National SecurityNews

२६/११चा सूत्रधार, दहशतवादी हाफिज सईदला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा

नवी दिल्ली, दि. १९ नोव्हेंबर – मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार, जमात-उद-दावाचा संस्थापक हाफिज सईद याला न्यायालयाने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविली आहे. हाफिज सईदला बेकायदेशीर मार्गाने पैसा पुरवल्याच्या दोन खटल्यांमध्ये लाहोर दहशतवादविरोधी न्यायालयाने ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. जुलै २०१९मध्ये हाफिजला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सईदसह जफर इक्बाल, याहया मुजाहिद आणि अब्दुल रहमान मक्की यांनाही साडे दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा न्यायाधीश अर्शद हुसैन भुट्टा यांनी सुनाविली आहे.

२००८ साली झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणी भारताला हाफिज सईद हा ताब्यात हवा आहे. त्या हल्ल्यामध्ये १० दहशतवादी आणि १६६ निष्पाप जीव मारले गेले होते तर शेकडो जखमी होते. हाफिज सईद हा अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र यांच्याकडून जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. त्याच्यासाठी १० लाख डॉलरचे बक्षीस देखील घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये विविध दहशवादविरोधी न्यायालयामध्ये हाफिज सईदवर ४१ विविध केसेस दाखल आहेत.

हाफिज सईदला कारावासाची शिक्षा सुनावण्याची ही पहिली वेळ नाही. फेब्रुवारी २०२०मध्ये देखील जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला आणि त्याच्या सहकार्‍यांना दहशतवादी कारवायांमध्ये आर्थिक सहाय्य करण्याच्या बाबतीत ११ वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला आहे. सध्या हाफिज सईद लाहोरमधील कोट लाखपत तुरुंगात आहे.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button