Opinion

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले

( संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या निमित्ताने…)

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची ही आर्तता विश्वात्मक देवाला साद घालत व्यापक परमात्म्याच्या सगुणतेची ग्वाहीच देते. अवघ्या विश्वाची माऊली आपले संकल्पित कार्य पूर्ण होताच  ऐहिक जीवनाला पूर्णविराम देत समाधिस्त झाली. आजच्या दिवशी (जेष्ठ वद्य त्रयोदशी) माऊलीनी आळंदीत संजीवन समाधी घेतली . आपल्या लाडक्या भक्ताचा हा संजीवन सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी पंढरीचा राणा, विठ्ठल स्वतः जातीने हजर होता.  तेव्हापासून कार्तिक वद्य एकादशीला देव वारी असे संबोधले जाते. यादिवशी आळंदीत स्वतः पांडुरंग आपल्या भक्तांच्या भेटीस येतात अशी वैष्णवांची धारणा आहे.

"सकलांशी येथे आहे"" अधिकार असे म्हणत,याकाळात वेदोक्त ज्ञान माउलीनी सर्वासमोर मोकळे केले आणि धर्म मार्तंडांच्या पारंपारिक कुरीती वर पहिला आघात केला.आपले गुरू संत निवृत्तीनाथाची आज्ञा घेऊन वेदांचे सार ज्ञानेश्वरीच्या रूपाने बहुजनांना वाटले. हे कितीतरी मोठे क्रांतिकारी पाऊल त्याकाळात या भावंडांनी उचलले होते. स्वतः बहिष्कृत जीवन कंठून अखंड चिंता विश्वाची वाहिली. पदरी कायम उपेक्षा, अपमान,द्वेष येऊन सुद्धा समाजाच्या हिता करीता अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरीपाठ अशी सुलभ साहित्य निर्मिती केली.

ज्ञानदेवांना तर आद्य साहित्यिकच म्हणावे लागेल. ज्ञानेश्वरी पारायनात पदोपदी आपणास याची प्रचीती येते. श्रीमदभगवदगीते वरील भाष्य ज्ञानेश्वरीच्या रुपात अतिशय सोपे करून सांगितले.यासोबत “पैल तो गे काऊ कोकताहे” यातून किती सुरेख उपमा,अलंकार आपणास भेटतात .शिवाय चराचरात दाटलेले चैतन्य हे अंती एकंच आहे हे विश्वासाने सप्रमाण सांगतात.


“अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू” असे म्हणत अवघा आसमंत शब्दसुमनांनी दरवळून टाकला.
“पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती” यातून माऊलीच्या आशयघनातील दिव्यताचं प्रकट होते.
“समोर की पाठिमोरा ,न कळे” अशी भक्तीची भावविभोर स्तिथी त्यांच्या रचनेतून साकार होते.
शब्द हे अक्षर का आहेत? हे यातून उमजत जाते. नव्हे नव्हे ते आपल्या हृदयावर अंकित होते.
इस. 1250 ते 1630 हा सुमारे 400 वर्षांचा कालखंड म्हणजे परकीय आक्रमणे, दुराचार,अनाचार आणि पराभूत मानसिकतेने ग्रासलेला काळ, परंतु अशाही परिस्थितीत भागवद धर्माची पताका उंच फडकवत सामान्य जनाच्या अंतरात भक्तीरूपाने हा सनातन धर्म जिवंत ठेवला हे कितीतरी मोठे उपकार संतांचे मानवजातीवर आहेत. नाहीतर या कालखंडात हिंदुधर्मच निर्वंश होतो की काय असेच वातावरण सभोवताली होते. संत नामदेव,चोखामेळा ,गोरोबा काका या सारखे समकालीन संत व त्या नंतरही संत तुकाराम महाराज ,संत एकनाथ महाराजांनी “ज्ञानदेव रचिला, पाया उभारले देवालया” असे म्हणत ही परंपरा अधिक प्रशस्त केली.गुरुग्रंथसाहिब या शीख सांप्रदयच्या धर्मग्रंथात संत नामदेवांच्या काही रचना समाविष्टय केलेल्या आढळतात,त्याकाळात अशापद्धतीत समरसता आचरणात होती योग्य ते घ्यावे अयोग्य ते मागे टाकावे हा विवेक जागृत होता. संतांनी सहिष्णुतेची शिकवण दिली असली तरी प्रसंगी नाठाळांच्या माथी हाणू काठी असे शिकविण्यासही ते विसरले नाहीत . बेगडी आत्मविस्मृत अहिंसा संताना मान्य नव्हती.
अखेर संतांची लक्षणे पसायदानातून सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात

चंद्रमेजे अलांच्छन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन होती.आपले संकल्पित कार्य लवकरात लवकर ज्यांना उमजले ,आणि त्या संकल्पाची पुर्ती झाल्यावर निश्फळ न जगता आता थांबावे हे ज्यांना कळते ते संत. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी खेळ मांडून तो पूर्ण करत ,पूर्णविराम घ्यावा ती माऊलीच.
आळंदीत आजच्या दिवशी सुमारे 725 वर्षांपूर्वी या अखिल विश्वाची माऊली समकालीन संत आणि समाजाच्या साक्षीने समाधिस्त झाली. या समाधीशी निरपेक्ष भाव अंतरी धारण करत आताही तादात्म्य पावता येते म्हणून यास संजीवन समाधी असे संबोधले जाते.विश्वाचे आर्त ज्याचा मनात प्रगट होते ते वैश्विक मन विवेकी भक्तीने थोडे जरी समजून घेतले तरी सांप्रत काळात या सुपंथाचे पाईक असल्याचे समाधान मिळते.

संजय शंकर पालकर

Back to top button