HinduismNews

सौगंध राम की खायी थी , हमने मंदिर वही बनाया है.. भाग ६

ayodhya ram mandir inauguration ramlala pran pratishtha part 6

(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)

महाराज मेहताब साहेब..

महाराज मेहताब साहेब हे भीटी संस्थानचे राजे होते.. आजच्या गोसावी गंजापासून अंदाजे १० किलोमीटर अंतरावर होते. राजेसाहेब आपला छोटासा लवाजमा घेऊन बद्रीनाथच्या यात्रेला निघाले होते. मुसलमान राममंदिर पाडणार अशी बातमी त्यांना वाटेतच समजली.त्यांनी मनात विचार केला, बद्रीविशालची प्रतिमूर्ती म्हणजे रामच. आता राममंदिराचे रक्षण म्हणजे बद्रीविशालचे दर्शन घेणे. त्यासाठी जीविताचा होम करण्यातच सार्थक आहे, असे म्हणून त्या नरश्रेष्ठाने आपल्या यात्रेची दिशा राममंदिराच्या बाजूला वळवली. दहा दिशांना हरकारे धाडले गेले. रामजन्मभूमीला पोहोचेपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली जवळ-जवळ ८०,००० सशस्त्र हिंदू सेना तयार होऊन उभी राहिली.

१७ दिवस घनघोर लढाई झाली. त्या वृद्धाच्या हाडात किती ताकद होती बघा. बड्या बड्या शूरांना त्याने दमवले. त्याच्याकडे पाहिल्यावर तो साक्षात रुद्रावतार भासत होता. आत्मार्पण करण्याची जणू चुरसच लागली होती. थोडेसेच हिंदू वाचले होते. त्यांच्या कलेवरांचा ढिगारा झाल्यावरच मीर बाकी तोफ लावू शकला आणि मगच ते रामजन्मभूमीवरील प्रसिद्ध मंदिर तो जमीनदोस्त करू शकला.

मीर बाकीचे सैन्य जवळ-जवळ १,७५,००० होते. त्यापैकी १,४०,००० सैन्य कापले गेले. रामजन्मभूमीच्या रक्षणार्थ मुसलमानांशी संघर्ष आणि विरोध हे हिंदूंच्या बाबतीत प्रत्याक्रमण होते. इतिहासकारांनी नोंद केली आहे की, सुमारे १ लक्ष ७१ हजार हिंदू वीरांनी बलिदान केले आणि मगच मीर बाकीला ते मंदिर उद्ध्वस्त करता आले. त्यासाठी त्याला तोफा डागाव्या लागल्या.दुर्दैवाने त्यावेळी हिंदुस्थानातील कानाकोपऱ्यातून साहाय्य मिळाले नाही. नाही तर त्याच वेळी मीर बाकीची चटणीच झाली असती. तसे कदाचित विधिलिखित नसावे. पण म्हणून काय झाले, बलिदानाची हीच ऊर्मी पुढेही राहिली.

देवीदीन पांडे..

मशीद उभी करण्यासाठी मीर बाकीने कडेकोट बंदोबस्त केला. पण त्याला आव्हान देण्यासाठी एक युवक देवीदीन पांडे पुढे आला. जोपर्यंत भारतवासी विजयश्री मिळवण्याची इच्छा धरून हिंदू जीवनमूल्ये आणि श्रद्धाबिंदूंसाठी आपले सर्वस्व अर्पण करत राहतील, तोपर्यन्त कोणाही शत्रूला हिंदू जीवनाची अमरवेल नष्ट करण्याचे साहस होणार नाही. जय-पराजय, वैभव-पराभव यांच्या नैसर्गिक परिवर्तनचक्रातही ती हिरवीगार राहील.

देवीदीनने हिंदू युवकांच्या हृदयात जी ज्वाला निर्माण केली, त्या ज्वालेत मीर बाकीची खूप सारी सेना भस्मसात झाली. १५ दिवसातच त्याच्या सूचनेवरून ७०,००० शस्त्रधारी युवकांची सेना उभी राहिली. दिल्लीहून मुसलमानांची नवी कुमक आली होती, म्हणून ३ जून १५२८ रोजी शाही सैन्यात आनंदीआनंद पसरला होता. त्याच वेळी देवीदीन पांडे अचानक प्रबळ वेगाने, कल्पनाही येऊ न देता मुसलमानी सैन्यावर आपल्या सैन्यासह गरुडाप्रमाणे तुटून पडला. ५ दिवस घनघोर युद्ध चालू होते. हे आक्रमण मीर बाकीच्या सैन्याला परतविता आले नाही.

