अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा आकस्मिक मृत्यू
नंदूरबार, दि. ११ नोव्हेंबर – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे(ABVP) राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचे ११ नोव्हेंबर रोजी आकस्मिक निधन झाले. बुधवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह नर्मदा नदीवर पोहण्यास गेले असता भोवऱ्यात सापडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. अभाविपने ट्वीट करत ही माहिती दिली.
अनिकेत ओव्हाळ हे अभाविपच्या कामासाठी नंदुरबार आणि जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत परिषदेचे अन्य दोन कार्यकर्तेही होते. हे तिघेही धडगाव येथे नदीवर पोहण्यास गेले असता भोवऱ्यात सापडून अनिकेत दिसेनासे झाले. त्यांचा शोध घेण्यास सुरूवात झाली, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. काही काळाने त्यांचा मृतदेह आढळून आला. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अनिकेत ओव्हाळ हे रुईया महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. गेली अनेक वर्ष त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. ते मुंबई महानगर मंत्री, कोकण प्रदेश मंत्री, अभाविपचे राष्ट्रीय मिडिया सहसंयोजक राहिले. तसेच, सध्या ते अभाविपचे राष्ट्रीय मंत्री(ABVP RASTRIYA MANTRI) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला असून “आम्ही एक वचनबद्ध कार्यकर्ता गमावला आहे. देशाने विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणारा एक विद्यार्थी चळवळीचा चेहरा गमावला.” अशा शब्दात विद्यार्थी परिषदेने व्यक्त केल्या आहेत.
**