OpinionSeva

कोरोना संकट काळात ‘सेवांकुर’ चाही मोलाचा वाटा

वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यात सेवावृत्ती रुजावी म्हणून सेवांकुर ही समाजसेवी संस्था कार्यरत आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असताना केवळ पुस्तकी शिक्षण मिळते. हे शिक्षण का घ्यायचे? याचा हेतू काय व समाजात लोक किती वेगवेगळय़ा प्रकारे सामाजिक भान ठेवून काम करतात याचे दर्शन विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी निवासी शिबिरे आयोजित केली जातात. वनवासी भागात जाऊन विद्यार्थ्यांना तेथे लोक नेमके कसे राहतात? डॉक्टर म्हणून आपली भूमिका नेमकी काय असायला हवी? यामागचा हा हेतू असतो. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे मागच्या वर्षीपासून अशी शिबिरे भरविण्यास अडचणी येत असल्यामूळे या संकट काळात जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याच्या हेतूने सेवांकुर चे विद्यार्थी सेवांकुरच्या निरनिराळ्या उपक्रमांत सहभागी झाली आहेत. या विद्यार्थ्यांनी कोरोना संकट काळात स्वयंस्फूर्तीने वॉरियर बनून लाखो लोकांना मदत केली आहे. त्यांनी धारावीसारख्या भागात जाऊन करोना चाचण्या तर केल्याच पण घाबरलेल्या समाजाचे योग्य समुपदेशन सुद्धा केले. सेवांकुरच्या शेकडो निर्भीड स्वयंसेवकांचा कोरोना विरुद्धच्या लढाईत मोलाचा वाटा आहे.

सेवांकुर या संस्थेच्या माध्यमातून कोविडच्या पहिल्या टप्प्यापासूनच स्क्रीनिंग, जनजागरण, समुपदेशन अशा विविध प्रकारचे कार्य केले जात आहे. पुणे, औरंगाबाद, मुंबईसह महाराष्ट्रातील अन्यत्र अनेक भागात हे कार्य सुरु होते. आजही ते सुरू आहे. सन २०२० मध्ये सेवांकुरने कोविड काळात मुंबईतील धारावीमधल्या अतिगजबजलेल्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी जाऊन घरातील हरेक सदस्याचे स्क्रिनिंग केले. यामध्ये २०० डॉक्टरांचा सहभाग होता. याशिवाय मुंबईतील इतर सेवावस्त्यांत जाऊन तेथील नागिरकांचे स्क्रिनिंग करून ज्यांचे शरीराचे तापमान जास्त आहे, त्यांच्याबाबत पालिकेला सूचित करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. यावर्षी अर्थात २०२१ मध्येही अशा प्रकारचे स्क्रिनिंग सुरु आहे. यावर्षी केवळ स्क्रिनिंगच नाही तर तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सेवांकुर आपले समाजकार्य करीत आहे. यामध्ये कोविड लसीकरण जागरूकता मोहीम, ज्ज्ञ डॉक्टरांचे आभासी मार्गदर्शनपर व्याख्यान तसेच वैद्यकीय सुविधांसाठी आवश्यक असणाऱ्या अधिकृत याद्या बनविणे यांचा समावेश आहे.

कोविड लसीकरणाबाबत समाजात अजूनही बरेच संभ्रम आढळतात. म्हणून डिजिटल आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही माध्यमातून सध्या लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे कार्य सेवांकुरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. लस कुठली घ्यावी, किती दिवसानंतर घ्यावी, प्लाझ्मा कधी दान करावा या आणि अशा अनेक प्रश्नांमुळे अनेकदा लोकांमध्ये गैरसमजही निर्माण होऊ शकतात. हे गैरसमज होऊ नयेत. आणि लोकांना जास्तीत जास्त खात्रीशीर माहिती मिळावी, मार्गदर्शन मिळावे, यासाठी सेवांकुर मार्फत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आभासी स्वरूपात आयोजित करण्यात येते. आठवड्यातून एक किँवा दोनदा ही व्याख्याने आयोजित केली जातात. या व्याख्यानांमुळे अधिकाधिक लोकांना उचित असे मार्गदर्शन मिळत आहे. मार्गदर्शनाची ही सेवा एप्रिल महिन्यापासून सुरु करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर औरंगाबाद मध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊनही कोविड लसीकरण जागरूकता मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबई येथे जुहू मध्ये ६ बेड्सचे रुग्णालय सुरु करण्यात आले. सेवांकुरचे स्वयंसेवक तिथे कार्यरत असणार आहेत.

प्लाझ्मा दानाबाबत जनजागृती आणि प्लाझ्मा डोनर्स व रिसिव्हर या दोन्हींची सूची तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार ते १५०० प्लाझ्मादात्यांची सूची तयार करण्यात आली आहे. प्लाझ्माची आवश्यकता असलेल्या कोविड रुग्णांना आतापर्यंत मोठ्या संख्येने प्लाझ्मा दान करण्यात आले आहे. कोरोना संक्रमित रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन सिलींडर, बेड्सची उपलब्धता असणाऱ्या याद्यांची पडताळणी करून ज्या अधिकृत, खात्रीशीर आहेत, अशा याद्या तयार करण्याचेही काम सुरु आहे. त्या अधिकृत याद्या गरजूंना वेळेत मिळाल्यामुळे त्यांचा मानसिक भार हलका होत आहे.

कोविडच्या संसर्गात विशेषतः दुसऱ्या टप्प्यात नागरिकांचे मनःस्वास्थ्य हा एक मोठाच प्रश्न वैद्यकीय क्षेत्रासमोर उभा राहिला आहे. म्हणून संभाजीनगर येथील सेवांकुरच्या मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कोविड कक्षात राहणाऱ्या रुग्णांचे मनःस्वास्थ्य जपण्यासाठी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णांचा एकटेपणा घालविण्यासाठी, त्यांना प्रेमाची, आपुलकीची साद घालणारी भावनिक पत्रे लिहिली आहेत. या पत्रांमुळे रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास आणि ते टवटवीत राहण्यास मदत होत आहे.

स्वत: साठी जगतांना सामाजासाठीही थोडं जगावे, आपले आयुष्य सेवेच्या परीसस्पर्शाने आशय संपन्न करावे, आपल्या स्तरावर राष्ट्रनिर्माणाचा पाया असणारे एखादे सेवाकार्य सुरू करण्याची प्रेरणा आणि संकल्प सेवांकुरने तरुणाईला दिला. सध्याच्या या प्रतिकूल परिस्थितीत सेवांकुर राबवित असलेले विविध उपक्रम, सेवाकार्य स्तुत्य असे असून यात सहभागी झालेले विद्यार्थीही जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याच्या हेतूने अतोनात मेहनत घेत आहेत. सेवांकुर आणि ते घडवीत असलेल्या या भावी डॉक्टरांना त्यांच्या या सामाजिक कार्याकरिता मनापासून शुभेच्छा !!

  • तृप्ती पवार, विश्व संवाद केंद्र, मुंबई
Back to top button