OpinionSeva

सुनील देशपांडें चे अचानक जाणे

महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात मेळघाटच्या संपूर्ण बांबू केंद्राच्या सुनील देशपांडेंचे नाव सर्वांना सुपरिचित आहे.

स्वाभाविक नेतृत्वाचा धनी होता सुनील!

अपनत्व, नेतृत्व व कर्तृत्व याचा अनोखा मेळ सुनीलजी देशपांडें मध्ये होता.

माझा परिचय सुनील शी अभाविप मध्ये १९९६ च्या देवलापार अभ्यासवर्गात झाला होता. अभाविप ची सैद्धांतिक भुमिका हा विषय त्याने मांडला होता. त्यावेळी त्याचे ठेंगणे व काटके शरीर बघितल्यावर हा छात्र नेता आहे, यावर विश्वास बसणे शक्य नव्हते. माईकची व लाऊडस्पीकर ची सुनील ला गरज नसायची. सभेत एकदा बोलायला उभा झाल्यावर हा खणखणीत आवाज या काटक्या शरीराचाच आहे का? हा प्रश्न मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांना पडे.

सुनील ला अभिनयाची उपजतच जाण असल्याने त्याची व्यावहारिक जीवनातही शब्दफेकीवर जबरदस्त पकड होती. विद्यार्थी जीवनात सुनील कसलेला नाट्य अभिनेता होता. त्याला समाजसेवेची आवड असल्याने त्याने BSW व MSW केले होते.

विद्यार्थी जीवनात अभाविप मध्ये काम करतांना अनेक उपजत गुण विकसित झाल्यावर या गुणांचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून शिक्षण आटोपल्यावर अनुभव घ्यायला त्याने बिहार मध्ये काही वर्ष महेश शर्मां सोबत काम केले. नंतर काहीवर्ष चित्रकुटला नानाजी देशमुखांसोबतही काम केले.

या दोन्हीही ठिकाणी सामाजिक जीवनातील अनेक बारकावे अभ्यासल्यावर सुनील ने मेळघाट हा अतिशय मागासलेला भाग आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडला.

याच दरम्यान समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या निरुपमा कुळकर्णी यांचे सोबत त्यांचा विवाह झाला. विवाहाचे पहिलेच सुनीलनी निरुपमा वहिनींना आपले जीवीत कार्य वनवासींमध्ये कार्य करण्याचे असल्याचे सांगितले होते. निरुपमा वहिनींनीही सहज होकार दिला. त्यामुळे लग्न झाल्यावर मेळघाटातल्या लवादा या गावच्या एका चंद्रमौळी झोपडीत दोघांचा संसार सुरू झाला.

मेळघाटला “कुपोषण” आहे, हा शब्दच सुनील ला सहन व्हायचा नाही. मेळघाटाच्या कोरकूंमधले हुनर (कर्मकौशल्य) सुनील नी ओळखले व या सुप्त हुनरीलाच मेळघाटचा उत्थान बिंदू बनवण्याचे त्याने ठरवले.

“संपुर्ण बांबू केंद्र” या नावाची संस्था रजिस्टर्ड करून तिथे बांबू कारागिरी शिकवणे सुरू केले. यामाध्यमातून तिथल्या लोकांना रोजगार मिळू लागला.

सुनील केवळ संपूर्ण बांबू केंद्रातच रमला नाही. कर्नाटकातल्या अदिलाबाद च्या श्री रविंद्र शर्मांसोबत संबंध आल्यावर त्यांना आपले समाजसेवेचे गुरू मानले. देशभरात कुशल कारागीर बनवून कर्मकौशल्यावर जगणारा कारागीर तयार करायला तो देशभर प्रवास करायला लागला. “कारागीर पंचायत” द्वारे हुनर खोज यात्रेच्या माध्यमातून त्याने देशभरातील हरहुन्नरी लोकांचा संग्रह करून अनेक ठिकाणी त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले.

इकडे संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून काम वाढवत बांबूला इंजिनिअरिंग मटेरिअल म्हणून मान्यता मिळवून देवून बांबूला व पर्यायाने बांबू कारागिराला त्याने समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.

संपूर्ण बांबू केंद्रामुळे मेळघाटची कुपोषित ही ओळख पुसली जाऊन “हुनरमंद” व “उज्जल सांस्कृतिक परंपरेचे वाहक” अशी नवीन ओळख जगाला झाली.

