Opinion

स्वराज्य@७५ – अमृत महोत्सव – अनाम नायक – स्वातंत्र्यानंद सुब्रह्मण्य शिवा

सुब्रह्मण्य शिव यांचे जीवन हे संघर्ष, सेवा आणि त्याग यांनी भरलेले आहे. ते जरी केवळ ४१ वर्षांचे आयुष्य जगले तरी त्यांचे आयुष्य प्रेरणादायक होते, आहे आणि राहील. दारिद्र्य आणि हालअपेष्टा त्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या होत्या; पण त्यांचा त्यांनी आई पराशक्तीचा, की जिने भारतमातेचे रूप घेतले आहे, तिचा प्रसाद समजून हसतमुखाने स्वीकार केला.

सुब्रह्मण्य यांचा जन्म ४ ऑक्टोबर, १८८४ रोजी वट्टलगुंडू, जि. दिंडीगुळ येथे झाला. राजन ऐय्यर आणि नागलक्ष्मी अम्मल हे त्यांचे पालक होते. ९ व्या वर्षी उपनयन झाल्यावर त्यांचे नाव सुब्रमण्य शर्मा असे ठेवले गेले. गरिबीमुळे त्यांच्या कुटुंबाला नेहमी समस्यांचा सामना करावा लागायचा. त्या काळातील प्रचलित रूढीनुसार त्यांचा १५ व्या वर्षी विवाह झाला. विवाहामुळे त्यांच्या जीवनात काहीही बदल झाला नाही. ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे सर्व ऐहिक सुखांपासून अलिप्त राहिले आणि अभ्यासात जास्त रमले नाहीत.

शिक्षणासाठी त्यांना सहाय्यशील नातेवाईक आणि कनवाळू लोकांवर अवलंबून राहत गावोगाव भटकावे लागले (जसे की मदुराई, त्रिवेंद्रम, कोईम्बतूर, इ.). खडतर अवस्थेतून जात ते मॅट्रिकपर्यंत शिकले. त्यांना एका नातेवाईकाच्या शिफारशीवरून शिवकाशी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात १९०१ मध्ये १० रुपये महिना पगारावर नोकरी मिळाली, ती त्यांनी पहिल्याच दिवशी ‘हि नोकरी म्हणजे गुलामी आहे’ असे म्हणून सोडली.

ते त्रिवेंद्रम येथील शाळेत असताना त्रिवेंद्रम नवनीतम कृष्णा ऐय्यर यांच्याकडून सिलंबम (दंडयुद्ध) आणि कुस्ती शिकले होते. त्याच्या साहाय्याने ते शेजाऱ्यांशी भांडत.

१९०३ साली सच्चीदानंद स्वामीजींना भेटणे हे त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरले. त्यांनी नियमितपणे स्वामीजींकडे जाऊन त्यांची सेवा करणे चालू केले. एक दिवस स्वामीजींनी त्यांना ‘शिवा’ अशी हाक मारली आणि म्हणाले, की इथून पुढे तू ‘सुब्रमण्य शिवा’ म्हणून ओळखला जाशील. स्वामीजींचे हे शब्द सत्य झाले आणि आजसुद्धा ते शिवा किंवा ‘सुब्रह्मण्य शिवा’ म्हणून ओळखले जातात.

आर्य समाजाशी आलेल्या संबंधांमुळे त्यांना अध्यात्मात रुची निर्माण झाली, त्यांचे क्षितिज विस्तारले आणि त्यांना हे पटले की, सक्रियपणे राष्ट्रीय कार्य करणे हीच खरी अध्यात्मिक मुक्ती आहे. म्हणून, त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उतरण्याचा निश्चय केला.

व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई (व्हीओसी) यांनी सूतगिरण्या, वाफेवर चालणाऱ्या जहाजांचा कारखाना, इ. ना चालना देत स्वदेशी चळवळीचे नेतृत्व करून, त्यात एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. सुब्रह्मण्य शिवा यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. शिवा यांनी स्वतःला व्हीओसी. यांच्याशी जोडून घेतले. व्हीओसींच्या सभांमध्ये ते प्रमुख वक्ते असत. त्यांची आवेशपूर्ण भाषणे ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमत. पहिल्याच प्रसंगी, सुब्रह्मण्य शिवा यांना ऐकून आणि त्यांच्या ब्रिटिश सरकारविरोधी लढ्यासाठीच्या कौशल्यांना पाहून, राष्ट्रवादी कवी महाकवी भारती यांनी त्यांचे ‘माझा नायक ‘शिवा’जी ! तू छत्रपती शिवाजींचा अवतार आहेस’ असे म्हणून कौतुक केले, त्यांना मिठी मारली आणि आशीर्वाद दिले.

