Opinion

वासुदेव बळवंत फडकेंचे स्वदेशीचे कार्य- एक अज्ञात पैलू


वासुदेव बळवंत फडके हे क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध आहेत, पण क्रांतिकारक म्हणून कार्य आरंभ करायच्या आधी त्यांनी स्वदेशी वस्तूनिर्मिती उत्पादन, त्याचा प्रचार-प्रसार करून विक्रीचे प्रयत्न केले होते हे फार कमी जणांना माहित आहे. म्हणजे लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याही आधी महाराष्ट्रात स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या फडकेंच्या ह्या अज्ञात पैलूविषयी जाणून घेऊया.


वासुदेव बळवंत फडके आणि ओक कुटूंबीयांनी ‘ऐतद्देशीय व्यापारास उत्तेजन देणारी मंडळी’ नावाची सहकारी तत्त्वावर चालणारी संस्था स्थापन केली होती. ह्या संस्थेची त्यावेळच्या ‘संस्था निर्बंध, १८६०’ (Societies Act of 1860) अंतर्गत नोंदणी करण्यात आलेली नव्हती, पण ह्या निर्बंधान्वयेच संस्थेचे सर्व काम सुरू होते. या संस्थेत सुरुवातीला अकरा सदस्य होते आणि नंतर तिघांना सामील करून एकूण १४ सदस्य झाले. नंतर संस्थेचे सदस्य आर. बी. ओक यांनी धारवार मधून ११ सदस्य करून घेतले होते. त्यानंतर एकूण ३९ सदस्य झाले होते अशी नोंद सापडते, तसेच बेळगावचे काही देणगीदारही होते.


या संस्थेमार्फत साबण निर्मितीचा कारखाना सुरू करण्यात आला होता. साबणाची विक्री करताना साबणवडी सोबत एक आवाहन पत्रकही पाठवले होते. तेव्हा विदेशी साबणाचे मूल्य एक आणा होते, म्हणून स्वदेश-निर्मित साबणाचे मूल्यही एक आणा ठेवण्यात आले होते, परंतु साबणासोबत देण्यात येणाऱ्या पत्रकात विकत घेणाऱ्या ग्राहकाने दोन आणे द्यावेत असे आवाहन करण्यात आलेले होते. कारण हा स्वदेशी कारखाना नुकताच सुरू झाला होता, त्यामुळे विदेशी कारखान्यांच्या स्पर्धेत टिकून राहून त्यास स्थिरस्थावर होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, त्यामुळे विदेशी साबणाच्याप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यावरच विदेशी साबणाच्या इतकी किंमत म्हणजे एक आण्यात साबण देणे स्वदेशी कारखान्याला परवडू शकेल, त्यासाठी उत्पादन वाढवावे लागेल आणि उत्पादन वाढवण्यासाठी जनतेने ह्या साबणाचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक होते; म्हणून मग देणगीची मागणी करण्याऐवजी अर्थसहाय्याची ही क्लृप्ती योजण्यात आली होती. साबण वापरून त्यात काही सुधारणा हवी असल्यास तसे कळवण्याचे आवाहन देखील केले होते, तसेच वर्षभर हाच साबण वापरून संस्थेचे आश्रयदाते होण्याचेही आवाहन केले होते. ह्यामुळे पैसा उभा राहून कारखान्यासाठी आवश्यक साधने आणि इतर महत्त्वाच्या वस्तू घेता येतील अशी योजना होती. अशाप्रकारे एक कारखाना उभा राहून यशस्वीरित्या चालल्यास असाच दुसरा कारखानाही उभारता येऊ शकेल अशी योजना होती. संस्थेला सहाय्य करण्याची इच्छा असल्यास सदस्य पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.


फडके यासंबंधीच्या एका भाषणात म्हणतात, ‘देशात वापरल्या जाणाऱ्या वस्तू भारतातच उत्पादित केल्या जात नाहीत, हे देशाच्या दारिद्र्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे गरिबांना व्यावसायिक कौशल्य शिकण्यापासून आणि उपयोगात आणण्यापासून वंचित ठेवले जाते.’ म्हणजे भारताला आवश्यक वस्तू विदेशात उत्पादित केल्याने स्वदेशी उद्योग संकटात आले, त्यामुळे उद्योगधंदे व रोजगार बुडाला, परिणामी दारिद्र्य व बेरोजगारीची समस्या निर्माण झाली; तसेच वस्तू उत्पादन करण्याचे कौशल्य येथील गरीब जनतेला शिकताही येत नाही आणि न शिकल्याने ते उपयोगातही आणता येत नाही.’


