News

कोणाला हवे आगरी पाड्यात उर्दू भवन?… आम्हाला तर नकोच…

रविवारी, दिनांक ४ डिसेंबरला मुंबईच्या आगरी पाडा येथील हिंदू नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली; आगरी पाड्यातील नियोजित उर्दू भवाना विरुद्ध जबरदस्त निदर्शने करून सरकारला एक प्रकारे इशाराच दिला आहे.

आगरी पाड्यातील सकल हिंदू समाजाच्या या अभूतपूर्व एकजुटी बद्दल त्याचे निश्चितच अभिनंदन केले पाहिजे.

पूर्वाश्रमीच्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत, कौशल विकास केंद्रा (ITI)साठी राखीव असलेला आगरी पाड्यातील हा भूखंड मुंबई महापालिकेकडून घाईघाईने उर्दू भवनासाठी बहाल करण्यात आला.सदर भूखंडाच्या बहालीसाठी आवश्यक असणारी कागदोपत्री परवानगीची पूर्तता केवळ १० आठवड्याच्या आत करण्यात आली असे समजते.१२.५ कोटी निधी या उर्दू भवन बांधणीसाठी आवश्यक असताना केवळ १.५ कोटी रुपयांच्या तरतुदीवर याची बोळवण करण्यात आली.

अल्पसंख्यांक म्हणजे फक्त मुस्लिम असे समजणाऱ्या तात्कालीन राज्य सरकार व महापालिकेतील नवसेक्युलर सत्ताधारी पक्षाने अल्पसंख्यांकांच्या एकगठ्ठा मतपेटीसाठी उर्दू भवनाचा आततायी निर्णय घाईघाईने घेतल्याचे स्पष्टपणे जाणवते. बहुदा “करून दाखवलं” हे आपलं घोषवाक्य मिरवण्यासाठी असावे.

मुळात उर्दू या शब्दाचा उर्दू भाषेतील अर्थ आहे लष्कर. भारतावर आक्रमण करणाऱ्या मुघल आक्रमक बाबराचे जे लष्करी सैनिक आपसात जी अरबी, फारसी मिश्रित तुर्की भाषा बोलत. हिंदुस्तानी लोकांशी संवाद साधताना त्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील हिंदी तसेच ब्रज भाषांची प्रचंड सरमिसळ होऊन उर्दू भाषा तयार झाली. उर्दू ही भाषा जगात फक्त भारतीय उपखंडात अर्थात भारत व पाकिस्तानात बोलली जाते. उर्दू भाषेला स्वतःचे स्वतंत्र व्याकरण नाही. हिंदी भाषेचे व्याकरण हेच उर्दू भाषेचे व्याकरण समजले जाते.

लष्करातील लोक बोलतात अर्थात उर्दू लोक बोलतात म्हणून उर्दू लोकांची भाषा. पुढे ती उर्दू याच नावाने प्रचलित झाली. हिंदुस्थानात उर्दुला चारशे साडेचारशे वर्षे झाल्यामुळे आजमितीस याच्यावर हिंदीचा विलक्षण प्रभाव आहे.उर्दू भाषा ही अरेबिक लिपीशी साधर्म्य असलेल्या लिपीत उजवीकडून डावीकडे लिहिली जात असल्यामुळे सर्वसामान्य हिंदू समाजाला ती वाचता येत नाही. त्यामुळे आजही उर्दू ही सर्वसामान्य भारतीयांसाठी परदेशी भाषाच आहे.विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय किंवा अन्य कुठल्याही आधुनिक शिक्षणासाठी उर्दू भाषा वापरली जात नाही. आज घडीला उर्दू ही फक्त शेरोशायरीची भाषा राहिलेली आहे.

एकेकाळी इस्लामी राजवटीत राजाश्रयामुळे फारसी, फारसी मिश्रित उर्दू या भाषा चांगल्याच फोफावल्या होत्या.

छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यकारभारात, प्रचलित असलेले अनेक फारसी शब्द वगळून त्या जागी तात्कालीन मराठी भाषेतील शब्द व्यवहारात आणले हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.

