Opinion

१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम

रणी राष्ट्र स्वातंत्र्ययुद्धासी ठेलें।

मरे बाप, बेटे लढायासी आले ।

किती भिन्न रुपे, किती भंग होतो।

तरी राम अंती जयालाच देतो ।।-

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

इंग्रजांचे राज्य जेव्हापासून भारतभर सर्वत्र पसरायला लागले तसे त्यांनी पूर्वीची संस्थाने खालसा करण्याचा सपाटा लावला होता. लॉर्ड डलहौसी या तत्कालीन भारताच्या गव्हर्नर जनरलने सन १८५७ पूर्वी आसाम, कुर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू असे काही प्रांत हस्तगत केले. दत्तक वारस हा गादीचा वारस होऊ शकत नाही हे कारण देऊन सातारा, झाशी, नागपूर, ओर्च्छा, जैतापूर अशी अनेक संस्थाने आपल्या ताब्यात घेतली. सन १८१८ च्या नंतर बिठुर येथे राहणाऱ्या दुसऱ्या बाजीरावाच्या मुलाचा म्हणजेच दुसऱ्या नानासाहेब यांचादेखील तनखा बंद केला गेला. एवढंच नव्हे तर अव्यवस्थित कारभाराचे निमित्त पुढे करुन अयोध्या व वऱ्हाड हे प्रदेश देखील इंग्रजांनी ताब्यात घेतले. संस्थाने खालसा झाल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक व सैनिक बेकार झाले. १८३३ पासून इंग्रजांनी अनेक युद्धे केली. तसेच या युद्धासाठी येणारा खर्च मात्र भारतीयांच्या माथी बसत होता. हे सर्व करत असतानाच इंग्रजांनी धार्मिक बाबतीतही लुडबुड सुरु केली.

हिंदू व मुसलमान या दोन्ही धर्माचे कोणतेही हक्क राहिले नाही पाहिजेत असा एक कायदा ब्रिटिशांनी बनवला. परंतु हा कायदा बनवताना ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रजांनी मात्र ख्रिस्ती धर्मप्रसारास उत्तेजन दिले. या कायद्यात एकूण ८४ कलमे होती. यामध्ये एक कलम असे होते की ४ पैकी १ भाऊ ख्रिस्ती झाला तरी त्याचा वारसा हक्क डावलला जाणार नाही. यातूनच जनतेत इंग्रजांच्याविषयी द्वेष निर्माण होऊ लागला.

ईस्ट इंडिया कंपनीच्या पदरी तैनात असलेल्या सैनिकांना ज्या बंदुका दिल्या जात तिच्या काडतुसांना गाय व डुकराचे मांस लावले जात असे. हे काडतुस शिपायांना दाताने तोडावे लागत असे. यावरुन तत्कालीन नेटिव्ह पलटणीत असंतोष पसरला. हिंदी सैन्याच्या बळावर जरी अनेक युद्धे इंग्रजांनी जिंकली तरीही बक्षिसे व बढती मात्र इंग्रजी अधिकाऱ्यांना मिळत असे. यासर्व गोष्टींनी मात्र एका नव्या क्रांतीला जन्म दिला.

१८५७ चा उठाव हा नियोजित होता. ३१ मे रोजी हा उठाव होणार असताना अचानक सैनिकांना काडतुसांच्या सत्यतेबद्दल माहिती मिळाली व २९ मार्च रोजी बराकपूर येथे मंगल पांडे या सैनिकाने काडतुसे वापरण्यास नकार दिला. तसेच त्या काडतुसांची सक्ती करणारे ब्रिटिश अधिकारी मेजर हडसन बाँ व कमांडर जनरल व्हीलर ह्यांना ठार मारले. अंतिमतः मंगल पांडे ह्यांना पकडून ८ एप्रिल रोजी फाशी देण्यात आले. क्रांतीचा पहिला बळी फासावर गेला. पेन्शन परत मिळवण्यासाठी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे वकील रंगो बापूजी व नानासाहेब पेशव्यांतर्फे अजीमुल्लाखान हे दोघे इंग्लंडला गेले असता त्यांना योग्य पद्धतीने वागवण्यात आले नाही. तसेच पेन्शन देखील नामंजूर करण्यात आले. यामुळे रंगो बापूजी ह्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात हालचाली करत दक्षिणी राज्यांची तर अजीमुल्लाखान यांनी परकीयांची मदत मिळवायचा प्रयत्न सुरू केला. ३१ मे हा दिवस उठावाचा ठरला असताना मिरत येथे मंगल पांडेंना फाशी दिल्याची बातमी आली व तेथील नेटिव्ह पलटणीने काडतुसे वापरण्यास नकार दिला. ९ मे रोजी या पलटणीचे कोर्ट मार्शल केले गेले तसेच या सर्व ८५ सैनिकांना तुरुंगात डांबले गेले. तसेच बख्ताबरी देवी, भगवती देवी त्यागी, हबीबी खातून गुर्जर अश्या एकूण २५५ महिला देखील इंग्रजांच्या विरोधात बंड केल्याचे कारणाने फाशीवर चढल्या.

