Health and WellnessHinduismNewsSeva

संपूर्ण समाजाचे निर्मल वारी अभियान – डोळस निर्मिती

आषाढ महिन्यातील एकादशीसाठी आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर (sant dnyaneshwar) आणि संत तुकाराम ( sant tukaram) यांच्या पालख्या म्हणजे आनंद सोहळाच. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठोबाच्या दर्शनाला पायी निघालेले वारकरी, त्यांच्या दिंड्या यातून भक्तीमय वातावरण असते. अशाच वातावरणात एकदा माझी आत्या प्रथमच वारीसाठी गेली होती तिला भेटायला मी सासवड मुक्कामी गेलो होतो. सासवडला पालखीचा दोन दिवसाचा मुक्काम असल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी गेलो असता, सासवडमधील परिस्थिती भयंकर होती. शौचालय नसल्यामुळे लोकांना उघड्यावरच शौचाला जावे लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य होते. ते सर्व पाहिल्यावर मनात असंख्य विचार येत होते, शेकडो वर्षे वारकरी वारीला जात आहेत पण हा प्रश्न का सुटला नसेल असा विचार स्वस्थ बसू देत नव्हता आणि तिथून परत येतानाच यासाठी काहीतरी करायचे असे मनाशी ठरवले होते…

स्वच्छ भारत अभियान

२०१४ मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendra modi) यांनी 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केल्यावर आपल्याला वारीसाठी स्वच्छ भारत अभियानाचा उपयोग करता येईल असे जाणवले. त्याच दरम्यान वारीवर उच्च न्यायालयाने निर्बंध घालावेत अशा स्वरूपाचा केसेस पर्यावरणवादी लोकांनी ओपन डेफिनेशनमुळे केल्या होत्या. त्यामुळे तातडीच्या कार्यवाहीची गरज होती..

पूर्वतयारी

वारीला खंड तर पडू द्यायचा नाही आणि प्रश्न तर सोडवायचा आहे, हे लक्षात घेऊन मी घेतलेल्या शिक्षणाचा, सध्या करत असलेल्या नोकरीतील कामाचा, व्यवस्थापनाचा, प्रोजेक्टच्या पूर्वतयारीच्या कामासाठी काय काय करतो त्या सर्वांचा प्राथमिक उपयोग करता आला.
मी निर्मल वारी अभियानाची प्रोजेक्टची ( Nirmal Waari project) ब्ल्यू प्रिंट तयार केली. यासाठी कोणते शौचालय उपयोगी होतील ते कसे वापरता येतील? पाणी, लाइट, स्वच्छ्ता कशी करता येतील , कोणत्या सर्व्हिसेस घ्याव्यात ? यासाठी सेवा सहयोग सोबत चर्चा केली आणि काम सुरु झाले.

पर्यावरण विषयक केसेस असल्यामुळे तसेच तेव्हा प्रकाशजी जावडेकर पर्यावरण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री होते. त्यांना ई-मेल पाठवला की वारी संदर्भात काहीतरी करणे गरजेचे आहे. ब्ल्यू प्रिंट रेडी आहे, तुमची वेळ हवी आहे. त्याच दिवशी त्यांचा प्रतिसाद आला. पुण्यामध्ये असताना त्यांनी भेटायला वेळ दिली. त्यांची भेट झाली त्यांनी सांगितले हा राज्याचा विषय आहे आणि तुमचे मॉडेल खूप छान आहे, तुम्ही यावर्षी पायलट करा, मी जी लागेल ती मदत करतो, यामुळे हुरूप वाढला.

पुढे याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( rashtriya swayamsevak sangh) काही काम करत आहे असे कळले त्या संदर्भात प्रदीप दादा रावत, शिवाजीराव मोरे , अतुलजी लिमये काम करत होते. त्यांना जाऊन भेटलो सेवा सहयोग तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य संस्था यांनी बरोबर काम करायचे ठरले.आम्ही चक्क पोर्टेबल टॉयलेट (portable toilet) बघायला काही प्रमुख मंडळी गेलो होतो.