१९४७ साली कायदे आझम मोहम्मद अली जीनांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी मुसलमान धर्म आणि वेगळी संस्कृती याच्याबरोबर उर्दू या भाषेचा आधार घेतल्यामुळे सामान्य हिंदू जनमानसाला उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे असे वाटले तर त्याला दोष देता येणार नाही. आजही पाकिस्तानची अधिकृत राजभाषा उर्दूच आहे. मात्र व्यवहारात पाकिस्तानची केवळ ८% जनसंख्या ही उर्दू भाषिक आहे. ती सुद्धा भारतातून गेलेले मोहाजीर उर्दू बोलतात म्हणून. पाकिस्तानच्या पंजाब सिंध बलुचिस्तान मधील स्थानिक मुस्लिम जनता, फाळणीच्या वेळी हिंदुस्थानातून गेलेल्या मुसलमानांना “भुखेनंगे मोहाजीर” म्हणून ओळखतात. त्यांच्या दृष्टीने उर्दू ही भुखेनंगे मोहाजीरों की भाषा. पाकिस्तानातल्या सिंधी मुसलमानांनी सिंधी, पंजाबी मुसलमामांनी पंजाबी, बलोची मुसलमानांनी बलोच आणि खैबर पख्तुनवा प्रांतातील मुसलमान पठाणांनी आपली पश्र्तून भाषा सोडली नाही. या सर्व भाषांची लिपी जवळपास सारखी असल्यामुळे आपल्याला त्या सरसकट सगळ्या उर्दू वाटतात पण प्रत्यक्षात त्या वेगवेगळ्या भाषा आहेत. आजमितीस उर्दू ही पाकिस्तानची कागदोपत्री राजभाषा आहे. व्यवहारात मात्र उर्दूला शासकीय कामकाजात आणि राजदरबारी काडीचीही किंमत नाही.

उदाहरण द्यायचे झाले तर संस्कृत, मराठी, हिंदी आणि नेपाळी या चार भाषा आपण देवनागरी लिपीतून लिहितो. मराठी भाषिक म्हणून आपल्याला उर्वरित तीन भाषा वाचता येतील मात्र त्याचा अर्थ समजेलच असे नाही.कराचीतील दंगलींमध्ये मोहाजीरांच्या वैशिष्ट्यपूर्ण उर्दू उच्चारणामुळे ते सहज ओळखले जातात आणि बडवले जातात.पाकिस्तानी पंजाबच्या लाहोर, रावळपिंडी मध्ये तर उर्दू लहेजा भाषिकांकडे परग्रहावरून आलेल्या नजरेने बघितले जाते, त्यांची टिंगल टवाळी होते.

उर्दू ही सरसकट सर्व मुसलमानांची भाषा आहे हे समजणाऱ्या प्रत्येक सेक्युलर बुद्धिमंताला १९७१ सालच्या बांगलादेश मुक्ती संग्रामाने आणि सणसणीत चपराक चढवली आहे. पूर्व पाकिस्तानच्या बंगाली जनतेने बंगाली भाषेच्या अस्मितेमुळे, पश्चिम पाकिस्तान कडून उर्दूची करण्यात येणारी जबरदस्ती भिरकावून दिली. बांगलादेश मुक्ती संग्राम हा बंगाली भाषेच्या अस्मितेने इस्लामी अस्मितेवर पर्यायाने उर्दूच्या जबरदस्तीवर मिळवलेला विजय होता.

आज बांगलादेश निर्मितीनंतर तेथे अडकून पडलेल्या पश्चिम पाकिस्तानच्या उर्दू भाषिक नागरिकांना “देशद्रोही बिहारी” म्हणून डिटेन्शन कॅम्पमध्ये जबरदस्तीने कोंडून ठेवण्यात आलेले आहे. यातील बिहारी हे संबोधन “उर्दू भाषिक” दर्शविणारे आहे आणि उर्दू भाषिक म्हणजे बांगलादेशचा शत्रू.उर्दू ही सरसकट सर्व मुसलमानांची भाषा आहे हे समजणे किती हास्यास्पद आणि घातक आहे त्याचे बांगलादेश आणि खुद्द पाकिस्तान ही सर्वोत्तम उदाहरणे आहेत.

