Opinion

संत एकनाथ महाराज

प्रपंचाबरोबर परमार्थ साधण्याची स्वानुभवातून शिकवण देणारे संत

एका जनार्दनी विनंती। येऊनी मनुष्य देहप्रती। करोनीया भगवद्भक्ती। निजात्मप्राप्ती साधावी। या दोनच ओव्यात एकनाथांनी साऱ्या जीवनाचे सार सांगितले आहे .मनुष्य देह आत्मप्राप्तीसाठी मिळाला आहे. ही आत्मप्राप्ती कशी करावी .भगवत भक्तीने आत्मप्राप्ती होते. एकनाथांनी आधी केले मग सांगितले.

लहानपणीच त्यांचे आई वडील गेले आणि एकनाथांचा सांभाळ त्यांच्या आजी-आजोबांनी केला. त्यांना दगडाचा देव करून त्याची पूजा करणे लहानपणी खूप आवडे. लोकांना देवाविषयी सांगावयाचे असेल तर स्वतःला आधी समजले पाहिजे. म्हणून गुरुच्या शोधात एकनाथ महाराज बाहेर पडले. त्यावेळी त्यांचे वय होते आठ वर्षे . एका वृद्ध गृहस्थाने त्यांना देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांचे कडे जाण्याचा सल्ला दिला . त्याप्रमाणे बाळ एकनाथ स्वामींकडे गेले. स्वामींना आई-वडिलांवर रुसून हे बाळ आपल्याकडे आले आहे असे वाटते . पण एकनाथांनी ॓चित्ताला अनुताप झाल्यामुळे ॔आलो असे सांगितले. जनार्दन स्वामींना गुरु करून त्यांनी तेथेच सेवावृत्ती होणे स्वीकारले. चिकाटी, श्रद्धा ,सदाचार, विवेक, अभ्यासूपणा या गुणांवर त्यांनी विविध ग्रंथांचे अध्ययन केले. न्यायादि तत्त्वज्ञानाविषयीच्या ग्रंथांचे अध्ययन केले. तलवारबाजी देखील ते शिकले .खटले ,तक्रारी आदि लोकांच्या प्रश्नावर कचेरीत उत्तर देण्यासाठीचे कौशल्य देखील त्यांनी आत्मसात केले. त्यांचा सर्वांगीण विकास झाला. जनार्दन स्वामींनी त्यांना देशाटनाला पाठवले. विविध भागात फिरल्याने जनमानसाची नाडी ओळखण्यात एकनाथ महाराज पटाईत झाले.

त्रिगुणात्मक दत्त हे जनार्दन स्वामींचे आराध्य दैवत ते एकनाथांचेही होते. नाथांना आता दत्ताचे ठिकाणीच उत्पत्ती विकास व लय आहे याची जाणीव झाली दत्त येऊनिया उभा ठाकला…… जन्ममरणाचा फेरा चुकविला। मनाची आता अशी अवस्था झाली. नाथ म्हणतात श्री दत्तात्रय हे माझ्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून आहेत. नाथांची तपश्चर्या पूर्ण झाली. गुरु आज्ञेप्रमाणे पैठण हेच त्यांचे कार्यक्षेत्र बनले. त्यांचा विवाह गिरीजाबाई या सुस्वाभावी मुलीशी झाला. संसारिक असूनही परमार्थ कसा साधता येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ महाराज आहेत. सूर्योदयापूर्वी ईश्वर चिंतन, गोदावरी स्नान,ता पठण, दुपारी ज्ञानेश्वरी प्रवचन देणे, रात्री देवळात कीर्तन असा त्यांचा दिनक्रम होता. अनुताप झाल्याशिवाय नामस्मरण होत नाही .हरिनाम हेच शाश्वत आहे .सर्व धर्म,पंथ ,जाती एकाच परमेश्वरास प्राप्त करून देतात. मनात वैराग्य आले पाहिजे. त्यासाठी भक्ती करणे गरजेचे आहे . बहुजन समाजात फिरल्याने त्यांना सर्वांच्या बोलीभाषा अवगत होत्या. त्यामुळे बहुजन समाजाला समजेल अशा त्यांच्या बोली भाषेत वाघ्या, मुरळी, जोगवा, गोंधळ या नित्यप्रकाराना भारुड रूपात घालून त्यांनी अध्यात्म समजावून सांगितले. एका जनार्दनी असे आपल्याबरोबर गुरुचे हे नाव जोडुन ते अभंग व आरत्यांचा शेवट करीत. नाथांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन केले. भावार्थरामायण ,शुक्राष्टक ,रुक्मिणी स्वयंवर ,गीतासार आदि लोकप्रिय ग्रंथ लिहिले. गाथेमध्ये अभंग, भारुड असे अनेक प्रकार आहेत .त्यांनी लिहिलेल्या एकंदर पदांची संख्या 75 हजार पर्यंत होते. आदर्श प्रपंच व उदंड ज्ञानदान,षड्विकारांपासुन मुक्ती असे नाथांचे जीवन प्रपंचाबरोबरच परमार्थ कसा साधावा याचा मापदंड ठरते.

Back to top button