NewsSpecial Day

केवलज्ञानी भगवान महावीर

जैन (jain) परंपरा वेदपूर्व काळापासून असण्याचे पुरावे आहेत. काही लोकांच्या मते सिंधुसंस्कृती मधील लोक मूळचे जैन असावेत.

-ऋग्वेदात ऋषभदेवांचा उल्लेख आदराने केलेला आहे. त्यामुळे किमान वेदकालीन परंपरेला समांतर श्रमण परंपरा होती हे निश्चित.

-भगवान ऋषभदेव हे जैनांचे पहिले तीर्थंकर आहेत. त्यांना भरत चक्रवर्ती व बाहुबली हे दोन पुत्र होते. यांपैकी भरत राजाचा उल्लेख भागवतात जडभरत म्हणून येतो. त्यानंतर अजितनाथ हे तीर्थंकर प्रसिध्द आहेत. हे इक्ष्वाकु वंशातील होते. गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या भगिरथाचे आजोबा ! सगर यांचे चुलतभाऊ.

-नंतर काश्यप गोत्रोपन्न श्रीसंभवनाथ, नंतर सुविधीनाथ यांच्यापर्यंत शुद्ध जैन परंपरा आढळते. बावीसावे तीर्थंकर नेमिनाथ यांचा विवाह कंसाची बहीण राजीमती हिच्याशी ठरला होता. मात्र वैराग्य उत्पन्न होऊन ते तपश्चर्या करण्यास निघून गेले. हरिवंशात हा उल्लेख आहे.

-मात्र आता उपलब्ध असलेले जैन साहित्य महावीर वाणी मधीलच आहे.

-वर्धमान महावीर (Vardhman Mahaveer) ही ऐतिहासिक प्रमाणसिध्द व्यक्तिरेखा आहे. भारतामध्ये इतिहासाचे सुसंगत ज्ञान खरोखर महावीर व गौतम बुद्ध यांच्या कालखंडापासून मिळते

-गौतम बुद्धांच्या जीवनाची माहिती आपणा सर्वांना असते. त्यांनी स्वतः – साधना करून मग साधना मार्ग व दार्शनिक मांडणी केल्याचे आपण जाणतो.

-त्याच कालखंडात महावीरांनी पण स्वतः साधना करून, मगच साधना मार्ग व दर्शनाची मांडणी केली. परंतु त्याचा तितका उहापोह केला नाही.याचे कारण त्यांच्या मागे दीर्घ तीर्थंकर परंपरा होती. त्यामुळे त्यांनी केलेली मांडणी वेगळी असू शकते, हे लक्षात घेतले जात नाही.

-जीन शासनाचा शाश्वत गाभा तसाच ठेऊन जैन मताची पूर्णपणे नूतन, कालसुसंगत मांडणी महावीरांनी केली. जी समकालीन बुद्धांपेक्षा वेगळी होती. एकाच रोगावर दोन संशोधकांनी वेगवेगळी औषधे शोधून काढली होती!! एकाने विपस्सना तर दुसऱ्याने प्रेक्षाध्यान!!

-इसवीसन पूर्व ६९६मध्ये भ. महावीरांचा जन्म झाला. त्यांचा विवाह यशोदा नामक सुकन्येशी झाला होता. वर्धमान महावीरांना एक मुलगी होती. नंतर वर्धमानांना वैराग्य आले. वडील भावाच्या संमतीने त्यांनी तिसाव्या वर्षी संन्यास घेतला. त्यानंतर बारा वर्षे तपश्चर्या केली. वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले.

-संन्यास घेतल्यानंतर महावीर कर्मार या गावी काही काळ राहिले. तेथे त्यांनी ध्यानाचे काही प्रयोग केले. ध्यानासबंधी विशिष्ट आसनांचा ते आग्रह धरत नसत.कधी बसून तर कधी उभे राहून ते ध्यान करत.

या काळात त्यांनी कायोत्सर्ग मुद्रा साध्य केली.म्हणजे ध्यान करतांना श्वासा सारखी सूक्ष्म क्रिया सोडून अन्य सर्व क्रियांचे विसर्जन होय! त्राटक आणि ध्यान यातून कायोत्सर्ग साध्य होतो. या नंतर महावीर दृढभूमी प्रदेशात गेले. तेथे त्यांनी एकरात्री प्रतिमा नामक साधना केली.

साधनेच्या या प्रकारात पहिले तीन दिवस उपवास केला जातो. तिसऱ्या – दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात कायोत्सर्ग करून सरळ उभे राहिले जाते. डोळे स्थिर करून उघडझाप बंद केली. भय आणि देहाध्यास नाहीसे करणारी ही साधना आहे.

यामध्ये साधक ध्यानाच्या अंतःस्तलात खोल शिरतो, संस्कारांच्या घडामोडींचा सामना करावा लागतो. भूतकाळाचा अनंत पट त्याला आतील समोरून सरकत जातो. त्यावेळी जो अविचल राहतो तो प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करतो. आणि जो विचलित होतो तो उन्मत्त व रुग्ण होतो.साधनेच्या अकराव्या वर्षी भ. महावीर सानुलठ्ठीय गावात विहार करत होते. तेथे त्यांनी भद्रप्रतिमा ध्यान केले. हे ध्यानसत्र सोळा दिवस सोळा रात्री सुरू होते. एकांत स्थानी महावीर ध्यान करत.बसलेल्या अवस्थेत ते पद्मासन, पर्यकासन, विरासन,गोदोहीक आसन, उत्कटासन यांचा वापर करत.

अशा प्रकारे केवल ज्ञान प्राप्त झाल्यावर प्रभू महावीरांनी जैन दर्शन व साधनेचा उपदेश करण्यास सुरुवात केली. तीच महावीर वाणी होय तेच जैन दर्शनाचे मूळ.

नमो अरिहंताणम

जय जीनेंद्र।

लेखिका – रमा गर्गे

Back to top button