बंगाली मुसलमान जर बंगाली भाषेची अस्मिता सोडत नसेल तर महाराष्ट्रातल्या मुसलमानाने मराठी भाषेची अस्मिता का सोडावी? किमान मराठी भाषेच्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांनी त्याला खतपाणी तरी का घालावे?

फाळणीच्या वेळी सिंध प्रांतातून लाखोंच्या संख्येने आलेले आपले हिंदू सिंधी बांधव बहुसंख्येने तेथे उर्दू सदृश लिपीतील सिंधी भाषा लिखाणासाठी वापरत कारण त्यांचे शिक्षण देखील सिंधमध्ये याच लिपीच्या सिंधी भाषेत झालेले होते. पूर्वी सिंधी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जायची मात्र मुसलमानांच्या वाढत्या संख्येमुळे हे प्रचलन सिंध प्रांतात हळूहळू कमी होत गेले. मात्र या हिंदू सिंधी बांधवांची पुढची पिढी भारतातल्या देवनागरी लिपीतून शिक्षण घेऊ लागली व स्थानिक हिंदू समाजाशी पुढील काही वर्षातच एकरूप झाली.मग महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी मराठी भाषेत शिक्षण घ्यावे हा आग्रह धरण्याचे सोडून उर्दू भवनाचे जीवघेणे चाळे कशासाठी?

प्रस्तावित उर्दू भावनामुळे आधीच अल्पसंख्यांक होत आलेला आगरी पाड्यातील हिंदू समाज नामशेष होईल अशी सार्थ भीती त्याला वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच आगरी पाड्यातील प्रस्तावित उर्दू भवनाला जीवघेणे चाळे म्हणावे लागते.

आपल्या दैनंदिन व्यवहारात हिंदी किंवा मराठी भाषेत बोलताना आपण अनेक फारसी तसेच उर्दू शब्दांचा नकळतपणे वापर करत असतो. आपल्याला माहितही नसते हे शब्द फारसी किंवा उर्दू आहेत. उदाहरणार्थ… चादर, चाकू, चेहरा, खून, खुश, चीज, चैन, रवाना, रोज, रेशम, काबू… अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. हे फक्त मराठीतील काही शब्द वानगी दाखल दिले आहेत.
हिंदीतील फारसी व उर्दू शब्दांची भरमार आपल्या कल्पनेपलीकडील आहे. काळाच्या ओघात हे परकीय शब्द आम्ही स्वीकारले, आज ते आमचे झाले आहेत. त्यामुळे इथे उर्दूचा द्वेष करण्याचा संबंध नाही. द्वेष करावासा वाटतो तो उर्दू भवनाच्या किळसवाण्या लांगुलचालनयुक्त राजकारणाचा.

वास्तविक त्या भूखंडावर कौशल विकास केंद्र उभे राहिले असते तर त्याचा लाभ मुसलमानांसकट समाजातील सर्व घटकांना झाला असता. या ITI केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला असता; ज्याची सर्वात जास्त गरज मुसलमान तरुणांना आहे. आम्ही कौशल्य विकास केंद्र उभे केले असे सांगूनही मते मागता आली असती पण ती उर्दू भवनामुळे जशी एकगठ्ठा मिळाली असती कदाचित तशी मिळाली नसती.

कोणाला तरी खुश करण्यासाठी, आपल्या मतपेटी साठी कौशल विकास केंद्राचा राखीव भूखंड उर्दू भवनाच्या घशात घालण्याचे व मुंबईकर करदात्यांचा कष्टाचा पैसा एखाद्या परकीय भाषेच्या विकासासाठी कोणाच्या तरी उरावर घालण्याचे हे षडयंत्र सकल हिंदू समाजाने संघटितपणे उधळून लावले पाहिजे.

आणि एखाद्या राजकीय पक्षाचे उर्दू प्रेम एवढेच जर उतू जात असेल तर त्यांनी आपले खाजगी निवासस्थान किंवा पक्षाचे मुख्यालय असलेले भवन, उर्दू भवनासाठी जरूर दान करावे. आपल्या वैयक्तिक कमाईतून उर्दू भवनासाठी व भाषेच्या विकासासाठी भरघोस देणगी द्यावी अशी आग्रही मागणी जनतेने केली की मग बघू या उर्दू प्रेमी राजकीय पक्षांची दानत आणि नियत.

Back to top button