, हिंदूच आहे. उच्चरवाने ‘भारत माता की जय’ म्हणण्यास न लाजणारा प्रत्येक जण हिंदूच आहे. म्हणजेच हिंदुत्व हीच राष्ट्रीयता बनते. हिंदू असणे म्हणजेच भारतीय असणे होय. राष्ट्रीयता ही उपासना पद्धती, वर्ग, वर्णनिरपेक्ष असते, असे म्हटले जाते ते या अर्थाने खरेच आहे.

हिंदुत्वाचा वैश्विक विचाराकडे जागतिक संदर्भातून पाहिले पाहिजे. हिंदुत्वाची मानवी जीवनाची कल्पना वैश्विक आहे, मानवी घटकांना सोबत घेणारी, त्यांना आत्मसात करणारी व त्यांचा सतत विकास करणारी आहे. ही केवळ हिंदू समाजाची संकल्पना नाही. विश्वबंधुत्व आणि शांती यांचा तो पाया आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिनः(सर्वाना सुख मिळावे ही प्रार्थना) आत्मवत सर्वभूतेषु(सर्वांचा आत्मा एकच आहे)’ यावर हिंदुत्वाचा विश्वास आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीने संपूर्ण जगाला एक कुटुंब मानले आहे.(वसुधैव कुटुंबकम)
 
भौतिकतावादी जीवनशैलीवर आधारलेली ग्राहककेंद्री संकल्पना ही कधीही कायमस्वरूपी असा समग्र मानवी विकास करू शकत नाही. मानवांना एकमेकांपासून तोडणारी, ‘चमचमीत भोजन आणि चंगळवादी जीवन’ अशी मर्यादित स्वरुपात असणारी जागतिक शांततेची कल्पना ही मानवतेला संकटाकडे नेत आहे. चंगळवादी आयुष्यासाठी नैसर्गिक स्रोतांचा अधिकाधिक वापर हा मानवी आयुष्यात मोठी किंमत मोजायला लावतो आहे, संकटात भर घालतो आहे. या संकल्पनेने क्रांतीच्या रुपात रक्तपाताला जन्म दिला, दोन जागतिक महायुद्धे दिली, अशांतता दिली, सामाजिक आणि राजकीय उलथापालथी दिल्या. जगात शांतता निर्माण करण्याचा आणि कल्याणाचा मार्ग शोधण्यात धर्मगुरू आणि नेते सपशेल नापास झाले. संयुक्त राष्ट्रांसारखी जगाच्या कल्याणासाठी कार्य करणारी संघटनादेखील ज्यासाठी अडर्षांसाठी स्थापना झाली ते प्रस्थापित करण्यात अपयशी ठरली.
 
जागतिक शांतता स्थापन करण्याचे सगळे प्रयत्न त्यांच्या पोकळ आणि भौतिकवादी पायामुळे फुकट गेले. आज भारताने जगाचे लक्ष आकर्षून घेतले आहे. विशेषतः भारत जागतिक विकासामध्ये आणि शांतता प्रस्थापित करण्यात योग्य आणि न्याय्य भूमिका बजावेल असे ज्यांना वाटते अशा काही महत्त्वाच्या आणि शक्तिशाली देशांचा यात समावेश आहे.

भारत ही गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, गुरु नानक देव जी, स्वामी रामतीर्थ, स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांची भूमी आहे हे संपूर्ण जगाला ज्ञात आहे. या सर्व दैवी व्यक्तिमत्त्वांनी संपूर्ण मानवी सृष्टीसाठी जीवनभर कार्य केले.  त्यांच्या शिकवणीत प्रादेशिकता आणि सांप्रदायिकता शोधूनही सापडणार नाही. ज्यांचा स्वतःच्या भूमीत छळ झाला, त्यांना दुषणे देण्यात आली, त्यांच्यावर खटले चालविण्यात आले त्या सर्वांचे भारतात स्वागत करण्याची प्रेरणा या व्यक्तिमत्त्वांच्या शिकवणीतून मिळाली.


भारतातील या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांनी कोणाचेही जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केले नाही. कोणत्याही धार्मिक स्थळाची नासधूस केली नाही, कोणत्याही निरंकुश हुकुमशाहीची स्थापना केली नाही.

भगवान महावीर यांच्या शिकवणीने विश्वाला अहिंसेचे, शांतता आणि तत्वज्ञान दिले. आजच्या काळात माणुसकी कमी होत चाललेली असतानाही शिकवण लागू पडते. वैयक्तिक आणि जागतिक शांततेचे गौतम बुद्धांनी सांगितलेले तत्त्व आज जगभरात विस्तारले आहे. गुरु नानक देव यांची दैवी आणि आशीर्वाद देणारी शिकवण आज ही आपल्याला त्यांच्या आत्मीय स्वरूपातील अस्तित्वाची अनुभूती देते. ‘कीरत कर वंड छक’(देवाची भक्ती करा, त्यांचे आशीर्वाद अन्नाच्या रुपात इतरांना वाटा) ही शिकवण त्यांच्या भक्तांना आजही गरजू माणसांसाठी कार्य करण्याची प्रेरणा देते.

