News

महाराष्ट्राच्या दिंडीचे वारकरी.. पद्म पुरस्काराचे मानकरी.. भाग ११

padma-awards 2024 Maharashtra

महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..

पद्मश्री पुरस्कार..

शंकर बाबा पापळकर..(सामाजिक कार्य)

शंकर बाबा पापळकर..यांनी बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

रस्‍त्‍याच्‍या कडेला सोडून दिलेल्‍या बेवारस, दिव्‍यांग मुलांना पितृछत्र देऊन त्‍यांच्‍या पुनर्वसनासाठी आयुष्‍यभर धडपड करणारे ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्‍कार जाहीर करण्‍यात आला आहे. या निमित्‍ताने अचलपूर तालुक्‍यातील वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्‍यांग, बेवारस बालगृहात आनंदोत्‍सव साजरा केला जात आहे. या पुरस्‍काराने दिव्‍यांग, बेवारस मुला-मुलींच्‍या पुनर्वसनाच्‍या चळवळीला बळ मिळेल, अशा भावना शंकरबाबा पापळकर यांनी व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृहाच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविश्रांतपणे सुरू आहे. शंकरबाबांच्या बालगृहात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून बेवारस दिव्यांग मुले आजीवन पुनर्वसनासाठी दाखल होत असतात. या ठिकाणच्या १२३ मुला-मुलींच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर यांचे नाव लागते. या सर्व मुला-मुलींचे ते पिता आहेत.

या मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्यावरील उपचार आणि त्यांचे विवाह लावून देण्याची जबाबदारीदेखील शंकरबाबा यांनीच सांभाळली. आजवर ३० मुला-मुलींचे लग्न करून देताना त्यांच्या योग्य पुनर्वसनाचे यशस्वी ‘प्रारूप’ शंकरबाबा यांनी तयार केले आहे. या मुलांची ते गेल्या दोन तपापासून अहोरात्र सेवा करतात. त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि एवढेच नव्हे तर वयाची २१ वर्षे झालेल्या या अंध, मुकबधीर तरुण मुलामुलींना नोकरी देऊन त्यांचे संसारही या शंकरबाबा यांनी स्वबळावर उभे केले आहे. अशाच काही कुटुंबात सुदृढ बालकेसुद्धा जन्माला आली आहेत.

वझ्झर येथील आश्रमात अनेक मुले मानसिकदृष्ट्या विकलांग, शारीरिक व्याधीग्रस्‍त आहेत, काही अंध, मूक-बधीर आहेत. या अनाथ मुलांना मायेची ऊब देणारा एक अवलिया अशी शंकरबाबा पापळकर यांची ओळख आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना बालगृहात ठेवता येत नाही, असा नियम आहे. परंतु अपंग, मतिमंद, दृष्टिहीन मुले व मुली कुठे जाणार, असा सवाल करून या मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कायदा करावा, अशी शंकरबाबांची मागणी आहे.

पुरस्‍काराचा आनंद

भारत सरकारने आपल्‍याला पद्मश्री पुरस्‍कार जाहीर केला, याचा आपल्‍याला आनंद आहे. बेवारस, दिव्‍यांग मुला-मुलींच्‍या आयुष्‍यात समाधानचे चार क्षण फुलवण्‍याचे भाग्‍य आपल्‍याला लाभले. समाजातील सर्वच घटकांनी आपल्‍या या कार्याला साथ दिली. या पुरस्‍काराचा मी स्‍वीकार करतो, अशा शब्‍दात शंकरबाबा पापळकर यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.

क्रमशः

Back to top button