Opinion

गोव्यातील बांदोडा गावात मशरूमच्या १३० प्रजातींचा शोध

गोव्याच्या भूमीला नेहमीच निसर्गाचे वरदान लाभलेला आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आणि जगातील दहा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या पश्चिम घाटाचा भाग असल्याने, गोवा हे भारतात आणि संपूर्ण जगातच लोकप्रिय आहे. अनेक जीव आणि वनस्पतींसाठी पश्चिम घाट आणि गोवा हे त्यांचे घर असल्यामुळे गोवा आणि तिची माती नेहमीच वैज्ञानिक समुदायासाठी सुद्धा एक आकर्षणाचे केंद्र आहे.

गोवा राज्य जैवविविधता मंडळ (GSBB) हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाअंतर्गत काम करणारी गोवा सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. प्रत्येक पंचायत क्षेत्रात जीएसबीबीच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली एक गट तयार केला जातो ज्याला जैवविविधता व्यवस्थापन समिती किंवा बीएमसी (BMC) म्हणतात. या वर्षी पावसाळा सुरू होताच जीएसबीबी ने सर्व बीएमसी ना त्यांच्या आसपास असलेल्या जैवविविधतेच्या क्रियाकलापांची माहिती गोळा करण्यासाठी एक लहानसा सोशल मीडिया-आधारित प्रयोग सुरू केला.

गोवा राज्यभरातील जवळपास १९० बीएमसीपैकी एका बीएमसीने आपल्या शोधाद्वारे वैज्ञानिक समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे. फोंडा तालुक्यातील बांदोडा पंचायतीतील बीएमसी, अध्यक्ष अॅड.सुरेल तिळवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यतः तरुणांचा समावेश असलेल्या पण सर्व वयोगटातील लोकांच्या मदतीने बोकडबाग, तळूले आणि फर्मागुडी परिसरात आतापर्यंत मशरूमच्या जवळपास १३० प्रजाती शोधण्यात यश मिळाले आहे.

बीएमसी बांदोडा च्या गटातील एक सदस्य देवेश नाईक यांच्याशी बोलताना, या उपक्रमासंदर्भात त्यांनी नमूद केले की ते त्यांच्या शोधामुळे सर्वजण उत्साहित झालेले आहे. त्यांनी सांगितले की त्यांना स्वतः विविध कीटक, वनस्पती आणि प्राण्यांची छायाचित्रे घेणे आवडत असे आणि त्याच्या स्मार्टफोनवर भरपूर छायाचित्रे असायची आणि आहेत. जेव्हा ते बांदोडा पंचायतीच्या बीएमसीमध्ये सामील झाले आणि गावातील समान विचारसरणीच्या लोकांना भेटायला आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळाले, तेव्हा फोटोग्राफीच्या त्यांच्या छंदाला एक उद्देश मिळाला.

प्रत्येकाला हे माहित आहे की जेव्हा निसर्गाचा विचार केला जातो तेव्हा गोवा, पश्चिम किनाऱ्याचा मुकुट आहे आणि बांदोडा गावात सापडलेल्या एवढ्या मशरुम च्या प्रजाती सोन्याच्या खाणीपेक्षा कमी नाहीत. जीएसबीबी ने डॉ. नंदकुमार कामत, जे गोवा विद्यापीठातील या विषयात काम करणारे सर्वज्ञात शास्त्रज्ञ आणि संशोधक आहे, यांना या कामाची धुरा सोपवली. त्यांच्या तज्ञ सल्ला आणि मार्गदर्शनखाली गोव्यातील सर्व बीएमसी ना आपल्या परिसरातील मशरूम ची माहिती गोळा करण्यास सांगितले. बीएमसी बांदोडाला जीएसबीबीकडून सूचना मिळाल्यानंतर, सदस्यांनी पुढे जाऊन त्यांच्या आसपासच्या विविध मशरूमची छायाचित्रे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांना मशरूमच्या अधिकाधिक आणि विविध प्रजाती सापडत असल्याने त्यांनी ती छायाचित्रे डॉ.नंदकुमार कामत यांच्याकडे पाठवायला सुरुवात केली व त्यांना त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आणि मार्गदर्शन मिळू लागले.

