Opinion

शरणकुमार लिंबाळे लिखित सनातन या कादंबरीचे वृंदा टिळक यांनी केलेले पुस्तक परीक्षण

समन्वयाची भूमिका

“इतिहासाच्या काल्पनिक आधाराने जळजळते वर्तमान सांगण्याचा प्रयत्न मी ‘सनातन’ ही कादंबरी लिहिताना केलेला आहे “- डॉ. शरणकुमार लिंबाळे

‘सनातन’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली. अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा के.के. बिर्ला फाउंडेशन, नवी दिल्लीचा, भारतातील सर्व भाषांतील सर्वोत्तम कादंबरीला दिला जाणारा सरस्वती सन्मान पुरस्कार २०२०, ‘सनातन’ ह्या डॉ. शरणकुमार लिंबाळे लिखित कादंबरीला मिळाला आणि खऱ्या अर्थाने साहित्य जगताचे, रसिक वाचकांचे आणि समाजधुरीणांचे लक्ष ह्या कादंबरीकडे वेधले गेले.

सरस्वती सन्मान पुरस्कार, १९९१ पासून सुरुवात झाले आहेत व १५ लाख रुपये, प्रशस्ती पत्र आणि सन्मान चिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या तीस वर्षात अवघ्या तिसऱ्यांदा हा सन्मान मराठीला मिळाला आहे.

डॉ. शरणकुमार लिंबाळे ह्यांचे लेखन गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे सातत्याने सुरु आहे. अनेक कविता संग्रह, कथा संग्रह, कादंबऱ्या, आत्मनिवेदने, संपादने आणि समीक्षा अशी विविध प्रकारची विपुल साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. पण केवळ इतकेच त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य नाही तर हिंदी, कन्नड, गुजराती, पंजाबी, मल्याळम, तामिळ, उर्दू, तेलगू, बंगाली अशा अनेक भारतीय भाषांतून त्यांचे साहित्य अनुवादित झालेले आहे. त्यांच्या साहित्याचे इंग्रजीत देखील भाषांतर झालेले आहे.

सरस्वती सन्मानाच्या निमित्ताने दिलेल्या अनेक मुलाखतींतून,भाषणांतून डॉ. शरणकुमार लिंबाळे ह्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करत साहित्य आणि समाज ह्यांच्यातील संबंधांवर महत्वपूर्ण भाष्य केले आहे.

या कादंबरीच्या लेखनामागची प्रेरणा, कथानक आणि लेखनशैली ह्या विषयी ते म्हणतात की, “महार समाजाचा कादंबरीतून इतिहास मांडावा. ज्यांच्या शौर्याची दखल इतिहासाने घेतली नाही, त्या समाजाला नायकाच्या रूपात साकार करावे, असे मला वाटत होते. अभ्यास करताना असे लक्षात आले की, वनवासी समाजाचीही नोंद इतिहासात नाही. मुघल आणि ब्रिटिश कालखंडातील सामाजिक संघर्ष आणि सामाजिक ताणाबाणा मांडताना समाजालाच नायक म्हणून साकार करावे, असे मला वाटत होते. ‘सनातन’ या कादंबरीतून ते मला मांडता आले.” दलितांची वंचना, सामान्यांची वेदना ही सनातन आहे हे दाखवण्यासाठीच कादंबरीचे नाव सनातन असावे असे वाटते.

“ सुरुवातीच्या काळात मी माझ्या लेखनातून नकार, विद्रोहाची मांडणी केली आहे. पण, आता काळ बदलला असून, आजच्या काळात आक्रस्ताळी भूमिका घेता येणार नाही. समतोल विचाराने जगावे, लिहावे लागेल. समन्वयाची भूमिका घ्यावी लागेल. सर्व समाज जागा झाला आहे. त्यामुळे लेखकाची जबाबदारी वाढली आहे. दलित, पीडित, वंचितांमध्ये परिवर्तन घडवून आणायचे आहे. हे काम करताना आपली संवेदनशीलता जबाबदारीने व्यक्त करण्याचे भानही जपता आले पाहिजे. आपण सामाजिक बंडखोरी करत असलो तरी तिचे स्वरूप समतेच्या स्थापनेसाठी असावे,” असे महत्वपूर्ण उद्गार त्यांनी एका मुलाखतीत काढले आहेत.

काही घटना, काही आख्यायिका, काही कहाण्या, काही लोककथा, अनेक लेखकांनी ह्या विषयावर लिहिलेले साहित्य तसेच गुगल आणि विकिपीडिया वर मिळालेल्या माहितीचा वापर प्रस्तुत कादंबरीत केलेला आहे असे लेखक ह्या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात.

काळाचा एक फार मोठा पट ह्या कादंबरीत लेखकाने उलगडून दाखवला आहे. जवळपास चारशे वर्षांचा कालखंड आहे. मुसलमानी राजवटीपासून सुरुवात होऊन ते स्वातंत्र्याची पहाट जाणवते आहे ह्या काळापर्यंत, विविध भूभागांत इतकेच काय वेगवेगळ्या देशात हे कथानक घडते. राजेशाही, सरंजामशाही कडून लोकशाही कडे होणारा प्रवास आणि त्या प्रवासाची पाळेमुळे आपल्याला आढळतात, लोक राजा झाले पाहिजेत ह्या कादंबरीतील वाक्यात.

