RSSSeva

सेवेचे दुसरे नाव रा. स्व. संघ, लष्करभरतीसाठी आलेल्या युवकांना मदतीचा हात

देवास, दि. २४ मार्च – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्थापनेपासूनच सामाजिक सेवांमध्ये अग्रणी राहिला आहे. देवास येथे लष्करभरती प्रक्रियेदरम्यान पुन्हा एकदा समाजाने संघाचा हा निरपेक्ष सेवाभाव अनुभवला. भरतीसाठी आलेल्या हजारो युवकांच्या भोजनाची, निवासाची सोय संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

देवास येथील कुशाभाऊ ठाकरे मैदानात २० ते ३० मार्च या काळात लष्करभरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी ४९ हजार ९८७ युवकांनी नावनोंदणी केली आहे. लष्करात भरती होण्यासाठी हजारोंच्या संख्येने युवक देवासमध्ये दाखल झाले. निवासाची व्यवस्था नसल्याने या युवकांनी बस स्टँड, रेल्वे स्थानक, पदपथावर तर काहींनी मैदानात भुकेल्या पोटी कशीबशी रात्र घालवली. याची माहिती मिळताच संघ, सेवाभारती आणि सरस्वती शिशू मंदिरातील कार्यकर्ते प्रभात शाखेच्या वेळी बाहेर पडले. सेवा भारतीच्या कार्यकर्त्यांनी युवकांचा उत्साह पाहून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

सौजन्य – दै. जागरण

आवासनगर येथील तुलसीराम शर्मा यांच्या पुढाकाराने युवकांच्या निवासाची सोय करण्यात आली. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून आपल्या घरचा पत्ता त्यांना दिला असून सुमारे शंभर युवकांच्या निवासाची सोय त्यांनी केली. आणखी शंभर जणांच्या निवासाची सोय म्हणून काही तंबू आणि अंथरूण पांघरूण मागवण्यात आले आहे. आपल्या आठ खोल्यांच्या घरासह अन्यत्रही संबंधित युवकांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची सोय त्यांनी केली आहे.

संघ कायमच सेवा कार्य करत आला आहे. देशात कुठेही आपत्ती वा संकट येवो. संघाचे कार्यकर्ते निःस्वार्थी भावनेने सर्वात आधी मदतीसाठी पोहोचतात. कोरोनाच्या काळातही संघ स्वयंसेवकांच्या मदतीची दखल  आंतरराष्ट्रीय स्तरावर, वृत्त वाहिन्यांवर, समाजमाध्यमांवर घेतली गेली.  देवासचे उदाहरणही संघाच्या अशाच निःस्वार्थी मदतकार्याचे ताजे उदाहरण आहे.

**

Back to top button