Opinion

वीरशैव लिंगायत हिंदूच ! भाग २

पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न आणि आपण

भारतवर्षाला धर्मांतरित करण्याचे प्रयत्न मागील १४०० वर्षांपासून सुरू आहेत. तरी परधर्मीयांना पूर्ण यश आले नाही. गांधार, सिंध, पूर्व बंगाल या भारतीय भूभागात धर्मांतर करण्यात यश आले आणि ते भूभाग आज अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या नावाने ओळखले जात आहेत. आज ते भूभाग सांस्कृतिक दास्यात आहेत. भारतवर्षाचा मोठा भूभाग आजही भारत या नावाने जिवंत आहे. हा भाग अद्यापही का धर्मांतरित होऊ शकला नाही, हा सर्वात मोठा प्रश्न विस्तारवादी एकांतिक धर्मांच्या समोर आहे.

भारतात असलेली ज्ञातींची रचना हा धर्मांतर करण्यातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या लक्षात आले. मग सुरू झाले ज्ञातींना बदनाम करण्याचे षडयंत्र. जाती-जातीत तेढ वाढवण्याची कुटील कारस्थाने. थेट धर्मांतरित करता येत नाही मग संभ्रम उत्पन्न करा, ही कुटील पद्धती पुढे आणली गेली. आणि मग अनेक पुस्तके रचली गेली. अनेकांना आर्थिक कुमक देऊन समाजाला तोडण्याला पोषक ठरणारी साहित्य निर्मिती करण्यात येऊ लागली. सर्वसामान्य माणूस संभ्रमित होई असे प्रश्न निर्माण केले गेले. त्यामुळे अशा प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देण्याची गरज निर्माण झाली. या गरजेतून निर्माण झाला लघुग्रंथ – वीरशैव लिंगायत हिंदूच!

पुन्हा पुन्हा विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे द्यायचीच आहेत. परंतु, समोरचा प्रश्नांचा भडिमार करत राहणार आणि आपण केवळ उत्तरे देत बसू असे करणे म्हणजे षडयंत्रकारी लोकांच्या षडयंत्राला बळी पडण्यासारखे होईल. त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचेच आहे. आणि एका प्रश्नाचे उत्तर देऊन आपल्याला त्यांच्यावर १० प्रश्न उपस्थित करता आली पाहिजेत. त्या १० प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय त्यांना बोलूच द्यायचे नाही. समाजाला तोडण्याचे काम तुम्ही करत आहात, तर उत्तरे तुम्हीच दिली पाहिजेत. परंतु, हे करताना एक काळजी घेतली पाहिजे, समोरची व्यक्ती आपला बांधव आहे, हे विसरता येणार नाही.

मिशनरी किंवा शहरी नक्सली लोकांनी पसरवलेल्या भ्रमामुळे आपले बांधव चुकीच्या माहितीच्या आधारे प्रश्न करत आहेत. त्यांना उत्तर देताना ते आपले शत्रू नाहीत तर ते आपले बांधवच आहेत, हे सत्य विसरून चालणार नाही. चीन, व्हॅटिकन आणि पाकिस्तानात बसलेल्यांच्या तालावर आपले स्वत्व विकून समाजाला भरकटवणारे आपले खरे शत्रू आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावर संवाद प्रेमानेच केला पाहिजे. शुद्ध, सात्विक प्रेम हाच आपल्या कार्याचा आधार आहे. भ्रम उत्पन्न करणाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायचीच. त्याच वेळी समाज तोडू पाहणाऱ्यांना शक्तींसमोर आपल्याला प्रश्न करता आले पाहिजे. यासाठीच छोटी पुस्तिका बनवली गेली – वीरशैव लिंगायत हिंदूच!

लिंगायत हा हिंदू धर्माहून वेगळा धर्म आहे काय?

नाही! नाही!! नाही!!! लिंगायत हा हिंदू धर्माचाच अविभाज्य भाग आहे. जर लिंगायत समाज हा हिंदू नसेल तर या भारतात कोणीच हिंदू असणार नाही. कैलासात राहणारा जटाधारी भगवान शिव हे लिंगायत समाजाचे आराध्य दैवत आहे. देवांचा देव महादेव, त्यांची इष्टलिंग रूपात पूजा करणारा, शिवलिंग इष्टलिंग रूपात शरीरावर धारण करणारा लिंगायत समाज हिंदू नाही असे म्हणणे म्हणजे लिंगायत समाजाचा अपमान आहे. परंतु, असा अपमान समाजाबाहेरील कोणी करू शकणार नाही. तशी कोणाची हिंम्मत होणार नाही. त्यामुळे आम्ही हिंदू नाही म्हणणारे लोक लिंगायत समाजातच उभे करण्याचा कुटील डाव बामसेफसारख्या विद्रोही चळवळीने भरकटलेले काही समाजबांधव खेळत आहेत. त्यांना रोखले गेले पाहिजे.

लिंगायत समाजातील पाच सर्वोच्च जगद्गुरू यांनी एकत्रित येऊन घोषणा केली आहे की, वीरशैव लिंगायत समाज (veershaiv lingayat samaj) हा हिंदू धर्माचाच अविभाज्य भाग आहे. इतकेच नाही तर महात्मा बसवण्णा यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक जयदेवीताई लिगाडे यांनी शून्य संपादने या कन्नड पुस्तकाचा अनुवाद करताना लिहिले आहे, “बाराव्या शतकात तात्कालिन समाजाची विचारधारा व जीवनक्रम तेजोहीन व शिथील बनला होता. उत्तरेकडे सतत होणाऱ्या परकीय आक्रमणाचे भय व वर्णाश्रम धर्मातील मूलभूत दोषांमुळे सर्वत्र फुटीरता वाढली होती. अशा पार्श्वभूमीवर हिंदू समाज एकसंध व एकजिनसी बनवण्याची नितांत आवश्यकता होती. याकरिता नव्या विचार प्रणालीची, आचारसंहितेची गरज होती. हे महान कार्य महात्मा बसवेश्वरांनी(mahatma basweshwar) केले.’’

महात्मा बसवण्णा यांनी हिंदू समाजाला एकसंध करण्यासाठी, जातीभेद निर्मूलनासाठी शेवटपर्यंत झटले. उपनिषदांतील तत्त्वज्ञान वचन साहित्यातून लोकभाषेत आणले. आज त्यांचेच नाव घेत लिंगायत समाजाला तोडण्याचे पातक करणे, हे महात्मा बसवण्णा यांच्याशी प्रतारणा नाही काय? या प्रश्नाचे उत्तर द्या, असे आम्ही हिंदू नाही म्हणणाऱ्यांना खडसावून विचारले पाहिजे. आदी या प्रश्नाचे उत्तर द्या आणि मग बोला.

(क्रमश:‌)

लेखक :- विशाल नन्ना, अक्कलकोट

इतर काही म्हत्वाचे मुद्दे पुढील भागात

Back to top button