CultureSevaSpecial Day

गोपालकाल्यातून योगेश्वर श्रीकृष्णाने दिला समरसतेचा संदेश

रामायण आणि महाभारत हे दोन महाकाव्य म्हणजे भारतीय माणसाच्या जीवनाचा एक भागच म्हणायला हवा. प्रत्येकाच्या जीवनात कधीतरी या कथांचा शिरकाव होतो आणि त्यातील विविध पात्रांशी आपण जोडले जातो. राम, लक्ष्मण, हनुमान, बिभीषण, रावण, सीता, शबरी किंवा कृष्ण, भीष्म, पांडव, कौरव, कर्ण, द्रौपदी आणि अर्जुन बरेच… या सर्व पात्रांपैकी आज प्रस्तुत लेखात कृष्णाबाबत चर्चा करण्याचा किंवा मला कृष्ण कसा दिसला? हेच सांगण्याचा माझा मानस आहे. ‘कृष्ण’ हा शब्द ऐकताच किंवा वाचताच आपल्या डोळ्यांसमोर काही मालिका, ग्रंथ व चित्र येतातच. उदा. आपल्या आधीच्या दोन पिढ्यांतील लोकांना बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ आणि रामानंद सागर यांची ‘श्रीकृष्ण’ या मालिका आठवतील. महाविद्यालयीन तरुणांना नवीन ‘महाभारत’ व ‘राधाकृष्ण’ या मालिका आठवतील. अनेकांना काही बेस्ट सेलर कादंबर्‍या व पुस्तकांची आठवण येईल. या सर्व मालिका, पुस्तकं, व्याख्यानांनी कृष्णाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनवण्याचं कार्य केलं आहे.

पुराण ग्रंथांमध्ये ‘कृष्ण’ या शब्दाचे विविध अर्थ दिले आहेत. त्यापैकी मला सर्वात योग्य वाटलेला अर्थ म्हणजे ‘आकर्षक.’ सर्वांना स्वत:कडे आकर्षित करणारा असा आहे. कृष्णाचं व्यक्तिमत्त्व बघितल्यावर अनेकांना हा अर्थ पटेल. मला कृष्णाविषयी आवड निर्माण होण्याचं एक कारण म्हणजे कंसवधापूर्वीचा कृष्ण व कंसवधानंतरचा अर्थात महाभारतातील कृष्ण या दोन कृष्णांमध्ये जाणवणारा कमालीचा फरक. अशा दोन कृष्णांमध्ये खूप फरक असला, तरी हे दोन्ही कृष्ण अनेक चांगली जीवनमूल्ये आपल्याला शिकवून जातात.

कृष्ण चरित्र अभ्यासलं तर एक बाब जाणवेल. ती अशी की, जन्मापासून तर कंसवधापर्यंतचा कृष्ण हा पौराणिक व चमत्कारिक वाटतो. मात्र, महाभारतात दिसणारा कृष्ण हा अतिशय प्रगल्भ, वास्तविक व ऐतिहासिक वाटतो. कारण, कंसवधापर्यंत कृष्ण चरित्रात कृष्णाच्या बाललीला बघायला मिळतात. त्यात ‘धेनुकासुर वध’ म्हणजेच ताडवनातील एका मोठ्या गाढवाला कृष्ण व बलराम मारतात. पुढे ‘शकटासुर वध’ अर्थात कंसाने कृष्णाला गाड्याखाली चिरडून मारण्याची केलेली योजनाही असफल होताना दिसते. सत्तेसाठी आपल्याच लोकांना मारण्याची योजना करणारे अनेक कंस आपण कलियुगातही बघतो. त्यानंतर कृष्णावर विषप्रयोग करण्यासाठी कंसाने पाठवलेली एक स्त्री म्हणजेच पुतणावध हा प्रसंग होय. कृष्ण अजून मोठा झाला की, कालिया नागाचा प्रसंग आपण बघतो. त्यात एका विशाल नागाला वृंदावन परिसरातून बाहेर काढण्याचं कार्य कृष्ण करतो आणि सर्व ब्रजवासींना भयमुक्तही करतो.

अहंकारात अंध झालेल्यांची गत काय होते, हेच या प्रसंगातून कृष्ण आपल्याला सांगतो. पुढे गोवर्धन पूजेचा प्रसंग आहे; ज्यात इंद्र देवाची पूजा करण्याऐवजी ज्या गोवर्धन पर्वताच्या साहाय्याने आपण जगतो त्याचीच पूजा करायला म्हणजेच निसर्गातील घटकांची पूजा करायला कृष्ण सांगतो. नंतर भयंकर पाऊस आल्यावर गोवर्धन पर्वत कृष्णाने आपल्या बोटावर उचलल्याची कथा आहे. कृष्णाने पर्वत उचलला असेल वा नसेल, पण पर्वताच्या गुहांमध्ये किंवा पर्वतावरील झाडांचा आश्रय घेऊन लोकांनी पावसापासून स्वतःचं रक्षण केलं असावं, असं आपण मानू शकतो.

