News

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शनिवारपासून पुन्हा सुरू होणार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची माहिती देणारा आगळा ‘लाईट अँड साऊंड शो’

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक निर्मित ‘स्वातंत्र्यवीर’ हा लाईट अँड साऊंड शो शनिवार दि. २६ मार्च २०२२ पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. विनामूल्य असणारा हा आगळा शो म्हणजे देशासाठीही मानबिंदू असून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये दिमाखदारपणे तो सुरू होत आहे. कोविड महामारीमुळे हा उपक्रम दीर्घकाळ बंद पडला होता. आता तो दादरच्या छत्रपती शिवाजी उद्यानासमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता दाखवण्यात येईल.
वॉलमॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित असणारा हा शो भारतातील पहिला आणि सर्वात मोठा व्यक्तिचित्रणात्मक शो आहे. या भव्य ‘लाईट अँड साऊंड शो’मुळे केवळ मुंबईचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान सन्मानाने उंचावणार आहे.

  • असा असेल ‘लाईट अँड साऊंड शो’

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात ६६ फूट X ९४ फूट इतक्या भव्य पार्श्वभूमी असणाऱ्या भिंतीवर हा कार्यक्रम दाखविला जाईल. यासाठीचा प्रोजेक्टर २७ फूट उंचीवरील एका मनोऱ्यात ठेवण्यात आला आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी तात्पुरती गॅलरी उभारण्यात आली असून एका वेळेला १५० प्रेक्षक हा कार्यक्रम बघू शकतील. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर राष्ट्राभिमानी, क्रांतिकारक, संवेदनशील कवी, लेखक, द्रष्टेपुरुष तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्तेही होते. त्यामुळे त्यांच्यावरील कलाकृती साकारताना कला आणि तंत्रज्ञानाचा संगम असणे अत्यावश्यक होते.

ज्याठिकाणी प्रत्यक्ष हा शो सादर होतो, तेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य पुतळा, त्याच्या दोन्ही बाजूला असलेली १८५७ च्या स्वातंत्र्य समरापासून स्वातंत्र्यापर्यंतच्या काल खंडावरील भित्तिशिल्पे पाहता येतील. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सर्वच क्रांतिकारकांना ज्या यमयातना भोगाव्या लागल्या त्याचे स्मरण करून देणारा कोलू, विविध प्रकारच्या बेड्याही पाहता येतील.

  • सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीला स्फूर्तीदायी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य हे तरुण पिढीला स्फूर्तीदायी असून ते तरुण पिढीपर्यंत अशा दिमाखदार आणि नेत्रदीपक स्वरूपात पोहोचविण्याचे काम या शो ने केले आहे. ‘स्वातंत्र्यवीर’ या लाईट अँड साऊंडची शो ची संकल्पना आणि दिग्दर्शन, ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या अप्रतिम चित्रपटाचे तरुण दिग्दर्शक ओम राऊत यांची आहे. तर स्मारकाच्या या अतिशय आगळ्यावेगळ्या, महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजितजी सावरकर आणि स्मारकाच्या कोषाध्यक्षा सौ. मंजिरीजी मराठे यांनी पेलली आहे.

हा भव्य लाईट अँड साऊंड शो म्हणजे सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचविणारी एक आधुनिक आणि नेत्रदीपक कलाकृती आहे. कमालीच्या देखण्या व्हिज्युअल आणि साऊंड इफेक्ट्समुळे प्रेक्षकांसाठी हा शो नेत्रदीपक पर्वणी ठरेल. या शोच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील काही घटना आणि वीर सावरकरांचा जीवनपट उलगडण्यास मदत होईल. नवीन पिढीला, आबालवृद्धांनाही भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच क्रांतिकारकांच्या योगदानाबद्दल माहिती मिळावी, प्रेरणा मिळावी, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने हा नेत्रदीपक उपक्रम साकारला आहे.

  • कधी, कुठे पाहता येणार ३डी मॅपिंग ध्वनी प्रकाश शो?

▪️स्थळ : स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक,
स्वा सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी
उद्यानासमोर, दादर, मुंबई.
▪️वेळ : रात्री ८.०० वा.
(दर शनिवार आणि रविवार)
▪️कालावधी : ४० मिनिटे
▪️प्रवेश : विनामूल्य

Back to top button