Health and WellnessLife Style

Did you know…रडण्याचेही होतात अनेक फायदे

आपल्याकडे एक म्हण आहे- ‘हसा आणि लठ्ठ व्हा’! म्हणजे हसण्याने आपले आरोग्य चांगले राहते.जसे हसण्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत, त्याचप्रमाणे रडण्याचेही अनेक फायदे आहेत. थोडेसे रडल्याने हृदय हलके होतेच पण आरोग्यालाही फायदा होतो. आपण दुःख व्यक्त करण्यासाठी रडतो. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे वाईट वाटते किंवा  कुणी आपल्याला वाईट वागणूक देते तेव्हा दुःखाने , उद्वेगाने आपल्याला रडू येते. पुरुषांनी रडू नये, असे आपल्याकडे सारखे बिंबवले जाते. रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुष दोघांनीही रडले पाहिजे, असे संशोधकांचे मत आहे.

रडल्यावर मन हलकं झालं असे आपल्याला अनेकदा जाणवते.रडणे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्हीसाठी फायदेशीर आहे. संशोधकांना त्यांच्या अभ्यासात अश्रूंचे फायदे देखील आढळले, ज्यामध्ये असे दिसून आले की बहुतेक लोकांचे मन रडल्यानंतर हलके आणि ताजेतवाने होते. प्राचीन ग्रीस आणि रोमच्या विचारवंत आणि वैद्यांचाही असा विश्वास होता की अश्रू एक रेचक म्हणून काम करतात, ते आंतर्बाह्य शुद्धता करतात. आजचे मानसशास्त्रही हेच मान्य करते.

सर्व अश्रू सारखे नसतात

भावनिक उत्तेजनांमुळे येणारे अश्रू, जीवाणूंच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी येणारे अश्रू आणि डोळ्यात प्रवेश करणाऱ्या बाहेरील वस्तूंवरची प्रतिक्रिया म्हणून आलेले अश्रू असे अश्रूंचे सामान्यतः तीन प्रकार असतात. शास्त्रज्ञांनी अश्रूंना असे तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले आहे. ते म्हणजे रिफ्लेक्स टीयर्स, कंटीन्यूअस टीयर्स आणि इमोशनल टीयर्स! रिफ्लेक्स टीयर्स आणि कंटीन्यूअस टीयर्स आपल्या डोळ्यांतील धूर आणि धूळ यांसारखी घाण काढून टाकण्यास मदत करण्यासाठी आणि संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. 

रडण्याचे हे फायदे आहेत 

  • डोळ्यातील अश्रूंमुळे बाहुली आणि पापण्यांना ओलावा येतो, त्यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत. डोळ्यांमध्ये पुरेसा ओलावा नसल्यास दिसणे कठीण होऊ शकते. मात्र, जास्त रडल्यानेही दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. डोळ्यांचा पडदा कोरडा झाल्यास दृष्टी कमजोर होते. अश्रू आपले डोळे कोरडे होऊ देत नाहीत, ज्यामुळे दृष्टी अबाधित राहते.
  • आपल्या अश्रूंमध्ये लाइसोझाइम नावाचे द्रव असते जे केवळ 5-10 मिनिटांत 90-95 टक्के जीवाणू नष्ट करू शकते.अनेक संशोधनांमध्ये असे मानले गेले आहे की जेव्हा आपण खूप दुःखी किंवा नैराश्याने ग्रस्त असतो तेव्हा शरीरात काही विषारी रसायने तयार होऊ लागतात. अश्रूंच्या मार्गाने हे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडतात. 
  • अश्रू हे बाह्य रसायनांपासूनही डोळ्यांचे संरक्षण करतात. त्यामुळे कांद्यामधून बाहेर पडणारे केमिकल किंवा धुळीच्या संपर्कात आल्यास डोळ्यांत अश्रू येतात, त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते.
  • अनेक वेळा शरीरात मॅंगनीजचे प्रमाण जास्त असल्याने अस्वस्थता, गोंधळ, थकवा, राग अशा समस्या उद्भवतात. रडण्यामुळे शरीरातील मॅंगनीजची पातळी कमी होते, ज्यामुळे तुम्हाला हलके आणि चांगले वाटते. रडणे हा स्वतःला वेदना आणि तणावमुक्त करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. रडण्याने मन हलके होते आणि मूड चांगला होतो. रडल्यानंतर तुम्ही स्वतःला अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त करू शकता. कारण या प्रक्रियेनंतर विचार थोडे स्पष्ट होतात. एकदा भावनांचा निचरा झाल्यावर तुम्ही तुमच्या समस्येचा काळजीपूर्वक विचार करू शकता आणि त्यावर उपाय शोधू शकता.
  • कधी-कधी शरीरातील ताण वाढतो आणि आपल्याला ते कळतही नाही. अनेक शारीरिक समस्या तणावाशी संबंधित आहेत. रडण्याने स्नायूंवरचा ताण कमी होतो. 
  • भावनिक कारणांमुळे आलेल्या अश्रूंमध्ये अल्ब्युमिन प्रोटीनचे प्रमाण 24 टक्के जास्त असते, ज्यामुळे मेटाबॉलिजमवर परिणाम होतो. तणाव सहन न होऊन रडल्याने मेंदू, हृदय आणि लिंबिक सिस्टीमचे कार्य सुरळीत होते, ज्यामुळे शरीराला विश्रांती मिळते.

रडल्यानंतर चांगली झोप येते. पण जर आपण जास्त रडलो किंवा तासनतास रडत राहिलो तर ते मानसिक विकार, चिंता, नैराश्याचे लक्षण असू शकते याची काळजी घेतली पाहिजे.त्यामुळे जास्त वेळ रडू नये. 

Back to top button