Opinion

कर्मवीर भाऊराव पाटील

रयते मधुनी नव्या युगाचा माणुस घडतो आहे ।
वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे ।।

विठ्ठल वाघांनी अशा प्रकारचे काव्य ज्यांच्याविषयी केले त्या कर्मवीर भाऊराव पाटलांची आज २२ सप्टेंबर रोजी जयंती आहे. त्यांचे संपूर्ण नाव भाऊराव पायगोडा पाटील होते. जैन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कर्मवीरांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात गेले. भाऊरावांच्या आई अतिशय कर्मठ वृत्तीच्या होत्या. अशा आईचा हा मुलगा अतिशय विरुद्ध टोकाचा बंडखोर होता. अस्पृशांना पाणी भरणे मुश्किल होते म्हणून त्यांनी विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता.‌ कोल्हापूर येथे राजाराम हायस्कूल येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यावेळी ते राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांना जाणून घेते झाले. त्यावेळी प्रत्येकाला शिक्षण मिळण्यासाठी शाहू महाराजांनी प्रत्येक जाती धर्मानुसार बोर्डींग सुरू केले होते. त्यातील जैन बोर्डींगमध्ये भाऊराव रहात होते. त्यांच्या बेडर स्वभावामुळे त्यांच्यावर शाहुमहाराजांच्या कार्याचा, विचारांचा प्रभाव पडला. पुणे करार झाला त्यावेळी भाऊरावांनी युनियन बोर्डाची स्थापना केली. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढतील. असे त्यांचे मत होते. भाऊराव पाटील किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काम करत असताना सत्यशोधक समाजाशी त्यांचा संबंध आला. महात्मा फुले यांना आदर्श मानून त्यांनी रोक्षणिक प्रचाराचे काम केले. प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षण या गोष्टींचा त्यांनी पाठपुरावा केला.

त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत मुलांना पुस्तकी क्रमिक अभ्यासक्रम शिकवला जात नसे तर समता, बंधुता, सामाजिक मुल्ये, श्रमप्रतिष्ठा यांच्याविषयी जागृती केली जात असे. गरीब व मागास मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी कमवा व शिका ही योजना आणली. यातून मुलांमध्ये आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरता आली. महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने त्यांनी देशातील पहिले कमवा व शिका या योजनेखाली चालणारे मोफत रेसिडेंशियल हायस्कूल सुरू केले. रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत १६ जून १९३५ ला झाली. याचवेळी सिल्व्हर ज्युबली ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. साताऱ्यात १९४७मध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालय तर कराड येथे १९५४मध्ये सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाची स्थापना केली. प्रशिक्षित शिक्षकांची उणीव भासू नये म्हणून सातारा येथे १९५५मध्ये आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले.

त्यांनी सांगितलेली तत्वे
१. निरक्षरांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे.
२. गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
३. सामाजिक समता निर्माण करणे.
४. अयोग्य रूढी परंपरा बंद करणे.
५. मुलांमध्ये सांघिक भावना वाढीस लावणे.

त्यांना त्यांच्या कार्यात पत्नीची उत्तम साथ लाभली. त्यांना कर्मवीर पदवी जनतेने दिली. आज आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्था प्रसिद्ध आहे. अशा या रयत शिक्षण संस्था रुपी वटवृक्षाची लागवड करणाऱ्या कर्मवीरांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन .

गीताग्रजा –
(डॉ. वैशाली काळे-गलांडे)

Back to top button