NewsOpinion

चला.. संविधान साक्षर होउ या!! – भाग ४

तर आज आपण पाहणार आहोत की घटना समितीचे सदस्य कोण कोण होते?

मागच्या भागात आपण पाहिले की ९ डिसेंबर १९४६ ला डॉ. राजेंद्रप्रसाद ह्यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन झाली. समितीचे काम सुरु झाले. ह्यात ३८९ सदस्य होते. फाळणीनंतर ही संख्या झाली २९२.हे सदस्य कोण होते?कसे निवडले गेले होते?

पहिल्या घटना समितीतील एकूण ३८९ सदस्यांपैकी २९२ सदस्य हे प्रादेशिक विधानसभांनी निवडून दिलेले प्रतिनिधी होते. 93 सदस्य हे वेगवेगळ्या संस्थानांचे प्रतिनिधी होते आणि दिल्ली, अजमेर, मेवाड, कूर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान या चार कमिशनर प्रदेशांचे प्रत्येकी एक याप्रमाणे चार सदस्य होते. या 292 सदस्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे 208 सदस्य तर मुस्लिम लीगचे 73 सदस्य निवडून आले होते. पण नंतर परिस्थिती बदलली. मुस्लिम लीगने घटना समितीत सामील होण्यास नकार दिला आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र घटना समिती असावी अशी मागणी केली. राजकीय दृष्ट्या अनेक घडामोडी घडल्या, हिंदू मुस्लिम दंगे झाले आणि मग 18 जुलै 1947 ला विभाजनाचा निर्णय करण्यात आला. जो भाग पाकिस्तानात समाविष्ट होणार होता त्या क्षेत्रातल्या सदस्यांनी घटना समितीच्या राजीनामा दिला.
घटना समितीच्या सदस्यांमध्ये विविध धर्म, जाती, प्रांत, लिंग यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.घटना समितीमध्ये सामील असलेल्या 15 महिला सदस्या होत्या अम्मू स्वामीनाथन, दाक्षायणी वेलायुधन, बेगम ऐयाज रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन जीवराज मेहता, कमला चौधरी, लीला रॉय, मालती चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, रेणुका रॉय, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित आणि अँनी मस्करेन्हास.

विविध उपसमित्यांच्या अध्यक्षपदी होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, कन्हैयालाल मुनशी, अल्लादी कृष्णा स्वामी अय्यर, आचार्य कृपलानी, एच.सी. मुखर्जी, गोपीनाथ बर्डोलोई, गणेश मावळणकर, पट्टाभि सितारामय्या, ए. व्ही. ठक्कर, मोतुरी सत्यनारायण.
घटना सल्लागार होते सर बी.एन.राव, एस.एन.मुखर्जी, अल्लादि कृष्णस्वामी अय्यर. घटना समितीत सहभागी असलेल्या सर्वांची नावे इथे देणे तर शक्य नाही. आंतरजाला वर ती उपलब्ध आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, एन. व्हि. गाडगीळ, मुंनुस्वामी पिल्ले, मोहम्मद शरीफ, फ्रँक अँथनी, गोपाल स्वामी अय्यंगार के एन मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एन. मित्तल, डी.पी. खैतान इत्यादी सर्व जात, धर्म, पंथाची मंडळी घटना समितीत काम करीत होती.
भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर संविधान समितीच्या एकूण २८४ सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत.
ह्या समितीत कार्यरत असलेले डॉक्टर राजेंद्रप्रसाद पुढे स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती झाले, जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले, सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री झाले. घटना मसूदा समितीत किंवा लेखा समितीत सात जण होते. त्या समितीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री झाले.
जरी डिसेंबर १९४६ मध्ये काम सुरू झाले असले तरी स्वातंत्र्य मिळाल्या वर संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. घटना समितीतील सदस्यानी अभ्यासपूर्वक, परस्पर विचारविनिमय, चर्चा करून, अनेकदा एकेका प्रस्तावावर सांगोपांग विचार करून मग घटना तयार केली आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर नवीन भारत हा व्यक्तिस्वातंत्र्य, समता, सामाजिक व आर्थिक न्याय आणि जबाबदार शासन ह्या तत्त्वांवर उभारला जायचा होता. संविधान उत्तम, अचूक, सर्वसमावेशक, सुस्पष्ट आणि लवचिक असावे ह्या साठी घटना समितीतील सदस्य अविश्रांत परिश्रम करीत होते. त्याचाच परिणाम म्हणून तयार झाले भारतीय संविधान. भारतीय नागरिक त्यांच्याविषयी नेहमीच कृतज्ञ राहतील.

उद्याच्या भागात आपण वाचणार आहोत संविधानाच्या उद्देशिकेविषयी.

भारतीय गणराज्याचे संविधान(constitution of india) २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले.संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.
संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा – पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका.

लेखिका-वृंदा टिळक

Back to top button