सध्याच्या काळात खालसा पंथ, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, गायत्री परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योगपीठ आणि दिव्य ज्योती जागृती संस्थान या संस्था विश्वभरातील मानवाच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. जगातील सर्वात मोठी हिंदू संघटना असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखंड भारताला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्या ध्येयाच्या दिशेने पावले टाकीत आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात राजकीय घडामोडी आणि अन्य घटनांच्या प्रभावात आपली अभिमानाची भावना हरवून बसलेल्यांच्या मनात चैतन्य निर्माण करण्याचे अभूतपूर्व कार्य डॉ. हेडगेवार यांनी केले.

संघाचे प्रचारक आणि हिंदुत्वाचे अभ्यासक दिवंगत पं दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववादाची संकल्पना मांडली. अखंड भारताला विश्वगुरुपदी नेण्याच्या संघाच्या ध्येयाच्या संकल्पनेशी ही संकल्पना मिळतीजुळती होती. विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात, उपासनापद्धती भले ही भिन्न असोत. परंतु आपण आपली उपासनापद्धती अवलंबताना दुसऱ्याच्या उपासना पद्धतीचा आदर केला पाहिजे. असे केल्यास सौहार्द आणि सकारात्मक देवाणघेवाण सहज शक्य होते. त्यासाठी आपण समाजाचे, धर्माचे, देशाचे आणि विश्वाचे कल्याण याचा विचार केला पाहिजे.

संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री माधवराव सदाशिवराव गोळवलकर गुरुजी(GOLWARKAR GURUJI) यांनी संघाचे ध्येय स्पष्ट करताना म्हटले होते की, राष्ट्राला परम वैभवापर्यंत नेणे हेच आपले ध्येय आहे. जगाच्या कल्याणाचा हाच पाया आहे. भारत हा पूर्वी विश्वगुरु होता तेव्हा तो परम वैभवाच्या शिखरावर होता. भविष्यात तो पुन्हा एकदा विश्वगुरुपदी पोहोचेल याची आम्हाला खात्री आहे.


वैद्यकीय क्षेत्रात काम करून सुखाचे जीवन जगण्याचा पर्याय संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार(HEDGEWAR) यांच्याकडे होता. पण त्यांनी तपस्व्याचे जीवन स्वीकारले व आपले संपूर्ण तन मन हे अखंड भारतास परम वैभवाप्रत नेण्यासाठी खर्च केले. अनेक प्रचारकांनी त्यांचे अनुकरण केले आणि याच ध्येयासाठी आपले आयुष्य समर्पित केले. आजही हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी हजारो प्रचारक आणि लाखो स्वयंसेवकांनी अविरतपणे, न थकता कार्य करीत आहेत.

आजही तुम्ही सकाळी बाहेर पडलात तर एका सर्वसामान्य व्यक्तीचे असामान्य व्यक्तिमत्त्वात  रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरु असलेली दिसून येईल. डॉ. हेडगेवार यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीच्या बौद्धिक आणि शारिरीक क्षमतांचा विकास केला जातो. डॉ हेडगेवार यांनीच विकसित केलेली ही पद्धत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अतुलनीय अशीच आहे. समान ध्येयासाठी नि:स्वार्थीपणे काम करण्यासाठी लोकांना संघटीत करण्याचा असा प्रयोग अन्यत्र कोठेही झाला नाही.

एक विस्तीर्ण मैदान. त्यात भारतीय खेळ खेळणाऱ्या युवा आणि बालकांच्या गटासमोर दिमाखात फडकणारा भगवा ध्वज. हवेत पसरलेल्या उत्साहवर्धक, आनंदी आरोळ्या. खेळण्यात मग्न असणाऱ्या तरुणाच्या मुखातून निघणारे कबड्डी कबड्डी हे शब्द हे चित्र आपल्या हृदयाला जाऊन जाऊन भिडते. प्रमुखाने वाजविलेल्या शिट्टीने या युवकांमध्ये जादू झाल्यासारखा बदल होतो आणि एका क्षणात सर्वत्र शांतता पसरते. त्यानंतर शारिरीक कसरती सुरु होतात. सामुहिक प्रयत्नांतील चैतन्य  आणि उत्स्फूर्त प्रदर्शन प्रत्येक कृतीत दिसून येते. सूर्यनमस्कार, दंड आणि कवायती केल्या जातात. त्यानंतर खाली बसून एकत्रित राष्ट्रभक्तीपर गीत गायले जाते. देशासमोर असलेल्या प्रश्नांवर ते सखोल चर्चा केली जाते. अखेरीस ध्वजासमोर रांगेत उभे राहून संघ प्रार्थना गायली जाते….‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ हे शब्द आपल्या कानाला आणि आत्म्याला भिडतात. भारतमाता कि जय या प्रेरणादायी घोषणेने कार्यक्रमाचा समारोप होतो.


आपल्या देशात दिसून येणारे हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि परिचित असे दृश्य आहे. देशातील पुरुषांच्या मनात अभिमान आणि आत्मीयता निर्माण करणारी ही नित्यघटना असते. संपूर्ण भारतात, केवळ शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांतच नव्हे तर डोंगरदऱ्या असणाऱ्या दुर्गम भागांमध्येही सकाळी-संध्याकाळी ठरलेल्या वेळी नित्यनेमाने हे प्रेरणादायी दृश्य आणि गाणी आपल्या मनाला साद घालत असतात.

क्रमशः

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत)

Back to top button