HinduismOpinion

छत्रपति शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम होते?

छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – 5

अलीकडे महाराष्ट्रात एक नवीन फॅशन आली आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात जास्तीत जास्त मुस्लिम कसे होते,हे सांगण्याची. याबाबत तर काही लोकांची स्पर्धाच लागली आहे. 57% टक्के ते 90% अशी ही आकडेवारी फुगवून सांगितली जाते. काही दिवसानंतर कदाचित शिवरायांच्या सैन्यात 100% मुस्लिमच होते,असाही हास्यास्पद दावा हे लोक करु शकतात.

छ.शिवरायांनी रायगडावर मशिद बांधली, मशिदींना इनाम दिली, असाही खोटा दावा सातत्याने केला जातो.

पण सत्य काय आहे?

शिवाजीमहाराजांच्या पदरी किती मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती? त्यांच्या पदरी 1657 सालापर्यंत चार – पाच मुसलमान होते. 1658 सालापासून शिवरायांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. त्यांनी आदीलशाहीवर स्वत:हून आक्रमण केल्याची पहिली घटना 1658 ची आहे.त्यापूर्वी ते त्यांच्या वडीलांचे प्रतिनिधी म्हणून जहागिरीचा कारभार पाहत होते. त्यावेळी जे आधिकारी होते,त्यात सिद्दी अंबर बगदादी हा पुण्याचा हवालदार होता. जैनाखान पिरजादे हा सरहवालदार होता. बेहेलिमखान हा बारामतीचा हवालदार होता. 1658 साली शिवरायांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली त्यानंतर शिवरायांचा एकही मुलकी आधिकारी मुसलमान नाही. एक नूरखान बेग होता, हा पायदळाचा सेनापती होता. तो 10 मार्च 1657 च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो,त्यानंतर येसाजी कंक हे पायदळाचे सेनापती आहेत,नूरखान बेग नव्हे! एक होता सिद्दी हिलाल जो महाराजांकडे येऊन राहिला होता.पूर्वी तो आदीलशाहीत होता. तो होता खेळोजी राजांचा क्रीतपुत्र.म्हणजे विकत घेतलेला गुलाम. मग त्याला हिंदु का केले नाही? तर अडचण अशी होती की त्या काळी जन्माने हिंदु नाही,त्याला हिंदु करता येत नसे.शिवरायांच्या नौदलाचे दोन आधिकारी होते. दौलतखान आणि दर्यासारंग. त्या दर्यासारंगला महाराजांनीच 1679 साली अटक केली. आता दौलतखान का होता? त्यावेळेला आपल्याकडे अनुभवी लोक नव्हते,म्हणून हा दौलतखान होता. आपला भारतदेश 1947 साली स्वतंत्र झाला,त्यानंतर दहा वर्ष भारतीय नौदल आणि हवाई दल यांचे प्रमुख ब्रिटीश होते.कारण आपल्याकडे त्या क्षेत्रातील अनुभवी लोक नव्हते. मात्र दौलतखानानंतर आंग्रे आणि धुळप यांनी मराठी आरमाराचे नेतृत्व केले. अफजलखानाचा वध केला,त्यावेळी शिवरायांचे अंगरक्षक होते,त्यापैकी सिद्दी इब्राहीम हा एक होता. त्याचीही स्थिती सिद्दी हिलालसारखी होती. या व्यतिरिक्त बाकी परत शिवरायांच्या सैन्यात कोणीही मुसलमान नव्हता.
राहिला मदारी मेहतर तर हे नाव खोटे आहे.त्याला कागदपत्राचा आधार नाही.शिवरायांकडे एक फारसी कारकून होता त्याचे नाव काझी हैदर. तो नंतर 1682 साली औरंगजेबाला जाऊन मिळाला. शिवाजीमहाराजांनी व्यंकोजीराजांना जे पत्र लिहीलय,त्यात “मी तुर्कांना मारतो,आणि तुझ्या सैन्यात तुर्क अाहेत,तर तुझा विजय कसा होईल? असे स्पष्ट लिहिले आहे. आजही तंजावरी मराठीत मुसलमाना “तुरुक” म्हणतात.

छत्रपती शिवरायांनी महाराजांनी कुठल्याही मशिदीला नवीन इनाम करुन दिलेले नाही. जी पूर्वीची दोन,तीन मशिदींची इनाम होती,ती होती.मात्र शिवाजीमहाराजांनी कोणत्याही मशिदीला नवीन इनाम करुन दिल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही.

शिवाजीमहाराजांनी रायगडावर मशिद बांधली असाही अपप्रचार केला जातो,पण शिवरायांनी कधीही ,कुठेही मशिद बांधलेली नाही. परंतु ज्याठिकाणी मंदिरे पाडून मशिदी उभारल्या होत्या,त्या मशिदी शिवरायांनी पाडल्याची उदाहरणे आहेत. एक डाॅ.फ्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता. हा फ्रायर डाॅक्टर होता. तो कल्याण भिवंडीला आला होता.तो लिहितो की तिथे मशिदी होत्या त्या शिवाजीमहाराजांनी पाडल्याच असत्या,त्याच्याऐवजी महाराजांनी त्यांची धान्याची कोठारे केली आहेत. (संदर्भ – New Account of East india and persia-nine year travels )

(संदर्भ – श्री.गजानन भास्कर मेहंदळे यांच्या भाषणातुन)

छत्रपती शिवाजीमहाराज जसे होते ,तसे दाखवण्यापेक्षा जसे नव्हते तसे दाखवले जात आहे. कोणताही हिंदु राजा धर्मसहिष्णु असतो,त्याप्रमाणे महाराजही होते,पण याचा अर्थ हिंदु अस्मितेशी तडजोड करणे ही महाराजांची सहिष्णुता नव्हती. “धटासि व्हावे धटl उध्दटासि उध्दट ll ” हा त्याचा बाणा होता. “सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा संहार” हे त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे व्रत होते.

अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ पहा-

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://m.youtube.com/watch%3Fv%3D5CDMcBZNNd4&ved=2ahUKEwjLgdPV6NXpAhWE7XMBHVD7BYwQo7QBMAB6BAgDEAE&usg=AOvVaw2lL4x93xA1V9oO8-vWGfPv

  • रवींद्र गणेश सासमकर
Back to top button