CultureHinduismNewsSpecial Day

छत्रपती शिवरायांचे अष्ट प्रधानमंडळ..

chhatrapati shivaji maharaj ashtapradhan mandal

छत्रपती शिवराय म्हणजे हिंदुस्थानाच्या इतिहासातील तेजस्वी हिरा. मात्र हिरा जसा रत्नामोत्यांच्या कोंदणात शोभून दिसतो त्या प्रमाणे छत्रपती शोभायमान होतात ते त्यांच्या सामर्थ्य संपन्न मंत्रिमंडळामुळे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सन १६७४ मध्ये शिवराय सिंहासनाधिश्वर आले. त्याच वेळी त्यांनी आपल्या अष्टप्रधानांची अधिकृत नेमणूक केली. प्रजेला छत्रपतींबरोबर मंत्रिमंडळ ही मिळाले.

राजांना जीवाला जीव देणारे अनेक सहकारी मिळाले होते. आपल्या आत्यंतिक निष्ठेपायी कित्येकांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारली होती. पण मंत्रिमंडळात मंत्री निवडताना राजांनी अत्यंत बारकाईने विचार करून त्यांची निवड केली होती. या वेळेस राजांनी कसा विचार केला असेल ते याच मंत्रिमंडळात असणाऱ्या रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रे या ग्रंथातून समजते. या ग्रंथात रामचंद्रपंत म्हणतात, प्रधान म्हणजे राज्यरक्षणाचे स्तंभ, नृपसत्ता प्रसारक, प्रजापालन व धर्मसंरक्षणाचे अध्यक्ष, राजपदजनित अन्याय सागराची मर्यादा, हस्तीचे अंकुश, प्रधानच राजबंधू व नृपांची विश्रांती याकरिता (अष्टप्रधानात स्थान दिले जाणे) ते बहुत विचारून, मनुष्य परीक्षा करून, सलक्षणिक मनुष्य वाढवित वाढवित, नियोजित कार्य धुरंधर पाहून मग सरकारकुनी सांगावी. प्रधान हा कुलीन, कार्याकार्य विचक्षण, राजधर्म विशारद, पापभीरु, संधैर्य, समंजस, निराग्रही, निरालस्य, निर्व्यसनी, पुण्यशील, उद्योगशील, अलालुची व शत्रुसाधनी चतुर तसाच सामदाम दंड भेदादि गुणाद्वारे त्यास वश करणारा असा बहुविध, गुणसंपन्न असावा” या वरून शिवछत्रपतींनी मंत्र्यांची पारख किती कसोटी लावून केली असेल याचा अंदाज बांधता येतो.

या अष्टप्रधानांपैकी एकदोन अपवाद वगळले तर बाकी सर्व मंत्र्यांना मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत…

१) पंतप्रधान – मोरोपंत पिंगळे

मोरोपंत हे पहिल्या छत्रपतींचे पहिले पंतप्रधान. राज्यकारभाराबरोबर आवश्यक तेव्हा युद्ध नेतृत्वही त्यांना करावे लागे. त्यांची एक मुद्रा पुढीलप्रमाणे होती
-श्री शिवराजेंद्र हर्षनिधान त्र्यंबकसुत मोरेश्वर मुख्य प्रधान. ते पुरंदरचे किल्लेदार होते. प्रतापगड बांधकामाची जबाबदारी त्यांच्यावर होती. साल्हेरच्या प्रसिद्ध रणसंग्रामात त्यांच्या युद्धनेतृत्त्वाचे दर्शन घडले. शिवकालात त्यांना सात हजार होनांचा पगार मिळत होता.

२) पंतसचिव – अण्णाजी दत्तो.
हे मूळचे संगमेश्वर परिसरातील कुलकर्णी अफजल वधानंतरच्या मोहिमेत ते होते. पन्हाळा जिंकून घेण्यात त्यांचा सहभाग होता. खाजगीचा कारभार पत्रव्यवहार, दप्तर सांभाळणे आमंत्रणे व भोजन व्यवस्था सांभाळणे ही कामे त्यांनी केली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीची पहाणी, मोजणी, प्रतवारी ठरवणे, सारा वसुली ही कामे हे त्यांचे वैशिष्ट्य! तत्पर शिवकालात त्यांना पाच हजार होन इतका पगार दिला जात असे. त्यांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती.
श्री शिवचरणी निरंतर दत्त सुत अनाजीपंत.