मिरत येथे सामान्य जनतेच्या मनात ही गोष्ट घर करुन इतकी बसली की तेथील वेश्यांनी बाकीच्या सैनिकांना “आम्हाला हत्यारे द्या, आम्ही आमच्या शूर शिपायांना सोडवतो, आमच्या बांगड्या तुम्ही हातात भरा,” अशा शब्दात सुनावले. याचा परिणाम म्हणून १० मे रोजी संध्याकाळी ६:३० वाजता चर्चमधून बाहेर पडणाऱ्या इंग्रजांना भारतीय सैनिकांनी कापून काढले व त्या ८५ सैनिकांना बंधमुक्त केले. पुढे हे सर्व सैनिक मिरतमधील इंग्रजांना मारुन दिल्लीच्या दिशेने वाटचाल करु लागले. वाटेत बाकीची सर्व माणसे ह्या सैनिकांना सामील होत गेली.

एका सैनिकाची पत्नी आशादेवी गुर्जर ह्यांनीही सैन्याची साथ देत आपल्या सहकारी महिलांसोबत कैराना व शामली या भागात हल्ले चढवले. पुढे आशा देवी व त्यांच्या ११ सहकारी क्रांतिकारी महिलांना फाशी देण्यात आली व नंतर त्यांना साथ देणाऱ्या २६५ महिलांना गोळ्या झाडून ठार करण्यात आले.

१८५७ चा लढा हा प्रामुख्याने सर्वांनी एकत्र येऊन लढलेला पहिला मोठा लढा म्हणता येईल. ज्यांच्या पूर्वजांनी अटक पासून कटक पर्यंत मराठा साम्राज्याची सीमा नेली त्या नानासाहेब पेशव्यांना या उठावात आघाडीचे जेतेपद मिळाले होते. त्यांचा तनखा बंद झाल्यावर अजीमुल्लाखान यांनी त्यांना तो संदेश देण्यापूर्वी त्यांच्या डोक्यात उठावाचे विचार येत होते. त्यांचे हेर कानपुर, मेरठ, अयोध्या, दिल्ली, झाशी, ग्वाल्हेर, इंदूर, नागपूर, पुणे, सातारा, भाग्यनगर, मद्रास या ठिकाणी क्रांतीचे निशाण म्हणून लाल कमळ घेऊन पोचते झाले. एकीकडे हे करत असतानाच नानासाहेब मात्र इंग्रज अधिकारी हो व्हीलरशी चांगले संबंध ठेवून होते. हो व्हीलरने मेरठ व दिल्लीच्या उठावाबद्दल ऐकल्याने त्याने नानासाहेबांना त्यांच्या मदतीला बोलावले. आपल्या वाक्चातुर्याने नानासाहेबांनी तोफखाना व खजिना आपल्या नेतृत्वाखाली वळवून घेतला. नानासाहेबांविषयी इंग्रजी ‘के’ नावाचा लेखक लिहितो, “मराठी राज्यसंस्थापक शिवाजीच्या चरित्रांचा अभ्यास त्यांनी उगाचच केला नव्हता.” पुढे नानासाहेबांनी इंग्रजांच्याच तोफखान्याने इंग्रजांवरच हल्ला चढवला. ४ जून रोजी कानपूरला हा उठाव झाला. ‘मारो फिरंगी को’ असे म्हणत सर्वांनी दिसेल त्या इंग्रज व्यक्तीला यमसदनी धाडले.

याचा परिणाम म्हणजे ३० जून ला १००० पैकी फक्त १२९ इंग्रज शिल्लक राहिले होते. त्यात ४ पुरुष व १२५ बायका-मुलांचा समावेश होता. पुढे नानासाहेब अयोध्येला जाऊन तिथूनच नेपाळच्या राजाची मदत मागण्यास गेले. परंतु तेथील राजाने इंग्रजांची साथ दिली.

