NewsScience and Technology

शास्त्रज्ञ ७
निर्वाताचा निर्मिक कादंबी अंबाशेखरन

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…

निर्वातीकरण तंत्रज्ञानात अर्थात व्हॅक्यूम टेक्नॉलॉजीमध्ये भारत स्वयंपूर्ण होऊ शकेल इतके मोलाचे योगदान देणारे कादंबी अंबाशेखरन( kadambi ambasekaran )यांनी उद्योग आणि संशोधक यांना एकत्र आणण्याचेही मोठे काम केले. त्यांनी स्थापन केलेल्या इंडियन व्हॅक्यूम सोसायटी( indian vacuum society) या संस्थेच्या माध्यमातून आजही निर्वातीकरण तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रकारचे अनेक प्रशिक्षण वर्ग चालविले जातात.

राष्ट्रउभारणीमध्ये मोठ्या प्रतिष्ठेच्या संस्थांची उभारणी हा ही एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये शांतपणे आणि नेटकेपणे सातत्यपूर्वक काम करणाऱ्या व्यक्तीही राष्ट्र उभारणीत आपले योगदान देत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. असे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कादंबी अंबाशेखरन, ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतात ज्याबद्दल फार विचार करण्यात आलेला नव्हता अशा एका नव्या अभियांत्रिकी क्षेत्राचा नेटकेपणाने विकास करीत राष्ट्र उभारणीच्या कार्यात मोलाचे योगदान देतानाच स्वतःला प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दूर ठेवलं. कादंबी या नावानेच प्रामुख्याने ओळखले गेलेले अंबाशेखरन यांनी निर्वात अभियांत्रिकी (व्हॅक्यूम इंजिनिअरिंग), क्रायोजेनिक्स आणि याच्याशी संबंधित शास्त्रांची पायाभरणी केली. स्वतंत्र भारताच्या प्रगतीला या सायाचे प्रचंड साह्य झाले.

कादंबी अंबाशेखरन यांचा जन्म २२ ऑगस्ट १९२३ रोजी झाला. त्यांनी तत्कालिन मद्राच्या ख्रिश्चन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर काही काळ तेथेच भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. तेथून ते ब्रिटनमध्ये मँचेस्टर येथे असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीजच्या संशोधन विभागात गेले. मँचेस्टरमधील तीन वर्षांत त्यांनी अणूची संरचना जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेले लिनियर अक्सिलरेटर व सायक्लोट्रॉन बनविण्याचे तंत्र आत्मसात केले. या क्षेत्रातील तज्ज्ञांची भारताला मोठी आवश्यकता होती अशा काळात म्हणजे १९५७ मध्ये ते भारतात परतले. डॉ. होमी भाभांच्या नेतृत्त्वाखाली अणु ऊर्जा विभागाची स्थापना होऊन तेव्हा अवधी तीन वर्षं झाली होती. अणुभट्ट्या बनवण्याचं काम जोमात सुरू होतं. तिथे कादंबींचा अक्सिलरेटर आणि सायक्लोट्रॉन बनविण्याच्या अनुभवाचा खूपच उपयोग झाला. अणुऊर्जा कार्यक्रमाचा भाग बनल्यावर कादंबींनी फक्त भारताची पहिली अणुभट्टी विकसित करण्यातच नव्हे, तर त्यासोबत अन्य अनेक तंत्रे विकसीत करण्यात मोलाचे योगदान दिले.

ज्या एका तंत्रामुळे कादंबीचं नाव भारतीय इतिहासात कोरलं गेलं ते तंत्र म्हणजे निर्वातीकरणाचं तंत्र डिफ्यूजन पंप, आयन पंप, अबसॉप्शन पंप, डिस्चार्ज गेज, औष्णिक ऊजी संवाहन मापी, आयनीकरण मापक, गळती शोधणारी उपकरणे, निर्वात नियंत्रक उपकरणे निधन झाले. अशा निर्वातीकरण तंत्रज्ञानाला आवश्यक असलेल्या अनेक प्रकारच्या उपकरणांची व तंत्रांचीही निर्मिती करून उच्च ऊर्जा निर्वात तंत्रज्ञानात भारताला स्वयंपूर्णता मिळवून देण्यात कादंबींनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्यामुळे व्हॅक्यूम फ्लास्क, टीव्ही ट्यूब, औषधनिर्मिती यांसारख्या अन्य अनेक क्षेत्रांतील प्रगतीचे नवनवे टप्पे साध्य करणेही भारताला शक्य झाले. या क्षेत्राची व्यापकता आणि तेथे काम करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन उद्योग व संशोधक यांना एकत्र आणत त्यांनी इंडियन व्हॅक्यूम सोसायटीचीही स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या निर्वातीकरण यंत्रणांची रचना, विकास, प्रचालन व रखरखाव अशा विविध विषयांवरील प्रशिक्षण कार्यक्रम चालवले जातात. त्यांच्या या कामाचा परिणाम म्हणून या सोसायटीतर्फे या क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे नाव अंबाशेखरन पुरस्कार असेच आहे.

अंबाशेखरन यांनी क्रायोजेनिक्स आणि सैन्यदलांसाठी अत्यावश्यक असलेल्या नाइट व्हिजन तंत्रज्ञानातही मोलाची भर घातली. क्रायोजेनिक्समध्ये द्रवपदार्थ थंड करण्यासाठी निर्वात पोकळ्यांचा वापर केला जातो.

भारत निर्वातीकरण तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होऊ शकेल, असे मोलाचे योगदान अंबाशेखरन यांनी निर्वात तंत्रज्ञानात दिले. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. प्रतिष्ठेच्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणूनही त्यांची निवड झाली. २० ऑगस्ट १९९० रोजी त्यांचे निधन झाले.

लेखक :- श्री. कोल्लगल शर्मा

(कोल्लगल शर्मा हे सौएसआयआरचे निवृत्त मुख्य वैज्ञानिक आणि प्रख्यात विज्ञान लेखक आहेत.)

(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)

Back to top button