पायलट प्रोजेक्ट

सर्वांना प्रोजेक्ट फार आवडला टॉयलेट सर्विस कल्पना तेव्हा नवीन होती. लोणी आणि यवतमध्ये २०१५ ला पायलट प्रोजेक्ट करायचे ठरले.
वारकरी शौचालय वापरतील का? गावकरी कसा प्रतिसाद देतील? स्वयंसेवक कसे मदत करतील ? असे प्रश्न अनेकांना पडले होते. मी मात्र उत्तरावर ठाम होतो. देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे सुद्धा अत्यंत सकारात्मक होते.

२०१५ मध्ये लोणी चा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला. वारकऱ्यांनी नुसते शौचालय वापरले नाही तर ते स्वच्छ करण्यासाठी पण मदत केली. अनेक स्वयंसेवक रात्रभर माऊली या शौचालयाचा वापर करा, अशी विनंती करत होते. टॉयलेट सर्विस मॉडेल पण छान चालले. दुसऱ्या दिवशी सकाळी लोणी गावचे ग्रामस्थ न्याहारी घेऊन शौचालय जिथे उभारले होते त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सांगितले पूर्वी वारी झाल्यावर पंधरा-वीस दिवस या भागात येता येत नव्हते, आज आम्ही इथे न्याहारी घेऊन आलो आहोत. तुम्ही आमचे गाव स्वच्छ ठेवायला मदत केली आहे इथून पुढे आम्ही तुम्हाला या कामासाठी मदत करू. यवत मध्ये असाच चांगला अनुभव आला यावरून पंढरपूरचे मुक्कामी पोर्टेबल टॉयलेटची सुविधा करण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ठरवले. सेवा सहयोग(seva sahayog), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी पंढरपूरला जाण्याची तयारी केली आणि पंढरपूर मधला निर्मल वारी अभियानाचा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला.
२०१६ मध्ये हा प्रयोग कुठे करावा अशी चर्चा सुरु असताना ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी मार्गावरील सर्व मुक्कामांवर करावा असे ठरवले.

टॉयलेट सर्विस मॉडेल

सेवा सहयोगच्या टीम बरोबर मी आणि शिवाजीराव मोरे महाराज सर्व पालखी मुक्कामांचे सर्वे केले त्यातून अनेक कार्यकर्ते जोडले गेले. सेवा सहयोगने केलेला पायलट उपक्रम महाराष्ट्र शासनाने (maharashtra government) घ्यावा आणि करावा आम्ही लागेल ती मदत करू यासाठी अनेक बैठका झाल्या. तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांनी खूप प्रयत्न घेतले अंतिमतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सेप्शनल केस म्हणून या प्रोजेक्टचे फंडिंग मंजूर केले. शासनाने व्यवस्था उभा केल्या. सेवा सहयोग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी वारकऱ्यांचे प्रबोधन आणि शासकीय कंत्राट दारांवर देखरेख केली.

२०१६ ला ज्ञानेश्वर महाराजांच्या १४ पालखी मुक्कामावर आणि तुकाराम महाराजांच्या १७ पालखी मुक्कामांवर मोठ्या प्रमाणात स्वच्छता राखली गेली.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची जबाबदारी संतोष दाभाडे यांनी घेतली त्यांना राजाभाऊ माने निलेश देशपांडे यांनी मदत केली. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची जबाबदारी माऊली किरण ढमढेरे यांनी घेतली पंढरपूरसाठी संदीप जाधव, शिवाजीराव मोरे महाराज हे स्वतः वाळवंटात उभे राहिले.

