News

“हिंदूपणाची जाणीव हेच समस्यांचे उत्तर” – सुनील आंबेकर

मुंबई, दि. २३ सप्टेंबर : “आज सामान्य लोकांमध्ये संघ समजून घेण्याची इच्छा वाढत आहे. जगाने संघाकडे आशेने डोळे लावले आहेत. संघविचारात जगाला आशेचा किरण दिसतो आहे. आपल्या समस्यांवर संघच उत्तर देऊ शकतो अशी सामाजिक मानसिकता तयार झाली आहे. त्याचबरोबर संघाची कार्यपद्धती चांगली असून आपण संघाच्या सोबत गेलो तर बदल घडवून आणू शकतो, हा सामाजिक अनुभव आता येतो आहे. याच्या मुळाशी डॉक्टर हेडगेवार यांची संघटनसूत्रे, विचारसूत्रे आहेत. आज डॉक्टर हेडगेवार यांच्या चरित्राबरोबरच विचारसूत्रांचा अभ्यास केला जातो आहे. आपल्या स्नेहपूर्ण व्यवहारातून डॉक्टर हेडगेवारांनी अनेक समाजधुरीणांना आपलेसे केले. सर्व समाजाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे, ही त्यांची कार्यपद्धती होती. हिंदू समाजाच्या समस्या समाप्त व्हायच्या असतील तर आपले हिंदूपण जागृत केले पाहिजे, या डॉक्टर हेडगेवारांनी दिलेल्या सूत्रांच्या आधारे संघ 96 वर्षे प्रवास करत आहे. आज देश-विदेशात संघविचाराचे प्रकटीकरण होताना दिसत आहे. डॉक्टर हेडगेवारांनी दिलेली विचारसूत्र आपले ध्येय मानून काम करणारे संघस्वयंसेवक प्रत्येक ठिकाणी उभे आहेत. कोरोना काळात याचा अनुभव आला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात डॉक्टर हेडगेवारांच्या विचारसूत्राचे प्रकटीकरण करण्यासाठी अशा अंकाचा उपयोग होणार आहे,” असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मा. सुनीलजी आंबेकर यांनी व्यक्त केले.


सा.विवेक हे सामाजिक परिवर्तनासाठी काम करणारे साप्ताहिक असून विविध ग्रंथांच्या व पुस्तकांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाबरोबर राष्ट्रीय विचाराचा प्रसार आणि प्रचार करत असते. त्यातील एक भाग म्हणजे ‘संघमंत्र के उद्गाता डॉ. हेडगेवार’ हा अंक होय. या अंकाचे प्रकाशन २२ सप्टेंबर २०२१ रोजी सुनीलजी आंबेकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सुरेश भगेरिया (मुंबई महानगर संघचालक) रमेश पतंगे (अध्यक्ष, हिंदुस्थान प्रकाशन संस्था) दिलीप करंबेळकर (प्रबंध संपादक, विवेक समूह) इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर व संघ कार्यकर्ते उपस्थित होते. सा.विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांनी अंकाचा परिचय करून दिला.
सुनील आंबेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “आपल्या देशात अशा अनेक शक्ती आहेत, ज्यांनी आपल्या एकतेवरच आघात केला. डॉक्टरांनी खूप लहान वयात देश समजून घ्यायला सुरुवात केली. सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. डॉक्टरांमधील ऊर्जेचे सामर्थ्य तेव्हापासूनच सर्वांना अनुभवता येत होते. लोकमान्य टिळकांसोबतही डॉक्टरांना वेळ घालवता आला. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा झाल्या, अनेक गोष्टी त्यांना समजून घेता आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सूत्र असे अचानक बनलेले नाही. अनेक वर्षे डॉक्टरांनी त्यावर विचारविनिमय केला, अनेक विद्वानांशी चर्चा केली, चिंतन केले आणि या अथक प्रयत्नांनंतरच त्यांची विचारसूत्रे हे मंत्र बनले. त्यामुळेच त्यांचे सर्व कार्य आजही आपल्याला प्रेरित करतात.


हिंदुत्वाचा विचार देशातील प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. डॉक्टरांनी संघटनेला एक नवीन मंत्र दिला, सामान्यातील सामान्य व्यक्तीमध्ये हा ऊर्जास्रोत आहे व तोदेखील असे असामान्य काम करू शकतो, हा विश्वास प्रत्येकात निर्माण करण्याचे मोठे काम करून स्वयं की पहल, म्हणजे स्वयं चिंता करण्याचे सूत्र त्यांनी आपल्याला दिले. हे केवळ संघ चालवायचे सूत्र नाही, तर समाज, राष्ट्र, देश चालवण्याचे हे सूत्र आहे.


प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे सुरेश भगेरिया मार्गदर्शन करताना म्हणाले की, “डॉक्टर हेडगेवारांनी दिलेल्या विचारसूत्रावर काम करत आपण संघाच्या शताब्दीकडे जात आहोत. संघविचार समजून घेण्यासाठी संपूर्ण जगाकडून प्रयत्न चालू आहेत. देशासाठी जगणार्‍या संघस्वयंसेवकाच्या निर्मितीची ताकद डॉक्टर हेडगेवारांच्या विचारसूत्रात आहे. आज असे असंख्य संघस्वयंसेवक राष्ट्रसेवेसाठी तत्पर आहेत. त्यामागील प्रेरणा डॉक्टर हेडगेवार हेच आहेत.”


अश्विनी मयेकर (कार्यकारी संपादक) यांनी या प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अजय कोतवडेकर यांनी आभार मानले. ‘वंदे मातरम्’ गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Back to top button