Opinion

कान्होजी आंग्रे… बस नाम काफी है !

मराठा आरमार उभारणारा, इंग्रजांकडून देखील कर वसूल करणारा मराठा शूरवीर…कान्होजी आंग्रे !

{गुगल आणि विकिपीडियावर सरखेल कान्होजी राजे आंग्रे (kanhoji aangre ) यांचा समुद्री चाचे (pirates)असा उल्लेख केल्याने नेटकरी भयंकर संतापले होते .याबाबत तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर विकिपीडियावर दुरुस्ती करण्यात आली आहे.गुगल आणि विकिपीडिया हे दैनंदिन माहिती मिळण्याचे स्त्रोत समजले जातात. जगभरातील माहिती गोळा करण्यासाठी या दोन माध्यमांची मदत घेतली जाते. मात्र गुगल वर कान्होजी आंग्रे हा शब्द सर्च केल्यानंतर तिथे कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख पायरेट्स अर्थात समुद्रीचाचे असा करण्यात आल्याचं रविवारी दिसून आलं यानंतर याच्या समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.}

शिवाजी महाराजांच्या सैन्यातील लोकांना इंग्रज सुद्धा घाबरत असत.असेच एक वीर पुरुष कान्होजी आंग्रे ज्यांनी १७ शतकात युरोपियन शक्तींचा प्रतिकार केला आणि मराठा साम्राज्याचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील वर्चस्व आणि सार्वभौमत्वाचे अधिकार यावर त्यांनी जोर दिला. आपलेसमुद्रावरील सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी फिरंगी गलबतांवर कर बसवला.कान्होजी आंग्रांच्या शिक्का मोर्तब असलेल्या नाहरकत पत्राशिवाय( NOC ) हिंदवी स्वराज्यात व्यापाराची परवानगीच नव्हती.मराठा नौसेनेचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते.त्यांचा वचक स्वतःला अजिंक्य समजणाऱ्या इंग्रज आणि पोर्तुगिजांना देखील होता. या दोन्ही सैन्यात प्रचंड सैन्य असूनसुद्धा कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्यच राहिले.

कोण होते कोन्होजी आंग्रे…

कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे या गावी झाला.मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे हे एक, पुणे जिल्ह्यातील कोळसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव, परंतु आंगरवाडी या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांना आंग्रे हे नाव प्राप्त झाले.कान्होजींच्या आधीच्या पिढ्या शिवाजी महाराजांच्या पदरी होत्या.

१६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणच्या किनारपट्टीवर विजय मिळवला तेव्हा सुवर्णदुर्ग किल्ल्याचा संरक्षक म्हणून कोन्होजीच्या वडिलांची नेमणूक शिवाजी महाराजांनी केली.कान्होजींचा जन्म याच किल्ल्यावर झाला आणि पुढे त्यांनी या समुद्रकिनाऱ्याचे संरक्षणही केले. १६८० मध्ये त्यांचे वडील तुकोजी आंग्रे यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी आंग्रे यांनी आपल्या वडिलांचे कार्य संपूर्ण ताकदीने पुढे चालू ठेवले.१७ व्या आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपियन उपनिवेशवादांच्या उद्रेक काळात,कोकण किनाऱ्यावर कोकण किनारपट्टीवर १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे यांना मराठा नौसेनेचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले.कान्होजींनी कोळी आणि मच्छीमार समुदायाशी मैत्री केली. ज्यांनी त्यांना समुद्राचे कौशल्य शिकवले. कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा यांची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही त्यांनी स्वपराक्रमाने स्वत:चा एक ठसा संबंध देशाच्या इतिहासात उमटविला. त्यांचा पराक्रम लक्षात घेऊन महाराजांनी त्यांना ‘सरखेल’ हा किताब प्रदान केला

शिवाजी महाराजांच्या देहावसाना नंतर १८ वर्षांनी आणि ताराबाईंच्या शासनकाळात कान्होजी यांच्याकडे केवळ १० जहाजे होती. त्यांनी त्या परिस्थितीत देखील आपली नौसेना विकसित केली. कोकणमधील जंगल आणि मच्छीमारांच्या कौशल्याचा वापर करून जहाजनिर्मिती केली.पोर्तुगीज, ब्रिटिश किंवा डच या देशांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध जिंकू शकले नसते, म्हणूनच निराश युरोपियन शक्तींनी बहुतेक वेळा त्यांचा उल्लेख समुद्री डाकू म्हणून केला. भारतीय शक्तींनी समुद्रावर युरोपियन प्रभुत्व रोखण्याची ही पहिलीच वेळ होती, परंतु युयोपियनांनी मराठ्यांच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते आणि त्यांना योग्य धडा शिकवण्याची गरज होती.

इ. स. १६९४ ते १७०४ च्या दरम्यान पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेले मराठ्यांचे सर्व किल्ले कान्होजींनी परत घेतले, शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख केले व त्यांनी ‘आपण कोकणकिनाऱ्याचे राजे’ अशी घोषणा केली.मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या-जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला.१७ व्या शतकाच्या अखेरीस अलिबाग या गावाची स्थापना केली, त्यांनी अलिबाग रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली.

शिवाजी महाराजांच्या प्रादेशिक रणनीतीचा कान्होजींवर प्रभाव होता. मानव – शस्त्रास्त्रे यांच्यावर हल्ले करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा स्रोत नसल्यामुळे, कान्होजींनी आपली लढाई जिंकण्यासाठी गनिमी रणनीती वापरली.४ नोव्हेंबर १७१२ रोजी कोन्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐलाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला.त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आली. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांमध्ये तह होऊन ३०,००० रुपये कराच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले.या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि कंटाळून ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.

२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुबंईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले.उलट कान्होजींनी १७१६ मध्ये इंग्रजांची तीन जहाजे पकडली.कान्होजींनी मुबंई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाचा कर वसूल केला.१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्ल्यावर तोफांचा मारा केला, पण हा हल्ला अयशस्वी ठरला. आणि इंग्रजांनी परत माघार घेतली.

१७२१ मध्ये पोर्तुगीज आरमाराने आणि इंग्रज आरमाराने मिळून ६००० सैनिकांसह आणि ४ मोठ्या जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली.एका आरमाराच्या विरुद्ध दोन आरमार एकत्र झाले.इतके शूर सैन्य होते कान्होजींचे.कधीही नेता जर खंबीर असेल तर सैन्यपण तितक्याच ताकदीने त्याला साथ देते. तर कान्होजींनी हा पण हल्ला परतवून लावला.अशा या कान्होजींना इंग्रज आणि पोर्तुगीज आरमार सुद्धा घाबरून होते. शेवटपर्यंत त्यांनी समुद्र संरक्षण करण्यात आपले आयुष्य खर्च केले.आपल्या अतुलनीय पराक्रमाने कान्होजींनी इतिहासाच्या पानावर अमिट ठसा उमटवला आहे.म्हणूनच त्यांना गौरवाने “समुद्रावरील शिवाजी” असे म्हटले जाते.

अश्या या झुंजार,लढवय्या हिंदू सरदाराला लुटारू संबोधण्याची हिम्मतच कशी होते ? पश्चिमी मानसिकता कायमच भारता विरोधात वागत आली आहे,पण त्यांनी हे डोस्क्यात घेतले पाहिजे की हा जागृत भारत अरे ला कारे म्हणणारा आहे.आत्ताच आपण आपल्यावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशांना अर्थव्यवस्थेत मागे टाकले आहे.आणि ही तर फक्त सुरवात आहे…

Back to top button