3) अमात्य रामचंद्र नीलकंठ

राज्यातील वसुली करणे व त्याचा जमाखर्च ठेवणे हे यांचे काम होते. हे मोरोपंत पिंगळे यांचे जावई होते. पुरंदर किल्ला जिंकणे, सिंधुदुर्गाची सबनिशी सांभाळणे ही कामे त्यांनी केली. राजाराम महाराजांच्या काळात ‘हुकुमत पन्हा’ हा अत्यंत मानाचा किताब त्यांना मिळाला. औरंगजेब आक्रमणाच्या काळात स्वराज्य सांभाळण्याचे अत्यंत जोखिमीचे काम त्यांनी केले. पाच छत्रपतींच्या बरोबर काम करून राष्ट्राची प्रदीर्घ सेवा त्यांनी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे शिवरायांची राजनीती ज्यातून समजते ‘असा ‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ लिहून त्यांनी मराठी लोकांवर अनंत उपकार केले.

४) श्री रामचंद्र चरण निलकंठ सोनदेव शरणमंत्री दत्ताजी गुप्तहेरांकडून बातम्या मिळवणे व दरबाराची बातमीपत्र तयार करणे हे मंत्री या पदावरील व्यक्तीचे काम होते. शिवरायांची पागा सांभाळणे, आग्रा येथे राजे गेले असताना त्यांची सुरक्षा राखणे अशी अत्यंत महत्त्वाची कामे त्यांनी केलेली आढळतात शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत त्यांचा सहभाग होता.

५) सुमंत त्र्यंबक सोनदेव

सुमंत म्हणजे जणू परराष्ट्रमंत्री परराज्य व्यवहार, तेथील आपल्या लोकांचे रक्षण आपले वकील परराज्यात नेमणे, परराज्यातील आपल्या दरबारातील लोकांकडे लक्ष देणे. अशी कामे सुमंताला करावी लागत आग्रा भेटीच्या वेळी ते राजांबरोबर होते राजांनी यशस्वी पलायन केले पण त्र्यंबक सोनदेव औरंगजेबाच्या हाती सापडले व मोगलाईत त्यांचा प्रचंड छळ झाला.

६) न्यायाधिश – निराजी रावजी न्यायदान करणे हे यांचे महत्त्वाचे कार्य, आग्रा भेटीच्या वेळी ते राजांबरोबर गेले होते शिवराज्याभिषेकाच्या वेळेला इंग्रज वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडन आला होता त्याचे स्वागत निराजीपंतांनी केले होते. बहादुरगडावरील बहादूरखान कोकलताश याची फजीती घडवून आणण्यात याचा मोठा वाटा होता. शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीत वकील म्हणून त्यांना ठेवले होते पण हैद्राबाद येथेच त्यांचा मृत्यू झाला.

७) पंडितराव – बुनाथ मोरेश्वर

दानाध्यक्ष हे नवे पद शिवरायांनी निर्माण केले. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विद्वान व सुयोग्य व्यक्तींना राजाकडून दानधर्म केला जाण्यासाठी या पदाची निर्मिती केली गेली.शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत त्यांचा सहभाग होता.

८) सेनापती हंबीरराव मोहिते

सेनेचे नेतृत्त्व करणे ही जबाबदारी सेनापतीजी. नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर यांच्या नंतर राज्याभिषेकप्रसंगी ही जबाबदारी हंबीररावांवर आली. शिवाजी महाराज यांच्या काळात आणि संभाजी महाराज हंबीररावांनी अत्यंत शौर्याने आणि निष्ठेने स्वराज्याची सेवा केली. शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. त्यांना निर्णय घेण्यास सक्षम बनवले. त्या रचनेमुळेच जरी एक अधिकारी सक्षम नसेल तर दुसऱ्याने जबाबदारी पेलायची या तत्त्वानुसार पुढची शंभर दिडशे वर्षे मराठ्यांचे कार्य चालले व विशाल आणि सामर्थ्यसंपन्न मराठी साम्राज्य अस्तित्त्वात आले.

लेखक :- मोहन शेटे

( लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

Back to top button