धर्मातराने दलितांचे प्रश्न सुटले का? सुटत आहेत का? सुटतील का? ह्या प्रश्नांविषयी देखील ही कादंबरी भाष्य करते. धर्मांतराने भेदभाव संपत नाही. धर्मांतर हा समस्यांवर उपाय नाही हे प्रभावी रित्या कादंबरीत मांडले गेले आहे. मुस्लिमांनी सत्ता काबीज करण्यासाठी, ब्रिटिशांनी व्यापार करण्यासाठी आपल्या देशावर कब्जा केला, धर्मांतर घडवून आणले, पण त्याने दलितांचे प्रश्न सुटले नाहीत. मला इतिहास मांडायचा होता म्हणून मी अलिप्तपणे लिखाण केले, कोणाचीही बाजू न घेता तटस्थपणे दलितांच्या वेदना, दुःख आणि सामाजिक वातावरण सगळ्यांच्या समोर आणले. असे लेखकाचे विधान आहे.

लेखकाने आता प्रक्षोभक विधाने करून चालणार नाही. तर बदला साठी, परिवर्तनासाठी सर्वांची भूमिका तयार केली पाहिजे, असा विचार डॉ. शरण कुमार लिंबाळे ह्यांनी ही कादंबरी लिहिताना केला होता हे लेखनातून तर जाणवते आहेच, पण त्यांनी स्वतः तसे एका मुलाखतीत सांगितले देखील आहे. अनेक वर्षे चळवळीत काम केलेला कार्यकर्ता लेखक, नवा माणूस घडावा, महान राष्ट्राची निर्मिती व्हावी म्हणून सामाजिक भान जागृत ठेवून लिहिताना सनातन मध्ये दिसतो आहे. मानवतावादी परंपरा टिकून राहिली तर बंधुता, समानता ही मूल्ये टिकतील आणि संस्कृतीचे जतन होईल.

सनातन मध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या अनेक रूढी, परंपरा आपल्याला त्या त्या वेळची समाजस्थिती आणि समाज मान्यता ह्यांच्याविषयी न सांगता देखील, बरेच काही सांगून जातात. अगदी थोडक्या शब्दात भरपूर आशय पोचवणे हे लिंबाळे ह्यांच्या लेखनाचे विशेष म्हणायला हवे. ह्या आशयघनतेमुळे केवळ २१० पानांची कादंबरी वाचायला वाचकाला भरपूर वेळ लागतो.

अगदी सुरुवातीच्या काही पानात आलेला होळीचा प्रसंग, महार समाजाच्या होळीच्या विस्तवाने गावाची होळी पेटणे, ह्यातून लेखक बरेच काही सांगतो. तसेच वावटळ आली की ते आत्मे असतात ह्या समजुतीचा उल्लेख वेगवेगळ्या संदर्भात येत राहतो आणि वेगवेगळे अर्थ प्रतीत होत राहतात.

महार लोक सैन्यात भरती होऊ लागतात. भीमनाक सैन्यात भरती होतो. इकडे गावात त्याची आई कोंडामाय मरते तर तिचा अंत्यविधी होऊ शकत नाही. तिचे प्रेत पुरायला जागा नाकारली जाते. हा प्रसंग कादंबरीच्या पहिल्या ५० /५५ पानात येऊन जातो.
नंतर बराच काळ लोटतो. समाज, राज्यकर्ते सगळेच बदलतात. भीमनाकला ब्रिटिश परदेशात पाठवतात. तिथेच त्याचा संसार वाढतो. सगळे जण साखर मळ्यात मजूर म्हणून काम करू लागतात. धर्म बदलतात. ख्रिश्चन होतात. त्याचा नातू कॉर्टर सोनई , मरीआई बघायच्या ओढीने भारतात येतो. सोनईला येतो. तिथल्या महारांत मिसळू पाहतो. तिथे त्यांना मृत प्राण्यांचे मास खाऊ नका म्हणून सांगायचा प्रयत्न करतो. ते ऐकत नाहीत असे दिसल्यावर त्यांनी मृत गाईचे मास खाऊ नये म्हणून मृत गाईच्या धडावर विष्टा टाकतो.
ह्या कृतीने सर्व समाज हादरतो. त्याने गाईची अप्रतिष्ठा केली समजून त्याला मारहाण होते, असे वाटते की इथे कथानक संपले. कोंडामाई ते कॉर्टर असे एक आवर्तन पूर्ण झाले. असे वाटत असतानाच एक कलाटणी येते. हिंदू वाहिनीचा तरुण नेता वेदांत व त्याचे सहकारी तिथे येतात. हल्लेखोरांना ओरडून बाजूला करतात. पण तोपर्यंत झालेल्या मारहाणीने कॉर्टर मरतो.
वेदांत सांगतो की आपण सारे हिंदू आहोत. बंधू बंधू आहोत. बंधुता, समानता हाच राष्ट्राचा प्राण आहे. हिंदू वाहिनीचे तरुण कार्यकर्ते कॉर्टरवर अंत्य संस्कार करणार असल्याचे सांगतात. गुरुजी एका महारावर अंत्यसंस्कार करणार असल्याची बातमी गावभर पसरते. इथे एक आवर्तन पूर्ण होते. समाज बदलला असल्याचे संकेत मिळतात. समानता आणि बंधुता ही तत्वे प्रस्थापित होत आहेत याची ग्वाही मिळते.
आता पुन्हा वावटळ येते आणि कादंबरी संपते पण वाचकाच्या मनात एक वावटळ निर्माण करून.

वृंदा टिळक

Back to top button