News

घर घर तिरंगा – मन मन तिरंगा च्या माध्यमातून अभाविप करणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे आयोजन

“घर घर तिरंगा – मन मन तिरंगा च्या माध्यमातून अभाविप करणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे आयोजन; भारत माता पूजन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून अभाविप करणार स्वातंत्र्य दिवस साजरा” – प्रेरणा पवार

मुंबई  : भारतीय स्वातंत्र्याला ७४ वर्ष पूर्ण होऊन आपला देश या यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय. यानिमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रदेशामध्ये घर घर तिरंगा मन मन तिरंगा अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने राबविणार आहे. या अभियानासाठी कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात सामूहिक ध्वजारोहण, तिरंगा फेरी,भारत माता प्रतिमा पूजन, घरावर तिरंगा ध्वज लावणे अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे .

कोंकण प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये १,१११ कार्यक्रम होणार आहेत . या अभियानामध्ये अभाविपचे एकूण ६२९ कार्यकर्ते सक्रिय असणार आहेत. तालुका, शहर, गाव पाडे अशा सर्व स्तरावर अभियान प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना जबादारी देण्यात आलेली आहे. अभाविप विविध वाड्या वस्त्या, गाव पाडे, शहर, नगर इत्यादी स्थानांवर राष्ट्रीय कलामंचच्या माध्यमातून एक शाम – देश के नाम, वक्तृत्व स्पर्धा, भव्य रांगोळी स्पर्धा, विविध विषयांवर परिसंवाद अशा विविध गतीविधीचे आयोजन करणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा व कॉलनीमध्ये पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमामध्ये अभाविप नागरिकांना सहभागी करून घेणार आहे. आगामी वर्षभर अभाविप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. अशी माहिती अभाविप कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी दिली आहे.

कोकण प्रदेशात येणाऱ्या विविध जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, महिला बचत गट, सामाजिक संस्था व नागरिकांनी या अभियानांतर्गत सार्वजनिक ध्वजारोहण व भारत माता पूजनाचे कार्यक्रम करावेत असे आवाहन देखील प्रेरणा पवार यांनी केले.

Back to top button