ChristianityNews

गोवा मुक्ती दिन.. भाग 10

goa liberation day..

( गोवा मुक्तीचा इतिहास सांगणारी १० भागांची विशेष मालिका.. )

महिलांचा मोठा सहभाग आणि बलिदान देखील…

गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. शेकडोंनी महिला कार्यकर्त्या या संग्रामात सहभागी झाल्या आणि नुसत्याच सहभागी झाल्या नाहीत तर त्यांनी तुकड्यांचं नेतृत्व केलं, प्रसंगी हातात शस्त्र घेऊन लढल्या देखील.

यात सुधा जोशी, सिंधुताई देशपांडे, कॉ. मालिनीबाई तुळपुळे, कमलाबाई भागवत, कमला उपासनी, प्रभा साठे, शांत राव या महिला लढ्यात अग्रभागी होत्या. कॉ. कमला भागवत यांनी आपल्या ‘न संपलेली वाट’ या आत्मचरित्रात गोवा मुक्ती संग्रामातील अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. त्यात महिलांच्या सहभागाबद्दलही त्यांनी बरंच लिहिलं आहे. यात त्यांनी म्हणलंय की, गोवा मुक्ती संग्रामात महिलांनी सत्याग्रहींची व्यवस्था करणं, स्वयंपाक करणं ही तर केलंच, पण न घाबरता सत्याग्रहींच्या तुकडीचं नेतृत्वही केलं. या संग्रामात महिला सर्व स्तरांवर कार्यरत होत्या.

women participation in free goa movement

कर्नल सिंग या स्वातंत्र्य सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून निडरपणे महिला पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढल्या. केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव या पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात धारातीर्थी पडल्या. अनेक जणी जखमी झाल्या.

शांततापूर्ण आंदोलनावर पोर्तुगीजांनी केलेला हल्ला बघून क्रांतिकारी पक्षाने सशस्त्र आंदोलन करायचे ठरवले. गोवा मुक्ती सैन्याची स्थापना शिवाजीराव देसाई यांनी केली. ते भारतीय सैन्यातील अधिकारी होते. अनेक बॉम्बस्फोट करून त्यांनी पोर्तुगीजांना जेरीला आणले.

स्वातंत्र्याचा दिवस उजाडला..

अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेरीस गोव्याला स्वातंत्र्य मिळायला हवं, याविषयी मत बनू लागलं .

free goa movement

1958 च्या आसपास पोर्तुगीज वसाहतवाद शक्य तितक्या लवकर नामशेष व्हायला पाहिजे, असा मतप्रवाह वाढत हेला आणि देशांतर्गत जनतेकडून आणि आफ्रिकी राष्ट्रवादी नेत्यांकडून दबाव वाढत गेला. त्याच काळात दिल्ली येथे झालेल्या गोमंतकीय सर्वपक्षीय बैठकीत देखील पोर्तुगीजांच्या विरुद्ध लष्करी कारवाई करण्यात यावी याची जोरदार मागणी झाली.

तरीही यात एकमत होण्यास दोन वर्षं गेली. पोर्तुगीजांनादेखील परिस्थितीचा थोडाफार अंदाज आला होता. कोणत्याही क्षणी भारतीय लष्कर गोव्यात शिरू शकतं याची कुणकुण त्यांनाही लागली होती. पणजी, वास्को, मडगाव, म्हापसा सारख्या शहरांत संचारबंदी घोषित केली होती.

स्वातंत्र्यसैनिकांनी भारत सरकारच्या आदेशाची वाट न बघता आपला लढा सुरू ठेवला होता. अखेरीस 18 डिसेंबर 1961 रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले. गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेण्यात आल्या.

free goa newspaper

पोर्तुगालने ब्रिटन, अमेरिका यासारख्या मित्र देशांकडे मदतीचा हात मागितला होता. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कम आणि योग्य असल्यामुळे या मित्र देशांनी पोर्तुगीजांना मदत करणं नाकारलं.

तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हे लष्करी कारवाईसाठी आग्रही होते. पोर्तुगीज सरकारची कोंडी करण्यात भारतीय लष्कर आणि स्वातंत्र्यसैनिक यशस्वी झाले. पत्रादेवी येथे स्वतंत्र सैनिकांवर पोर्तुगीज सैन्याने मोठा गोळीबार केला. त्यात अनेक स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले.

अखेरीस 19 डिसेंबर 1961 च्या रात्री दहा वाजता पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा यांनी शरणागतीच्या दस्तावेजावर सही करून ते भारतीय लष्कर प्रमुखांना दिले. पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा अखेरीस मुक्त झाला. सुमारे ४६०० पोर्तुगीज सैनिक, अधिकारी व समर्थक यांना भारतीय लष्कराने अटक केली. ऑपरेशन विजयवर आधारित ‘सात हिंदुस्थानी’ हा सिनेमा हा पुढे गाजला होता..

saat hindustani” movie portrays the story of the struggle for Goa’s liberation and explores themes such as patriotism, unity, and the power of collective action.

समाप्त..

Back to top button