खळखळा ओतल्या मोहरा

२०१६ ला मोठ्या प्रमाणात निर्मल वारी अभियानचे कौतुक झाले. २०१७ ला अर्थ मंत्रालयातूनच फोन आला निर्मल वारी अभियान साठी किती तरतूद लागणार आहे आणि मी थक्क झालो. खळखळा ओतल्या मोहरा त्याची मोजून पावती करा या गाण्याच्या ओळी माझ्या डोळ्यासमोरच चमकल्या.. २०१७ च्या अर्थसंकल्पातच निर्मल वारी अभियानाची तरतूद झाली होती..हा प्रवास थक्क करणारा होता. माझ्यासारख्या अति सामान्य माणसाचे सरकार दरबारी असलेले साधे काम सुद्धा दोन-चार चकरा मारल्याशिवाय व्हायचे नाही येथे तर पूर्ण निर्मल वारी प्रकल्प राज्य सरकारने स्वतःचा म्हणून दुसऱ्याच वर्षी स्वीकारला होता, तिसऱ्या वर्षी कुठल्याही एका खात्याच्या अखत्यारीत येणार नाही म्हणून त्याची बजेट मध्येच तरतूद करण्यात आली होती.

२०१७ मध्ये प्रत्येक गावात अनेक स्वयंसेवकांनी निर्मल वारी अभियान यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. वाळवंटामध्ये जिथे विष्ठेचा सडा पडत होता तिथे रांगोळीचा सडा घातला गेला.अनेक लोकांनी आशीर्वाद दिले .विविध प्रक्रिया आल्या.महिला वर्ग विशेष करून कौतुक करत होता. खूप मोठी सुविधा निर्माण झाली होती.

चौकट

पंढरपूर (pandharpur) मध्ये २०१५ ला जेव्हा पहिल्यांदाच पोर्टेबल टॉयलेट लावले गेले तेव्हा अनेकांनी ते प्रथमच पाहिले होते. एक आजी बाई आल्या कुठलं मशीन आहे ? म्हणून विचारलं, एका महिला कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली त्या शौचालयात जाऊ शकल्या. आल्यावर त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं हे लय भारी मशीन आहे मी माझ्या घरी जाऊन असं मशीन लावणार माझ्या मुलींना याचा चांगला उपयोग होईल एकदम सुरक्षित आहे..

सर्वच पक्षाचे कार्यकर्ते निर्मल वारीच्या कामात मदत करत होते सुरुवातीला त्यांच्या ट्रेनिंग संदर्भात आम्ही त्यांना सांगत होतो वारकऱ्यांना बाहेर सार्वजनिक ठिकाणी जाऊ द्यायचे नाही, शौचालयात जायचे आवाहन करायचे. त्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगण्याकरीता काहींनी सांगितलं बोगस मतदान होऊ द्यायचे नाही आपल्या बुथवरच मतदान झाले पाहिजे. याचा चांगला उपयोग झाला.

सामाजिक प्रकल्पात काम केल्यावर फार आनंद होतो समाधान मिळते. सासवडलाच एक माऊली भेटले मुंबईला ड्रायव्हर म्हणून काम करतात. वारीसाठी वीस दिवसाची बिन पगारी सुट्टी घेऊन आले होते. ना कुठे राहायची सोय ना जेवायची सोय. सर्व काही चिंता माऊली चच्या चरणी ठेवून आले होते.. दिवस भर चालत होते थोडावेळ विश्रांती घेऊन रात्री आमच्या बरोबर थांबत आणि वारकऱ्यांना सांगत शौचालयाचा वापर करा. अशा संवेदनशील माऊली भेटल्या की, पुढील कामाला प्रेरणा मिळते. कोणत्याही कामाचा गर्व न करता कृतज्ञ भाव अजूनच वृद्धिंगत होत जातो.

आज या प्रकल्पाला कोरोनातील दोन वर्षे सोडली तर सात वर्षे सलग गती मिळाली आहे. वारकऱ्यांना सुद्धा आता सांगावे लागत नाही याबाबत समाज प्रबोधन घडून त्यांच्या कडून चांगले सहकार्य मिळते आहे. पण समन्वयाची, व्यवस्थापनाची भूमिका आजही सेवा सहयोग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिरीरीने करत आहे.

सेवा परमो धर्म: याची पदोपदी प्रचिती येत आहे.

रामकृष्ण हरी !

लेखक :- नरेंद्र वैशंपायन

https://aim2flourish.com/innovations/nirmal-wari-a-vijanana-bharati-inititiave

https://hi-in.facebook.com/NirmalWari/photos/

Back to top button