OpinionSeva

कोरोना प्रभावित कुटुंबियांचे सक्षमीकरण करणार ‘अक्षय सहयोग’ !

ग्रामविकास, वनवासी विकास, अपारंपरिक ऊर्जेचा विकास, पर्यावरण रक्षण आणि गोवंश वृद्धी या पाच मुख्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असणारी भाईंदर, उत्तन येथील केशवसृष्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित सामाजिक संस्था आपल्या वैभवशाली कामांमुळे प्रचलित आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या संस्थेने ‘अक्षय सहयोग’ हा एक नवीन उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना ने प्रभावित झालेल्या कुटुंबियांचे सशक्तीकरण केले जाणार आहे.

२०२० सालापासून कोरोनाने जगभरात हाहाकार माजविला आहे. कोरोनाशी झुंज देणाऱ्या कोरोनाग्रस्तांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे, बसत आहे. त्यात कोरोनाने प्रभावित झालेल्या कुटुंबियांचे हाल तर अत्यंत केविलवाणे आहेत. यावर्षी कोरोनाची आलेली दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयावह आणि जीवघेणी ठरत आहे. मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यातच घराचा पोशिंदाच या महामारीत गतप्राण झाला तर त्याच्या मुला-बाळांची, कुटुंबाची होणारी वाताहत तर न बघावणारी असते. उपासमारीमुळे संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होणे हे वेदनादायक, क्लेशदायक असते. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याच्या दुःखातून, या वेदनेतून सावरता येत नाही तोपर्यतच आपल्या दैनंदिन मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना वणवण करावी लागते. आपल्यावर आलेली सर्व संकटे विसरून पुन्हा जीवन जगणाऱ्यांना एक मायेचा, आपुलकीचा हात देण्यासाठी केशवसृष्टीने ‘अक्षय सहयोग’ उपक्रमांतर्गत आपल्या सेवाकार्यास प्रारंभ केला आहे.

कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनच केशवसृष्टी समाजाच्या उत्थानासाठी सेवाकार्य करीत आहेच. मात्र त्यासोबतच कोरोनाने प्रभावित झालेल्या कुटुंबियांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्या सशक्तीकरणासाठी सररसावले आहेत. या कुटुंबांना केवळ आर्थिकच नव्हे तर समग्र लाभ मिळावा यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यांच्या सशक्तीकरणासाठी उपाय योजना करीत असताना मानवी जीवनातील विविध बाबींचा विचार करण्यात येत आहे.

केशव सृष्टीचे ज्येष्ठ सदस्य श्री. बिमल केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील तरुणांचे एक पथक अशा कुटुंबांचे प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करीत आहेत. सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांसह, विविध विचारमंथन सत्रांमधून सुयोग्य अशा कल्पना आणि सूचना विचारात घेतल्या जात आहेत. पीडित कुटुंबांसाठी जी मदत केली जाणार आहे त्यामध्ये शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण, वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर सहाय्य, करिअर समुपदेशन, मानसिक आरोग्य सल्ला, विवाह मदत, मासिक शिधावाटप, निवारा, सरकारी योजनेचा लाभ आदी महत्वपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमात इतर अंतर्गत मदतीचाही खूप लक्षपूर्वक अभ्यास केला जात आहे. त्याप्रमाणे तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही घेतले जात असून त्यानुसार कार्यपद्धती ठरविली जात आहे. तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधण्यात येत आहे.

श्री निशी सिंघला यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील १० ते १५ तरुणमंडळी या उपक्रमातील विविध मुद्द्यांवर काम करीत आहेत. यातील प्रत्येक व्यक्तीने एका विषयावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी घेतली आहे. प्रत्येक दोन दिवसानंतर या घडामोडींवरील आढावा बैठक घेण्यात येते. केशवसृष्टीचे ज्येष्ठ सदस्यांचे पथक धोरण ठरविणे तसेच वैधानिक आवश्यकता पूर्ण करणे इ. वर काम करीत आहेत. अडचणींच्या त्वरित निराकरणासाठी पॅनेलवर तज्ज्ञ जोडले जात आहेत.

‘अक्षय सहयोग’ या उपक्रमाची संपूर्ण कल्पना अशी की, अडचणीच्या वेळी वा प्रतिकूल परिस्थितीत एक प्रभावी सामाजिक व्यासपीठ तयार करून मदत करणारे दानशूर आणि ज्यांना मदत हवी आहे, असे दोन्ही या सामाजिक व्यासपीठामार्फत एकत्र येऊ शकतात. कोरोनामुळे अनेक कुटुंबांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक खच्चीकरण झाले आहे. त्यांना आपल्या मायेची, आत्मीयतेची, आपुलकीची गरज आहे. त्यांच्यावरील संकटातून पुन्हा उभारी घेण्यासाठी त्यांना त्यांना मदत करायची आहे. पीडित कुटुंबांच्या जीवनात धैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून ते विशिष्ट कालावधीनंतर स्वत: चे जीवन जगण्याचा निर्णय घेऊ शकतील. आपल्या प्रत्येक मदतीमुळे त्यांचे कुटुंब सावरण्यास मदत होणार आहे. सध्यातरी हे मदतकार्य मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांतच मर्यादित असणार आहे.

या महत्वपूर्ण उपक्रमात मदतीचा हात मिळावा म्हणून केशवसृष्टीच्यावतीने आत्मीयतेने या कुटुंबियांचा सांभाळ करणाऱ्या दानशूर कुटुंबियांचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. अशा दानशूर कुटुंबियांनी तसेच या कोरोना प्रभावित कुटुंबासाठी काम करण्यासाठी स्वइच्छेने पुढे येणारे कार्यकर्ते वा स्वयंसेवक आणि सढळ हस्ते मदत करणाऱ्या दानशूरांना आवाहन करण्यात येत आहे. आपली एक मदत अशा गरजूंसाठी दिशादर्शक ठरणारी आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 7777017419 या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा Website – www.akshaysahayog.org , FB – facebook.com/AkshaySahayog/ , Twitter – https://twitter.com/ASahayog. यावर भेट द्यावी किंवा सदर माहितीपत्र भरून पाठवावे. Google form link – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfhxgJqrZJB-RYIX8rce-ZPr70CYwfJkfzI4TEmFZ-yXuSFaw/viewform?usp=send_form

Back to top button