CultureHinduismNewsSpecial Day

देव मस्तकी धरावा..

 सर्वच संतांनी लोकांना ईश्वरभक्ती शिकवली. विशेष म्हणजे “देव मस्तकी धरावा,अवघा हलकल्लोळ करावा ” हे समर्थ रामदासांनी राजे संभाजी महाराजांना पत्र लिहून त्यात हे मार्गदर्शन केले.

रामदासांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. समाजाची गुलामगिरीतील बिकट अवस्था बघीतली.त्यावेळी ठिकठिकाणी मुघलांचे राज्य होते.त्यांनी सर्वत्र अत्याचार चालविले होते. देवळे पाडली जात होती.धर्मांतरण मोठ्या प्रमाणात केले जात होते. माता भगिनींना पळवून नेणे, त्यांचेवर अत्याचार करणे, गुलामांच्या बाजारात विकणे, बादशहाच्या जनानखान्यात  भरती करणे हे सर्व नित्याचेच झाले होते.

समाज पूर्णपणे गुलामीच्या मानसिकतेत आला होता. क्षत्रियवृत्ती,पराक्रम समाज विसरला होता. काही लोक लग्न करून काही दिवसांनी कुटुंबाची जबाबदारी सोडून संन्यास घ्यायचे.तेंव्हा समर्थांनी  समाजाला उपदेश केला,

” आधी प्रपंच करावा नेटका “

छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले होते.सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. हा उत्साह  टिकून राहावा यासाठी रामदास स्वामींनी तरूणांना बलोपासना करण्याचे मार्गदर्शन केले. सर्वांनाच भक्ती करता यावी म्हणून सर्वांसमोर त्यांनी ‘राम ‘ हा परमेश्वर ठेवला. अनेक ठिकाणी मठ निर्माण केले . स्वराज्याच्या पाठीशी लोकशक्ती उभी करण्याचे हे महत्वाचे कार्य होते.

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या निधनानंतर  स्वराज्याला खूप मोठा धक्का बसला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला होता. त्यावेळेस त्यांना अनेक प्रकारचा विरोध सहन करावा लागत होता.अशा परिस्थितीत समर्थ रामदास संभाजी महाराजांना पत्र लिहितात. स्वराज्याविषयीची समर्थांचे ठिकाणी असलेली चिंता यातून प्रगट होते. त्यात ते म्हणतात.

“देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बुडवावा की बडवावा ।स्वराज्य कारणे।
देशद्रोही तितुके कुत्ते। मारोन घालावे परते ।
देवदास पावती फत्ते । यादर्थी संशयो नाही ।
धर्मासाठी झुंजावे । झुंजोनी अवघ्यासी मारावे ।
मारिता मारिता घ्यावे। राज्य आपुले ।
शिवरायास आठवावे। जीवित्व तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी राहावे। किर्ती रूपे ।”

आपल्या स्वराज्याचे ध्येय व आपण कशा पध्दतीने राज्यकारभार केला पाहिजे हे या पत्रातून अधोरेखित होते. स्वराज्याची समर्थांच्या मनातील चिंता या पत्रातून प्रगट झाली आहे. देशद्रोह्यांबद्दलचे समर्थांचे विचार कसे प्रखर होते. देशद्रोही हे कुत्ते आहेत, त्यांना मारावे असा संदेशच रामदास स्वामींनी दिला आहे. औरंगजेबाने संभाजींना कैद केल्यानंतर त्याने त्यांना मुसलमान होण्यास सांगितले. संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान देणे स्वीकारले .

“जीवित्व तृणवत मानावे ।इहलोकी परलोकी राहावे किर्तीरूपे ।” हा समर्थांचा संदेश त्यांनी आचरणात आणला.

समर्थ रामदासांनी देवभक्ती सोबतच बलोपासना व परकीयांचे राज्य झुगारून देण्याचा तेजस्वी संदेश जनमाणसात रूजविला.खरोखर समर्थ रामदास हे अद्वितीय संत होते.

साभार :- विश्व संवाद केंद्र (विदर्भ प्रांत)

Back to top button