Seva

त्यांची दिवाळी करुया प्रकाशमय

गेले जवळपास सात महिने कोरोनाने(CORONA) आपले जीवनमान पुरते पोखरून गेले होते. हळूहळू सगळे पूर्ववत होत असताना, आयुष्यात पुन्हा एकदा रंग भरण्यासाठी दिवाळी सज्ज झाली आहे. नवे कपडे, फराळ, कंदील आणि घरोघर तेवणाऱ्या पणत्या हेच पारंपरिक दिवाळीचे(DIWALI) रूप आपल्या मनात असते. रंगीबेरंगी पणत्यांनी आपले घर पुन्हा उजळून टाकण्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान संस्थेतील स्वमग्न व वंचितांनी कंबर कसली. या मुलांनी तब्बल ३० हजार पणत्या रंगवल्या असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी या पणत्या विक्रीसाठी पोहोचल्या आहेत.

जळगावातील(JALGAON) ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ ही संस्था शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक आणि आर्थिक अशा चारही क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. या संस्थेच्या सामाजिक उपक्रमांतील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे आश्रय माझे घर. १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या स्वमग्न, मतिमंद प्रौढ मुलांना आधार देणारा ‘आश्रय – माझे घर’ हा उपक्रम आहे. एका विशिष्ट वयापर्यंत त्यांना सांभाळणे शक्य असते. पण जसजसे वय वाढत जाईल तसतसे त्यांचा सांभाळ करणे कठीण होत जाते. असे १८ जण आज संस्थेत आहेत. संस्थेचा आणखी एक प्रकल्प म्हणजे ‘समतोल’. भरकटलेली, चिडून घर सोडून आलेली, पळवून आणून नंतर सोडून दिलेली अशी अनेक मुले रेल्वे स्थानकावर दिसून येतात. २००५ साली सुरू झालेल्या या प्रकल्पांतर्गत ७००मुले घरी सोडली आहेत .११०० मुलांना बालगृहात दाखील केले आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. अगरबत्ती बनवणे आणि दिवाळीच्या वेळी पणत्या रंगवणे हे त्यातील प्रमुख उपक्रम आहेत.

केशवस्मृती(KESHAVSMRUTI) प्रतिष्ठानच्या आश्रय आणि समतोल या दोन्ही प्रकल्पांतील मुलांनी यंदा दिवाळीसाठी तीस हजार मातीच्या पणत्या रंगवल्या. यासाठी पणत्या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या. आश्रयमधील अठराजणांनी पणत्यांना बेसचा पांढरा रंग देण्याचे काम केले. तर समतोलमधील सहा मुले त्यावर रंगकाम आणि कलाकुसर करण्याचे काम केले. चार पणत्यांच्या संचात या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, डोंबिवली अशा विविध ठिकाणी या पणत्याची विक्री सुरू आहे. या उपक्रमातून उभा राहणारा निधी आश्रय-माझे घर या संस्थेला देण्यात येणार आहे. पणत्यांचा हा उपक्रमही गेली पाच वर्षे सुरू असून त्याला सुरुवातीपासूनच उदंड प्रतिसाद मिळत आहे.

प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी सागर येवले म्हणाले की, दिवाळीचा हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येत असतो. सध्याच्या कोरोना परिस्थितीत  आपण सर्वच जणअडचणीच्या कालखंडातून प्रवास करत आहोत. नोकरदार वर्ग ,व्यावसायिक आस्थापनाबरोबरच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती  देखील या काळात आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे या स्वयंसेवी प्रकल्पांना मदत व्हावी या हेतूने हे दिवे आकर्षक प्रकारच्या सजावटीतून विक्री करून काही अर्थ संकलन करण्यात येत आहे. या दिव्याच्या विक्रीतून मिळणारा निधी हा प्रौढ मतिमंदांसाठी आजन्म निवारा चालविणाऱ्या आश्रय माझे घर  व रेल्वे स्टेशनवर भरकटलेल्या मुलाना आधार देणाऱ्या समतोल प्रकल्पाला देण्यात येणार आहे. दिवे खरेदीची ही एका कृती आपल्याला आत्मिक आनंद तर मतिमंद व घर हरवलेल्या मुलांच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणेल.

संस्थेच्या मदतीसाठी आपल्या नातेवाईक व जवळच्या प्रियजनांना हे दिवे आपण भेट स्वरुपात द्यावेत असे आवाहनही येवले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व पणती खरेदीसाठी संपर्क – ९००४१८४३३३

**

Back to top button