मेळघाटातील बांबूच्या वस्तूंना आता देशभरात ओळख मिळायला लागली. “सृष्टीबंध” या नावाने गावा गावात बांबूच्या राख्या तयार व्हायला लागल्या. त्यांची शाळांमध्ये व इतर ठिकाणाहून विक्री होवू लागली. महाराष्ट्राबाहेरही या राख्या देशभर सर्वत्र पोहचल्या. २०१८ ला मेळघाटच्या कारिगर भगिनींनी ही राखी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बांधली होती.

संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून समाजातला बराच वर्ग मेळघाटासाठी काम करायला उत्सुक राहू लागला. यावर्गानेच निधी संकलन करून या कामाची व्यापकता वाढवायला हरिसाल गावाच्या बाजूला “ग्राम कोठा” येथे सहा एकर जागा विकत घेतली व तेथे बांबू शिवायही इतर कर्मकौशल्य (हुनर) शिकवण्याचे गुरूकुल उभारले आहेत. या प्रकल्पाचे नाव ” ग्रामज्ञानपीठ ” असे आहे. २०१२ ला या प्रकल्पाचे भूमिपूजन परमपूजनीय सरसंघचालक माननीय मोहन जी भागवत यांचे हस्ते झाले आहे.

मेळघाटातून वाहणारी “सिपना नदी” मेळघाटाची जीवनरेखाच आहे. या नदीचा सर्वांगीण अभ्यास करुन मेळघाटाच्या उत्थानासाठी या नदीचा काय उपयोग करून घेता येईल? हा विचार मनात आणून सुनील ने याचा अभ्यास करायला २०१५ पासून दरवर्षी डिसेंबर महिन्यात सिपना शोध यात्रेचे आयोजन सुरू केले. समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेले अनेक युवक युवती या सिपना शोध यात्रेत सहभागी होत असतात.

मेळघाटातील वनवासी बंधूंना बांबूचे घर बनवण्याचे प्रशिक्षण ही दिले गेले. मागे गुजरात च्या भुज ला भुकंप झाल्यावर तिथे झालेल्या हानीत भराभरा बांबूचे घरं उभारून जनजीवन पुन्हा स्थिर करण्यासाठी संपूर्ण बांबू केंद्राचे कार्यकर्ता अहोरात्र झटले होते.

समाजाबद्दलच्या आपूलकीतून सुनीलने आपले कर्तृत्व व नेतृत्व मेळघाटातील व देशातील कारागिरांच्या सामाजिक उत्थानासाठी अविश्रांत वापरले. आता या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकठिकाणी असे वनवासींचे कर्मकौशल्य विकसित करणारे प्रकल्प उभे राहू शकणार होते….. पण
२०१८ ला अदिलाबादचे रविंद्र शर्मा “गुरूजी” कँसर ने गेलेत. लगोलग अगदी अडीच वर्षांच्या फरकाने त्यांचा उत्तराधिकारी सुनीलही अगदी आकस्मिक गेला.

कारागीर पंचायत आता खरोखरच पोरकी झाली आहे. पण सुनील जी व रविंद्र शर्माजींनी नेहमीच विकेंद्रित व्यवस्थेचा पुरस्कार केलेला असल्याने अनेक कार्यकर्ते तयार झालेले आहे. हे सर्व कार्यकर्ते सुनीलजींपासून प्रेरणा घेवून हा जगन्नाथाचा रथ लीलया ओढत वनवास्यांचे सामाजिक उत्थान घडवून आणतीलच!

सुनील नेहमी म्हणायचा…
कोणालाही कमी समजू नका, त्याची कीव करू नका, त्याच्या क्षमतेला ओळखून त्याला संधी द्या. तो नक्की त्या संधीचे सोने करेल!
कल्पकतेने काम करण्यावर सुनील चा विशेष भर असे.

सुनीलजींच्या अचानक जाण्याने त्यांची आई, निरुपमा वहिनी व मुग्धा यांच्या सहित संपूर्ण बांबू केंद्र, ग्राम ज्ञानपीठ व कारीगर पंचायतच्या कार्यकर्त्यांना मोठाच धक्का बसला आहे. त्यातून सावरायला भगवंताने त्यांना शक्ती द्यावी ही प्रार्थना!

स्वर्गीय सुनील जी देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
भगवंताने त्यांना सद्गती प्रदान करावी ही प्रार्थना!

किशोर पौनीकर, नागपूर

Back to top button