Opinion

अंत्योदयासाठी आवश्यक देशी बीजांचे रक्षण – कपिल सहस्रबुद्धे

गेले अनेक दिवस, विशेषतः देशी वाणांची बँक करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री मिळाल्यापासून देशी वाणांची रक्षा हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. हा लेख लिहित असताना वाचनात आलेली बातमी होती ती भंडाऱ्यात लुप्तप्राय देशी बिजांचे रोपण होणार असल्याची. एकिकडे देशी वाणांची संख्या कमी होत चाललेली असताना, दुसरीकडे राहीबाईंसारख्या व्यक्ती, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळासारख्या संस्था त्याचे रक्षण करण्यासाठी धडपडत आहेत. याच दृष्टीकोनातून देशी बीजाच्या संरक्षणाचे महत्त्व समजून घेण्यासाठी योजक सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लानिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेण्टचे सह संचालक कपिल सहस्रबुद्धे यांच्याशी संवाद साधला. समाजाच्या अंत्योदय आणि अन्नसंस्कृतीच्या रक्षणासाठी बीजरक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सहस्रबुद्धे म्हणाले की, समाजाचा विकास होताना तळागाळातल्या माणसापर्यंत झाला पाहिजे. शेतकरी, विशेषतः छोटे शेतकरी हा आपल्या सामाजिक व्यवस्थेचा सर्वात शेवटचा घटक मानला जातो. या शेतकऱ्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. या शेतकऱ्यांसाठी शेती हा केवळ व्यवसायाचा भाग नाही तर तो त्याच्या जीवनाचाच एक घटक आहे. यातून त्याचे वर्षभराचे धान्य निघते, उर्वरीत धान्याचा वापर करून तो अन्य गरजांची पूर्तता करतो. पारंपरिक बियाणांचे या शेतकऱ्यांच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्व आहे. नवीन धान्ये, संकरित, जीएम बियाणी विशिष्ट उद्देशाने तयार केली जातात. वास्तवात, स्थानिक वातावरणात तयार झालेले धान्य त्याला त्या त्या वातावरणात निश्चित अन्नसुरक्षा देऊ शकते.

सध्या या शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी शासनावर अवलंबून राहावे लागते. त्यात ती बियाणी प्रतिकूल वातावरणात तग धरत नाहीत. उदाहरणार्थ अचानक किटकांचा हल्ला होणे, खूप पाऊस पडणे, अतिशय कमी पाऊस पडणे, यात टिकून राहण्याची या बियाणाची क्षमता नाही. उलट पारंपरिक बियाणी मात्र अशा परिस्थितीतही निश्चितच किमान उत्पादन तरी नक्की देतात. गंमत अशी आहे की काही पारंपरिक बियाणी प्रतिकूल वातावरणात चांगले पीकही देतात. संगमनेरमध्ये देवठाण नावाची एक बाजरी आहे. जितका दुष्काळ प्रखर तितके पीक अधिक चांगले येते. निसर्गातील बदलांना तोंड देण्याची त्यांची तयारी असते. सत्य असे आहे की, कित्येक शे वर्षांपासून आपल्या शेतात प्रयोग करत करत अशी टिकाव धरणारी बियाणी तयार केली आहेत.

भारतातील स्थानिक गरजा, भौगोलिक क्षेत्र आणि पर्यावरणीय स्थिती याचा विचार करूनच बीजांची निर्मिती करण्यात आली. ओरिजिन ऑफ क्रॉप्सच्या मते(https://blog.ciat.cgiar.org/origin-of-crops/) भारतीय उपखंडात २९ प्रकारची मूळ पिके तयार झाली आहेत. यात डाळी, मसाले, भेंडीसारख्या भाज्या, आंबा-केळी अशी फळे यांचा समावेश आहे. म्हणजेच भारताच्या मातीत वैविध्यपूर्ण पिकांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे, ते ही वेगवेगळ्या पर्यावरणीय स्थितीत. आजमितीस आपल्याकडे भाताचे अगणित प्रकारचे वाण उपलब्ध आहे. नवापूरसारख्या छोट्याशा तालुक्यातही ज्वारीचे २९ प्रकार आहेत. भारतभरात वांग्याच्या ६५० ज्ञात जाती आहेत. वनवासी क्षेत्रातील सगळी वाणे अजूनही आपल्याला माहिती नाहीत.