सुब्रह्मण्य शिवा यांना त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला म्हणून व्हीओसीसह १० वर्षांची कठोर कैद झाली. त्यांनी याचिका केल्यावर ती शिक्षा ६ वर्षांपर्यंत कमी झाली. तिरूचीच्या तुरुंगात त्यांना कुष्ठरुग्णांसह डांबले गेले आणि अमानवी वागणूक मिळाली. त्यांच्या आजारपणावर खर्च करण्याची ब्रिटिश सरकारची इच्छा नव्हती, म्हणून त्यांना ४ वर्षांनीच १९१२ मध्ये मुक्त केले. ते त्यांच्या पत्नीसह चेन्नईला गेले. नेहमीप्रमाणे गरिबी त्यांचा कसोशीने पाठलाग करत होती. परंतु या गोष्टींमुळे त्यांच्या श्रद्धेला धक्का लागला नाही. ते म्हणत की, ‘आई पराशक्ती माझी काळजी घेईल’. एक छोटा व्यवसाय करणाऱ्या आणि ‘ज्ञान बानू’ नावाचे एक नियतकालिक चालवतणाऱ्या, त्यांची ‘हातावर पोट’ अशी परिस्थिती होती. ते उत्तम लेखक होते आणि त्यांनी १३ विविध विषयांवर लेख, कविता आणि कादंबऱ्या लिहिल्या. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आणि शिवा यांचे गुरु सच्चीदानंद स्वामी यांचा या यादीत समावेश होतो. १९१५ मध्ये त्यांची पत्नी मीनाक्षीच्या अकाली निधनाने ते स्वतंत्रपणे वावरू लागले. ते ब्रिटिश सरकारविरोधात बोलण्यास अधिकच उत्तेजित झाले. त्यांनी लोकांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा दिली.

१९२१ मधील मकर संक्रांतीपासून, त्यांनी केवळ भगवा कुर्ता नि पगडी परिधान करणे चालू केले, कारण स्वामी विवेकानंद हे त्यांचे मानसिक गुरु होते. तिथून पुढे ते संपूर्णपणे संन्यासी जीवन जगले. लोक त्यांना ‘स्वातंत्र्यानंद’ म्हणू लागले. त्यांच्या लिखाण आणि भाषणातून त्यांनी, त्यांचे खोलवर रुजलेले देशभक्ती आणि देवभक्तीचे विचार व्यक्त केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. त्यामुळे, त्यांनी अध्यात्मिक राष्ट्रवादाचा प्रसार केला, भारतमातेचे ध्यान करण्यास लोकांना प्रवृत्त केले. त्यांनी पापरपट्टी, जि. धर्मापुरी, तामिळनाडू येथे भारतमातेचे मंदिर बांधण्याची योजना आखली. चित्तरंजन दास यांच्या हस्ते आधारशीलेची स्थापना झाली. प्रक्षोभक भाषणे दिल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना दोनवेळा कैद केले. या वेळेपर्यंत, कुष्ठरोगामुळे त्यांची प्रकृती अजूनच खालावली होती. त्यामुळे, त्यांच्या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन, सरकारने त्यांना सोडून दिले. त्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना रेल्वेने प्रवास करण्यास बंदी घातली. या निर्बंधांनंतरसुद्धा त्यांनी पायी किंवा बैलगाडीने गावोगाव प्रवास करत आपला लढा चालूच ठेवला. भारतमाता मंदिराचे कार्य पूर्ण होण्यापूर्वीच १९२५ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

कांची पीठाधिपती, श्री शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती कुंभकोणम येथे महामागम (दर १२ वर्षांनी होणारा प्रयाग येथील कुंभमेळ्यासारखा एक उत्सव) साठी आले होते. शंकराचार्यांनी शिवाला बोलावून घेतले. त्यानुसार ते मठात गेले आणि त्यांनी स्वामीजींचे आशीर्वाद घेतले. स्वामीजींनी शिवाचे कौतुक केले आणि मनःपूर्वक म्हणाले की, “आज आम्हाला या नि:स्वार्थी आत्म्याला पाहण्याचे भाग्य लाभले. हा मला भगवान शिवाचे मूर्त रूपच वाटतो आहे. आपल्या देशातील माता जर हुतात्मा होण्याची खरी इच्छा असलेल्या मुलांना जन्म देतील, तर निःसंदिग्धपणे त्यांना आशीर्वाद मिळतील.”

संदर्भ : (१) स्वामीनाथ शर्मा यांचे ‘नान कंद नालवार’ हे पुस्तक (२) रागामी यांचे ‘सुब्रह्मण्य शिवा’ हे पुस्तक.

Back to top button