पावसाळा गोव्याच्या दारावर ठोठावल्यानंतर लगेचच, मशरूम फुलू लागतात आणि पुढील २-३ महिने त्यांचा हंगाम राहतो आणि म्हणूनच बीएमसी बांदोडा च्या गटाला भरपूर आणि विविध प्रकारांच्या मशरूमची छायाचित्रे काढून यादी बनविण्याची उत्कृष्ट संधी मिळाली. पण हे आकडे शंभरचा आकडा ओलांडतील अशी त्यांना कधीच अपेक्षा नव्हती. आतापर्यंत बोकडबाग, तळुले आणि फर्मागुडी परिसरात प्रामुख्याने आढळलेल्या मशरूमची संख्या १३० आहे आणि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मशरूमच्या या १३० प्रजातींपैकी; १२ दुर्मिळ प्रजाती आहेत. गोव्यात पहिल्यांदाच आढळल्या अशा ४ आणि भारतात पहिल्यांदाच आढळली अशी १ प्रजाती आहे. गोव्यामध्ये पहिल्यांदाच ३ अशा प्रजाती पाहिल्या गेल्या ज्या आधी भारताच्या इतर भागात सापडल्या गेल्या आहेत. यातील मशरूमच्या ३ प्रजातींची ओळख अजून पटलेली नसून कदाचित त्यांचा शोध पहिल्यांदाच लागला आहे आणि त्यामुळे बांदोडा गावासाठी हा पाखरं आणि त्यामुळे लागलेले शोध नवीन दरवाजे उघडू शकतात ज्यामुळे आधीपासूनच सर्वत्र सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात असलेले बांदोडा गाव एक संशोधन केंद्र बनू शकते.

बीएमसी टीमच्या अविरत कार्याची माहिती देताना आणि त्यांचे आभार मानताना, देवेश नाईक यांनी डॉ.नंदकुमार कामत आणि डॉ.प्रदीप सरमोकदम यांचे त्यांनी केलेल्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. बीएमसी बांदोडाच्या गटाने केलेल्या कामामुळे आणि त्यातुन मिळालेल्या निष्कर्षांमुळे प्रेरित होऊन गोव्यातील इतर बीएमसीनेही आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्यांना खरोखरच सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. गोव्यात ही परंपरा आहे की पावसाळ्यात एकदा तरी लोक मशरूमची मेजवानी करतात. परंतु जास्त मागणी आणि लवकर जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी, लोभ काही लोकांना या मशरूमच्या शोधात जंगलात सर्वदूर काना कोपर्यापर्यंत पोहचण्यास प्रवृत्त करते आणि या अतिक्रमणामुळे पर्यावरणावर आणि जैवविविधतेवर परिणाम होतो.

डॉ.नंदकुमार कामत यांनी या पावसाळ्यात लेखांची मालिका लिहिली आहे, विशेषत: गोवा क्षेत्रातील पर्यावरणातील मशरूमची भूमिका स्पष्ट करून त्यांनी त्याच्या लेखात अनेकदा चिंता व्यक्त केली गेली की लोभ आणि हव्यासापोटी निसर्गाप्रती असलेली सहानुभूती नष्ट होत आहे आणि लोक पर्यावरणाला त्रास करायला अजिबात धजत नाही ज्यामुळे मशरूमच्या प्रजाती बरोबरच नैसर्गिक संतुलन सुद्धा नष्ट होत आहेत. त्यांचे संशोधन दर्शवते की अनेक डझन स्थानिक मशरूम च्या प्रजाती आधीच नामशेष झालेल्या आहेत.

पण तरीही, आशेची किरणे अजून बाकी आहे. जीएसबीबी सारख्या संस्थांनी आणि सरकारने अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राध्यान देऊन जर पर्यावरण आणि त्याच्या घटकांच्या संवर्धनामध्ये युवकांना सामील करून त्यांना योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती दिली तर हे पाऊल मैलाचा दगड ठरू शकते. एका छोट्याशा परिसरात नुसत्या मशरूमच्या जर १३० प्रजाती सापडतात तर एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो आहे की या गोव्याच्या भूमीत अजून किती जैवविविधता आहे जिचा शोध लागणे बाकी आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधायला, संशोधन क्षेत्रात सहकार्य आणि प्रोत्साहनासह योग्य नियोजन आणि धोरणनिर्मितीची अतिशय आवश्यक आहे. हे प्रयत्न गोव्यातील संशोधन आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिभा आकर्षित करेल. गोव्याची संस्कृती नेहमीच निसर्गाच्या संवर्धनामध्ये रुजलेली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आंदोलनात्मक भूमिका हा गोवा आणि इथल्या जनतेचा कधीच दृष्टिकोन राहिला नसून एक पद्धतशीर, सुधारात्मक आणि विविध संस्कारांना प्राधान्य देऊन पर्यावरण संवर्धन करायचे असते हे शिकविले आहे. बीएमसी बांदोडाचा हा अभिनव प्रयोग पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये खूप पुढे जाईल यात शंका नाही.

  • देवराज गावडे, विश्व संवाद केंद्र, गोवा
Back to top button