News

विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा प्रक्रियेचा शुभारंभ संपन्न

मुंबई, दि. १९ ऑगस्ट : विद्यार्थी विज्ञान मंथन २०२१-२२ परीक्षा प्रक्रियेचा शुभारंभ ७.ऑगस्ट २०२१ रोजी आभासी पद्धतीने शिक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष सरकार यांच्या हस्ते पार पडला. विद्यार्थी विज्ञान मंथनची वेब साईट, माहिती पत्रक व अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

विद्यार्थी विज्ञान मंथन हा विज्ञान प्रसार, एनसीइआरटी यांच्या सहयोगाने इ. ६ वी ते ११ वी च्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संकल्पना रुजवणे व त्यांच्यातील वैज्ञानिक प्रतिभावंतांचा शोध घेण्यासाठी चालविण्यात येत असलेला राष्ट्रीय उपक्रम आहे. आपल्या देशाचा वैज्ञानिक इतिहास, वर्तमान व भविष्यातील वैज्ञानिक प्रतिभेचा शोध या मंथनातून केला जाणार आहे.

प्राचीन पारंपरिक ते अर्वाचीन विज्ञान व तंत्र ज्ञानातील भारतीय योगदानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थी विज्ञान मंथन योगदान देत आहे व मूलभूत विज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यास सहाय्यभूत ठरत आहे. आभासी पद्धतीने ही परीक्षा घेतली जात असून राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यावर भर दिला जातो.

विद्यार्थी विज्ञान मंथन ही एकमेव ऍप आधारित विज्ञान प्रतिभा शोध परीक्षा आहे. २०१७ पासून पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. नोंदणीकृत विद्यार्थी घरातून स्वतःच्या उपकरणाचा (लॅपटॉप, स्मार्ट फोन , संगणक)उपयोग करून ही परीक्षा देऊ शकतात. शालेय स्तरावरील परीक्षा ३० नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर रोजी (निवडलेल्या दिवशी) आयोजित केली जाईल

इंग्रजी व हिंदी सह १२ भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. नोंदणीकृत विद्यार्थ्यांना बहुस्तरीय चाचण्या द्याव्या लागतात. पहिली फेरी शालेय स्तरावर आधारित असून यात बहूपर्यायी प्रश्न विचारले जातात. प्रत्येक वर्गातील पहिले २० विद्यार्थी राज्यस्तरीय परीक्षेसाठी निवडले जातात. राज्यस्तरीय परीक्षेत विद्यार्थ्यांना अनेकविध प्रक्रियांमधून जावे लागते व त्यानंतरच त्यातले वर्गश: २ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरतात.

राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांना भेटी, प्रख्यात शास्त्रज्ञांबरोबर संवाद, प्रत्यक्ष अनुभवासाठी कार्य शाळांमध्ये सहभाग याशिवाय, राज्य, क्षेत्र व राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांसाठी रोख रकमेची पारितोषिके दिली जातात. यावर्षीच्या नोंदणीस सुरुवात झाली असून शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२१ असणार आहे.https://vvm.org.in या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करू शकतात.

आभासी पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात विज्ञान भारती चे राष्ट्रीय संघटन मंत्री जयंतराव सहस्त्रबुद्धे, विज्ञान प्रसार चे संचालक नकुल पराशर, एनसीइआरटी चे संचालक श्रीधर श्रीवास्तव, केंद्रीय विद्यालय संघटन आयुक्त डॉ निधी पांडे, जवाहर नवोदय विद्यालय संघटन चे उपायुक्त राघव कावलान व माध्यमिक शिक्षण मंडळाचे महासचिव एम.सी. शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अनेक विद्यार्थी, शिक्षक, पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते

Back to top button