IslamRSS

इस्लामला कट्टरतावादाच्या जाळ्यात ढकलणाऱ्या शक्तींचे पुतळे जाळणार मुस्लिम राष्ट्रीय मंच

मुंबई, दि. ९ नोव्हेंबर : इस्लामाला(ISLAM) कट्टरतावादाच्या जाळ्यात ढकलणाऱ्या देशविदेशी शक्तींचे पुतळे जाळून त्यांचा निषेध करण्याचा निर्णय मुस्लिम राष्ट्रीय मंचने घेतला आहे. अलिकडेच पार पडलेल्या एका देशव्यापी वेब बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मंचाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

इस्लामाच्या नावाखाली काही कट्टरपंथी मुसलमानांची कट्टरता संपूर्ण जगभरात भयानक रुप धारण करीत आहे. फ्रान्समधील एका शिक्षकाचे शीर धडावेगळे करणे, हरियाणामधील निकिता नावाच्या हिंदू मुलीने धर्मांतर आणि मुस्लिम युवकाशी विवाह करण्यास नकार दिला म्हणून तिची हत्या करणे, मथुरेत नंदबाबा मंदिरात पूजेच्या नावाखाली प्रवेश करुन नमाज पढणे, काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्याकडून तिरंग्याचा अवमान आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी चीनची मदत घेण्याची फारूख अब्दुल्लांची दर्पोक्ती, काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यांत भाजपा कार्यकर्ते मारले जाणे, मुस्लीम व्होटबँकेचे राजकारण करण्याच्या नावाखाली विरोधी पक्षाकडून मुस्लीम कट्टरपंथीयांना प्रोत्साहन, या साऱ्या देशाची शांतता नष्ट करणाऱ्या घटना अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक आहेत, असे मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या(MUSLIM RASTRIYA MANCH) काश्मीर ते कन्याकुमारी आणि गोवा-गुजरात ते आसाम-मणिपूर अशा संपूर्ण देशभरातील सर्व राष्ट्रीय संयोजक, तसेच प्रकोष्ठांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या वेब बैठकीत उपरोल्लेखित घटनांवर विचार विनिमयातून हे स्पष्ट झाले की, या सर्व घटना कट्टरतावाद्यांचा विषाक्त, राक्षसी आणि अमानवी चेहरा उघड करणाऱ्या असून अखिल मानवजातीसाठी ही धोक्याची घंटा आहे. देशभर पुतळे जाळून अशा शक्तींचा निषेध करण्याचा व्यापक कार्यक्रम मंचाच्या वतीने आखण्यात आला असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.


अशा हिंसक घटना रोखण्यासाठी तसेच भविष्यातही त्या होऊ न देण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे, त्याकरिता नवे कायदे करण्याचे आवाहनही मुस्लिम राष्ट्रीय मंचाने देशातील सारे राजकीय पक्ष, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार तसेच जगभरातील राष्ट्रप्रमुखांना केले आहे. याचसोबत, या दानवीय हिंसेविरोधात आवाज बुलंद करण्याचे तसेच, सामाजिक सौहार्द आणि शांतता कायम राखण्यासाठी इस्लामच्या शांती, सद्भावना, बंधुभाव आणि सुरक्षेचा संदेश समाजात प्रसृत करण्याचे आवाहनही मंचाने देशभरातील सच्चा मुस्लिमांना केले आहे.

Back to top button