हरित क्रांतीने शेतीव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात, हवे तसे गुणधर्म असलेले पिक घेता यावे अशी ‘मॉडिफाईड’ बियाणी शास्त्रज्ञांनी तयार काढली. त्याचे व्यवस्थित मार्केटिंग करून ती शेतकऱ्यांना सबसिडीसारख्या सुविधेसह ती घरपोच मिळतील याचीही व्यवस्था करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक पिकांवर परिणाम होत गेला व जिथे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस आपल्या देशात दोन लाखांहून अधिक भाताच्या जाती होत्या त्या शंभर वर्षात केवळ ५० हजारांवर येऊन ठेपल्या. भारतात आपल्या परिसरात पिकवता आणि प्रक्रिया करता यावी, त्या त्या हवामानाला पचतील अशीच पिके घेण्याची परंपरा कायम राहिली आहे. सध्या अनेक शेतकरी व्यावसायिक सोयाबीनसारख्या तेलबियांचे पीक घेतात. परंतु, सोयाबीनची बी कडक असल्याने त्याचे तेल घरच्या साध्या घाण्यावर आणि रासायनिक प्रक्रिया केल्याशिवाय काढता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ते कारखान्यांना विकावे लागते. केवळ सोयाबीनचेच पीक घेतल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न उभा राहातो. कधी अमाप पीक आल्याने भाव पडतो तर कधी ते विकले जात नाही. यामुळे अनेकदा व्यावसायिक वा श्रीमंत शेतकऱ्यांना फारसा फरक पडत नसला तरी छोटे शेतकरी मात्र यात पिसले जातात. म्हणजे खायचे तेल शेंगदाण्याचे आणि पीक सोयाबिनचे. त्यामुळे हातात धान्य असूनही शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग होत नाही. या सगळ्यात गावातील शेंगदाणे, करडईच्या तेलाची परंपरा मागे पडली.

मुळात बीजरक्षणातील अंत्योदयाचा विचार या छोट्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे एखाद्या गावात जेव्हा देशी पद्धतीचे पीक घेतले जाईल तेव्हा त्यावरील प्रक्रियाही देशी पद्धतीची असेल. त्यामुळे पंचक्रोशी स्वयंपूर्ण होत जाईल. त्या त्या गावाच्या वातावरणास अनुकूल अशी जीवनसत्वे त्या धान्यातून मिळतील. छोट्या व्यवस्था, स्थानिक पातळीवर समाजाने संचालित केलेल्या असतील व सरकार हे केवळ मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असेल. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार हाच तर आहे. एखाद्या व्यक्तीचा विकास ही भारतीय संकल्पना नाही. समाजाने सर्वांना सोबत घेऊन स्वतःचाच विकास करणे अपेक्षित आहे. देशी बीजे यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. गावपातळीवर स्वावलंबनाची व्यवस्था यामुळे तयार होऊ शकते, सामुहिक उत्कर्ष होऊ शकतो. आपल्याकडे केवळ माणसेच नव्हे तर पशुपक्ष्यांचाही परिवारातले सदस्य असा विचार केला जातो.

योजकच्या मध्य भारत वनांचल समृद्धी योजनेअंतर्गत नंदूरबारच्या नवापूर तालुक्यात एक स्वयंसेवी संस्था ज्वारीची माहिती गोळा करीत होती. एका म्हाताऱ्या बाईच्या शेतात छोट्याशा भागात वेगळ्या प्रकारची ज्वारी लावलेली होती. तिला जेव्हा कारण विचारले तेव्हा म्हणाली की ही नव्या प्रकारची ज्वारी पक्ष्यांना खाता येत नाही. शेत तर सगळ्यांचे आहे म्हणून तीन चार ओळींत ही वेगळी पारंपरिक पक्ष्यांना खाता येईल अशी ज्वारी पेरली आहे. ही आमची वर्षानुवर्षांची परंपरा आहे.

आज संपूर्ण जग अधिक उत्पादकतेच्या दिशेने धावत असताना एका छोट्या खेड्यातली गरीब महिला मात्र पक्ष्यांसाठी वेगळे धान्य पेरते, ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते. हा खरा भारत आणि भारताची खरी संस्कृतीही हीच. ते वेगळे नाहीतच. व्यक्ती ते समष्टी हा विचार आपल्या परंपरेने करायला शिकवला आहे. समाजाचा, सर्व घटकांचा एकत्र विकास. सर्वांचा लाभ या भूमिकेतूनच खरा विकास साधणार आहे. पारंपरिक भारतीय बीजे यात मोलाची भूमिका बजावतील यात शंका नाही. स्थानिकांना घर, समाज, पशुपक्षी, औषधी, पोषणमूल्ये या सर्वांचा विचार करून पिके तयार केली. शेतात पिकणारे केवळ धान्यच नव्हे तर औषधी वनस्पती, कापडासाठी तसेच अन्य चीजवस्तुंसाठी लागणारा कच्चा माल हे सगळेच आपल्याला उपलब्ध होत असते. केवळ अन्नधान्यच नव्हे तर अन्य उपयुक्त झाडांच्या बीजांचेही माणसाने रक्षण केले. जे काही आपण शतकानुशतके कमावले ते सारे गेल्या काही दशकांत गमावून बसलो.

परंतु प्रयत्नपूर्वक हळूहळू आपण आपली ही ओळख परत मिळवायला लागलो आहोत. राहीबाईंचे कार्य यात निश्चित मोलाचे आहे. २०१९साली अक्षय कृषी परिवाराच्या वतीने एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. असेच अनेक प्रयत्न देशभरात १०० ठिकाणी झाले. अशा घटनांमधून आणि घरातल्या ज्येष्ठांकडून प्रेरणा घेऊन जाणकाऱ शेतकऱ्यांनी देशी बीजाच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ते प्रयत्न अधिक जोरकसपणे होणे आवश्यक आहेत. बीजसंस्कृतीच्या रक्षणाचे महत्त्व आणि स्व पलिकडे जाऊन संपूर्ण समाजाचा विचार प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे.

मुलाखत व शब्दांकन : मृदुला राजवाडे
**

Back to top button