त्यामुळे असे स्वदेशी कारखाने उभारल्यामुळे, अशा या स्वदेशी कारखान्यात जनतेने आर्थिक सहाय्य वा योगदान दिल्यास हा पैसा नैतिक कामासाठी दिला जाणार होता आणि स्वदेशी उद्योगास चालना मिळून परिणामी रोजगारनिर्मितीही होणार होती. जनतेच्या आर्थिक योगदानाद्वारे आपल्या संस्थेसाठी पैसा उभारता येईल अशी फडके व सहकाऱ्यांची अपेक्षा होती. नंतरच्या काळात यशस्वी झालेल्या पैसा फंडाची ही जणू नांदीच होती.


या संस्थेच्या कागदपत्रात फडकेंचे एक भाषण आढळून येते, त्याचे शीर्षक आहे- ‘हिंदुस्थानचे हिंदू लोकांची स्थिती इतक्या वाईट स्थितीस का आली व ती जाण्यास कोणते उपाय केले पाहिजेत’. ह्यात सुस्तपणा आणि अप्रामाणिकपणामुळे भारतीय जनता ५० वर्षे गाढ निद्रेत होती, पण सार्वजनिक सभेच्या स्थापनेने जागृती निर्माण होऊन राष्ट्रीय स्वाभिमान जागृत होऊन राजकीय जागरुकता वाढीस लागली आहे असे म्हंटले आहे. पुढे त्यात देशाच्या दुर्दशेची विविध कारणे देऊन प्रत्येक भारतीयाने आपल्या पगाराच्या १/६४ आणि १/१९२ भाग सहकारी पतपेढ्या किंवा बँकां अथवा उत्पादन प्रकल्पात गुंतवून नफा मिळवायला हवा, स्वदेशी निर्मित वस्तूच खरेदी करण्याची शपथ घ्यावी, जेणेकरून विविध वस्तू उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना प्रोत्साहन मिळेल असे उपायदेखील सांगण्यात आले आहेत. फडकेंनी महसूल प्रणाली आणि उत्पादन क्षमतेचा अभाव यावर लक्षकेंद्रीत केले होते.


आजच्या काळातही विदेशात उत्पादित केलेल्या वस्तू वापरायच्या ऐवजी विदेशी कंपनीच्या पण मेक इन इंडिया म्हणजे भारतात उप्तादित केलेल्या वस्तू वापरल्यास भारतीय जनतेचा रोजगार वाढेल ही भूमिका आहे. त्यापुढे एक पाऊल पुढे जाऊन आत्मनिर्भर भारत म्हणजे विदेशी कंपनीवर अवलंबून न राहता भारतीय कंपनीने भारतात उत्पादन करणे म्हणजे इतर देशांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होणे. यामुळे रोजगार निर्मिती होईल आणि विक्री वाढून भविष्यात ती भारतीय कंपनी आणखी उत्पादन वाढवून त्या वस्तू परदेशात निर्यातही करेल. म्हणजे आयात कमी झाल्याने परकीय चलनाची बचत होईल आणि निर्यात वाढल्याने नफा देखील वाढेल.


आत्मनिर्भर भारतची मुहूर्तमेढ वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी त्या स्वातंत्र्यपूर्वकाळीच रोवली होती. त्यांच्या कार्याचा अभ्यास केल्यास ठिकठिकाणी त्याचे दाखले दिसून येतात. त्यांच्या ह्या स्वदेशीच्या कार्यास पुढे नेऊन त्यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत घडवूया!
(या लेखाचा प्रमुख आधार डॉ. मोनिका वैद्य लिखित-प्रकाशित ‘The Chitpavans of Poona- 1885-1941- A Study’ [पृष्ठ ११५ ते ११८] हा ग्रंथ आहे.


वरिल संस्थेच्या संस्थापकांपैकी एक असणाऱ्या ओक कुटूंबातील वंशजांनी ह्यासंबंधीची मोडी लिपीतील जवळपास ५९ कागदपत्रे आणि साबण निर्मिती कारखान्यातील साबणाचे साचे असे सारे काही त्यांनी पुण्यातील भारतीय इतिहास संकलन समितीची धुरा वाहणाऱ्या संशोधक- संग्राहक डॉ. चिं. ना. परचुरे यांच्याकडे १९७८ मध्ये सुपूर्त केले होते. त्यावर एल. एस. वाकणकर संपादित ‘महाराष्ट्राचा इतिहास आणि सांस्कृतिक पर्यालोकन’, पुणे, १९९५ ह्यामध्ये डॉ. चिं. ना. परचुरे यांनी ‘वासुदेव बळवंत फडके आणि ऐतद्देशीय व्यापारास उत्तेजन देणारी मंडळी’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता.)

  • अक्षय जोग
  • (प्रथम प्रसिध्दी: एकता मासिक दिवाळी अंक)
Back to top button