‘दीन-दीन’, ‘खुदा रहम कर’ असे ओरडत मुस्लिम पळू लागले. मीर बाकीने सैन्याला रोखण्याची सर्व प्रकारे कोशीश केली, पुष्कळ समजावले. पण कशाचाच परिणाम झाला नाही. बलिदान करणारा जेव्हा बलिदान करायला निकराने सज्ज असतो, तेव्हा त्याला काहीही अशक्य राहत नाही. असीम साहस आणि शक्ती त्याच्या अंतरात उदय पावते. तो मानवाचा एकदम रुद्रावतार बनून जातो. देवीदीनमध्ये असेच शौर्य प्रकट होत होते. त्याने एका दिवसात फक्त तीन तासांत शाही फौजेचे ७०० सैनिक मारले. सहाव्या दिवशी तर तो रुद्राचाच अवतार वाटला. देवीदीन जिहादी मुसलमानांची मुंडकीच्या मुंडकी कापून फेकीत होता. त्याच्यातील घोड्याची चपळतादेखील पाहण्यासारखी होती. मुसलमानी सैन्याचा पायाच उखडला होता.

दुर्दैवाने मीर बाकीच्या अंगरक्षकाने फेकलेल्या विटेने देवीदीनचे डोके फुटले. खूप मोठी जखम झाली. रक्ताची धार वाहू लागली होती. तशा स्थितीत त्याने स्वतःच्या पगडीने ती मोठ्ठी जखम बांधून समोर असलेल्या मीर बाकीवर वाघासारखी उडी घेतली. अंगरक्षकाने हल्ला केला पण त्याचे शिर देवीदीनने धडापासून वेगळे केले. मीर बाकी आश्चर्यचकित होऊन डोळे विस्फारून या अद्वितीय महामानवाचे पेच पाहतच राहिला. त्याचे प्राण कंठाशी आले. पण प्रसंग पाहून तो भीतीने हत्तीच्या हौद्यात जाऊन लपून राहिला. देवीदीनला हे समजले.

मीर बाकीचा अंत अगदी जवळ आला होता, पण त्या मीर बाकीचे नशीब बलवत्तर होते. त्याच्या हातात भरलेली बंदूक होती. तीन वेळा छांय-धांय- धांय असा आवाज झाला आणि बंदुकीच्या गोळ्यांनी पांडेची छाती भेदून गेली. पांडेच्या हातून तलवारीचा घाव अगोदरच झाला होता, पण तो माहूत आणि हत्ती यांच्यावर पडला आणि माहूत तर पूर्ण कापला गेला आणि हत्तीची पूर्ण सोंडही कापली गेली. हे सर्व निमिषार्धात घडले. मीर बाकी गंभीर जखमा होऊन पडला होता, कसेबसे काही वाचलेल्या सैनिकांनी त्याला जिवंत परत नेले.

आणखी एक अभिमन्यू – देवीदीन पांडे कर्तव्याच्या वेदीवर हुतात्मा झाला. मुसलमानी सैन्याचे अगणित नुकसान झाले, त्यामुळे चार-पाच महिन्यांपर्यंत रामजन्मभूमीकडे फिरकण्याचे साहस त्यांना झाले नाही. नव्या साहाय्याची – कुमक – मिळण्याची ते वाट पाहत राहिले. ९ जून १५२८ ला दुपारी दोन वाजता पंडित देवीदीन पांडेने अखेरचा श्वास घेतला.

बिलहारी घाटावर पंडित देवीदीन पांडेच्या पुण्यस्मरणार्थ त्याच्या पहिल्या वार्षिक श्राद्धाच्या वेळी एक लोकगीत कवी संमेलन आयोजित केले होते. रामजन्मभूमी आणि पंडित देवीदीनचे शौर्य या विषयावर कवींनी अनेक रचना लोकांपुढे प्रस्तुत केल्या. कवी जसवंत याने देवीदीनच्या शौर्याचे वर्णन सत्तर छंदांमध्ये केले आहे, ते आपल्याला आजही उपलब्ध आहे. एकदा ते जरूर ऐका, वाचा..

क्रमशः

Back to top button