Opinion

चला.. संविधान साक्षर होउ या!! – भाग ६ .

आज आपण पाहणार आहोत की संविधानाची प्रत दिसते कशी?

संविधानाची मूळ प्रत संसद भवनाच्या ग्रंथालयात विशेष रीतीने जतन करुन ठेवलेली आहे. संविधान संपूर्णपणे हाताने लिहिलेले आहे. जगातील सर्वात मोठे असे हे हस्तलिखित संविधान आहे.इंग्रजी आणि हिंदीत दोन वेगवेगळ्या सुलेखनकारांनी संविधान लिहिले आहे. संविधानाची मूळ इंग्रजी प्रत प्रेमबिहारी नारायण रायझादा यांच्या हस्ताक्षरात आहे. इटालिक, किंचित तिरक्या अक्षरात सुलेखनाने ही प्रत त्यांनी लिहिली आहे. या प्रतीचे प्रकाशन देहराडून मध्ये करण्यात आले आणि फोटोलिथोग्राफ सर्वे ऑफ इंडिया यांच्याकडून करण्यात आला होता. हिन्दी प्रतीचे सुलेखन वसंत कृष्ण वैद्य ह्यांनी केले आहे.

संविधानाच्या मूळ प्रतीवर आपल्याला सुंदर चित्रे दिसतात. ही चित्रे प्रख्यात चित्रकार नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी काढलेली आहेत. हे तेच नंदलाल बोस ज्यांनी पद्मश्री आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कार पदकांचे डिझाईन केले आहे. नंदलाल बोस ह्यांचे शिष्य जबलपूरचे राम मनोहर सिन्हा ह्यांनी प्रस्तावनेचे पान अतिशय सुंदर चित्रित केले आहे.

संविधानाच्या पानांवर कोणती चित्रे आहेत? भारताच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि इतिहास दाखवणाऱ्या प्रसंगांची रेखाटने घटनेच्या पानावर केलेली आहेत. कोण कोणती चित्रे आहेत त्याची सूची देखील आपल्याला शेवटी दिलेली आढळते.
त्याच्यात मोहंजोदारो आहे, वैदिक यज्ञ पद्धती आहे. राम लक्ष्मण सीता आहेत. अर्जुनाला भगवदगीता सांगणारे श्रीकृष्ण आहेत. भगीरथाच्या तपश्चर्येतून आलेली गंगा नदी आहे. सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग, राजा विक्रमादित्य इत्यादी शूरवीर आहेत. स्वातंत्र्यसैनिकांपैकी झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे. सुभाषचंद्र बोस आहेत त्यांची आझाद हिंद सेना आहे. महात्मा गांधी आहेत. शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध आहेत. भगवान महावीर आहेत.
तसेच विविधतेने नटलेल्या आणि निसर्गरम्य अशा भारत भूमीतील अनेक सुंदर दृश्ये संविधानाच्या पृष्ठावर साकारलेली आहेत. वेगवेगळ्या कालखंडातील भारतीय संस्कृतीची प्रतीकेच आपल्याला इथे दिसतात. एकूण अत्यंत वैभवशाली असे संविधानाचे दृश्य रूप आहे. गौरवशाली इतिहास, क्रियाशील वर्तमान आणि भारताचे उज्वल भवितव्य यांचेच जणू चित्रण भारतीय राज्यघटनेचा दृश्य रूप आपल्याला दाखवत आहे.

संदर्भ – संविधानाची प्रत

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले. संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.

संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा – पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!
लेखिका :-वृंदा टिळक

Back to top button