News

पोलीस यंत्रणेच्या गैरवापराचा विद्यार्थ्यांकडून निषेध

मुंबई, दि. ४ नोव्हेंबर (वि.सं.कें.) : पत्रकार अर्णब गोस्वामी(ARNAB GOSWAMI) यांच्या अटकेचा विद्यार्थी संघटनांनी बुधवारी येथे निषेध केला.

ही अटक म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेची धादांत पायमल्ली आहे. ही सरकारने केलेली सूडबुद्धीची कारवाई आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हा घाला म्हणजे लोकशाहीची उघड पायमल्ली आहे, असे विद्यार्थी नेत्यांनी स्वा. सावरकर स्मारकासमोर केलेल्या या निदर्शनांच्यावेळी सांगितले.

रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज पहाटे साडेसहा वाजता पोलीसांनी त्यांच्या राहत्या घरी अटक केली. दोन वर्षांपूर्वी बंद केलेल्या एका गुन्ह्याप्रकरणी ही अटक करण्यात आली, हे विशेष. पोलिसांनी या खटल्यात काही तथ्य नसल्याने तो बंद करावा, असा अहवाल दिल्यानंतरही सुमारे दीड वर्षाने ही अटक करण्यात आली. त्यामुळे ही अटक म्हणजे वृत्तपत्रस्वातंत्र्यावरचा घालाच आहे, असे विद्यार्थी नेत्यांनी सांगितले.

अभाविपचे(ABVP) अखिल भारतीय सचिव अनिकेत ओव्हाळ म्हणाले की, ‘‘अर्णब गोस्वामी यांची अटक म्हणजे लोकशाहीवरचा काळा डाग आहे. सत्तेतील पक्ष सूडाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी लोकशाही मूल्यांची पायमल्ली थांबवायला हवी.’’

अभाविपचे मुंबई सहसचिव विठ्ठल परब म्हणाले की, ‘‘कायदेशिर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय एखाद्या पत्रकाराला अटक होणे, हे लज्जास्पद आहे. आणि अशा लोकशाहीवरच्या भ्याड हल्ल्यांचा विद्यार्थी नेहमी निषेधच करतील.’’

**

Back to top button