या स्वातंत्र्यसंग्रामात फक्त पुरुष नाही तर महिलाही तितक्याच ताकदीने लढल्या. १८५३ साली गंगाधरराव नेवाळकर एकाएकी वारल्यानंतर इंग्रजांनी दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करुन झाशी संस्थान खालसा केले. राणी लक्ष्मीबाईंनी मुत्सद्देगिरीने इंग्रजांना गाफील ठेवले होते. वेळ येताच तिनेही नानासाहेबांसारखा इंग्रजांशी लढा उभारला “मी माझी झाशी देणार नाही” अशी घोषणा करुन तिने झाशी लढवत ठेवली. पुरुषवेश धारण करुन तिने झाशी सोडली व शेवटी लढतानाच ती विरगतीला प्राप्त झाली.

जगदीशपूरच्या कुंवरसिंहानेही इंग्रजांशी लढत दिली. ब्रिटिशांना चकवा देऊन गंगा पार करत असताना इंग्रजांकडून सुटलेली एक गोळी त्याच्या हाताला लागली. त्या गोळीकडे तुच्छतेने बघत त्याने आपल्या दुसऱ्या हातात तलवार घेऊन ‘हे मातर्’ म्हणत आपला हात गंगेला अर्पण केला. त्याने आपले संस्थान स्वतंत्र केले व त्याच रात्री तो परलोकी गेला. नानासाहेबांचा सेनापती वीर तात्या टोपेही इंग्रजांना कडवी झुंज देत होते. गनिमी काव्याचा सुयोग्य वापर करत त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन ठेवलं. अंतिमतः ते फितुरीने इंग्रजांच्या हातात सापडले. त्यांनाही फाशी देण्यात आली.

हा लढा वरकरणी जरी संस्थानिकांचा दिसत असला तरी यात सामान्य जनतेचे योगदान भरपूर आहे. महाराष्ट्रात जळगावजवळच असलेल्या अंबापाणी येथे भिल्लांनी उठाव केल्याने इंग्रजांना त्यांचा धाक बसला. खानदेशात भीमा नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना लुटला. पूर्ण हिंदुस्थान पेटून उठला तिथे राजा व रंक असा भेद तरी कसा करावा? मुजफ्फरनगरचा उठाव करणाऱ्या भगवती देवींना तर तोफेच्या तोंडी दिले गेले. १८५७ चा उठाव झाला, त्यानंतर भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन इंग्लंडच्या राणीकडे देण्यात आली. राणीने भारतीयांसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये वंश, जात, धर्म यानुसार भेदभाव केला जाणार नाही, गुणवत्ता लक्षात घेऊन नोकऱ्या दिल्या जातील अशी आश्वासने होती. असे कुठलेही युद्ध पुन्हा होऊ नये याची काळजी घेताना भारतीय शिक्षण पद्धतीमध्येही अमुलाग्र बदल केला गेला. भावी पिढ्या जन्माने हिंदू असल्या तरी मनाने गुलाम राहतील याची पुरेपूर काळजी लॉर्ड मेकॉले याने आखलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये घेण्यात आली. यातूनच पुढे इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले. ‘राष्ट्र ही कल्पना अस्तित्वात नव्हती’ , ‘संस्कृत ही मृतभाषा आहे’ अश्या अनेक कपोलकल्पित गोष्टी भारतीयांच्या मनात शिक्षणाच्या माध्यमातून ठसवल्या गेल्या.

तसेच १८५७ सालचा संग्राम हे स्वातंत्र्यासमर नसून शिपायांनी केलेले बंड आहे हे देखील भारतीयांच्या मनावर बिंबवण्यात आले परिणामी पुन्हा कोणी असा उठाव करणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेली. परंतु जनतेच्या मनात काही अंशी स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली होती. १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्याच्या यशाची बीजे १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात होती असे म्हणता येते.

१९५७ च्या स्वातंत्र्य समराला १६५ वर्षे लोटून गेली आहेत. भारतीय जनमानसांत आजही या संग्रामाची प्रतिमा बंड म्हणून आहे. त्यामुळे ते बंड नव्हते तर तो स्वातंत्र्यलढा होता हे ठामपणे सांगण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे.

आपला देश अनेकांनी रक्ताचे पाणी केल्याने मोठा झाला आहे, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्या सर्वस्वाची आहुती देणाऱ्या त्या ज्ञात अज्ञात वीरांना नमन!

सुमेध श्रीवर्धन बागाअीतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button