वृंदावनात आपल्याला बासरी वाजविणारा कृष्ण दिसतो, मित्रांसोबत गोपालकाला करणारा कृष्ण दिसतो, रोज काहीतरी नवीन करण्याची इच्छा असलेला कृष्ण दिसतो. म्हणून वृंदावनातील कृष्णाविषयी आपल्याला एक विलक्षण ओढ निर्माण होते. रोजच्या धकाधकीच्या आणि व्यस्ततेच्या जीवनात आपल्याला आपले छंद जोपासायलासुद्धा वेळ मिळत नाही. अशावेळी बासरी वाजविणारा कृष्ण आपल्यालाही विविध छंद जोपासण्याचं एक मैत्रिपूर्ण आवाहन करताना दिसतो. वृंदावनातील मुलांसोबत गोपालकाला करणारा कृष्ण आपल्याला निर्मळ मैत्री व सामाजिक समरसतेची जाणीव करून देतो. कृष्ण जीवनातील अजून एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे कृष्ण व त्याच्या सख्या. कृष्ण व गोपिका यांच्या संबंधाबाबत बोलणारे दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह सांगतो की, कृष्ण व गोपिका यांच्यात वयाचं खूप अंतर होतं. लहानसा कृष्ण त्यांना आपल्या मुलाप्रमाणे वाटायचा. एखादी आई जशी आपल्या लहान मुलाच्या खोड्या कौतुकाने व आनंदाने सहन करते. अशाप्रकारचं कृष्ण व गोपिकांचं नातं होतं. दुसरा मतप्रवाह सांगतो की, कृष्ण व गोपिका समवयस्क होत्या. त्यातील अतिशय महत्त्वाची गोपिका म्हणजे राधा होती.

खरं तर राधाचा उल्लेख कृष्ण चरित्रात, पुराणात आणि महाभारतात मिळत नाही. कवी-लेखक जयदेव यांनी लिहिलेल्या ‘गीत गोविंद’ या ग्रंथामध्ये राधा-कृष्णाच्या प्रेमकथांचा उल्लेख मिळतो. निर्मळ, निरपेक्ष प्रेम आणि भक्ती समजावून सांगण्यासाठी ‘राधा’ या काल्पनिक पात्राची निर्मिती केली असावी, असं मी मानतो. पुढे राधाचं लग्न दुसर्‍या व्यक्तीसोबत होऊन राधा-कृष्ण वेगळे होतात. कृष्णाला अतिशय प्रिय असलेली राधा दुसर्‍या व्यक्तीच्या घरात जाते. कृष्णही रुक्मिणीचा होतो. प्रेम, परिस्थिती, त्याग आणि कर्तव्य यांचा सन्मान करून समोर येईल ते जीवन जगणे, हा धडा राधा-कृष्ण आपल्याला शिकवून जातात.

आतापर्यंत आपण कंसवधापूर्वीचा कृष्ण बघितला. वृंदावनातून कृष्ण व बलराम मथुरेला जातात आणि कंसाचा वध करतात. त्यानंतर सांदीपनी ऋषींच्या आश्रमातून शिक्षित होऊन आल्यावर आपल्याला एक नवीन कृष्ण पाहायला मिळतो. युद्धकुशल, धर्मशास्त्राचा व राजकारणाचा पंडित, तत्त्वज्ञ आणि अनासक्त योगी स्वरूपाचा कृष्ण आपण महाभारतात बघतो. कंस, जरासंध, कालयवन, नरकासुर, शिशुपाल यांना नष्ट करणारा कृष्ण आपल्याला महाभारतात दिसतो. जरासंध आणि कालयवन यांच्या युद्धाच्या वेळी कृष्ण तर पळाला होता. मग कृष्ण युद्धकुशल आणि पराक्रमी कसा, असा प्रश्‍न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. पण शत्रूची शक्ती व कमजोरी ओळखून रणनीती आखणार्‍या योद्ध्यांचा नेहमी विजयच होतो, ही बाब आपण जाणली पाहिजे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे इतर हिंदू राजांपेक्षा जास्त यशस्वी होते, हा इतिहास आपण अभ्यासलेला आहे.

कौरव-पांडव युद्ध सुरू झाल्यावर जेव्हा पितामह भीष्म पांडव सेनेला उद्ध्वस्त करीत असतात आणि अर्जुन त्यांच्यावर वार करताना विचार करीत असतो. त्यावेळी कृष्ण ‘युद्धात शस्त्र न उचलण्याची’ स्वतःची प्रतिज्ञा तोडून भीष्मांवर धावून जातो, हा प्रसंग आपल्याला ठाऊक आहे. देशहित व धर्मरक्षणासाठी शत्रूला दिलेली वचनं तोडायलाच पाहिजे, हाच संदेश कृष्ण देतो. महाभारतात आपल्याला एकीकडे भीष्म दिसतात; जे स्वत:च्या अनेक प्रतिज्ञांमध्ये अडकून अनिच्छेने का होईना, पण अधर्माचा साथ देतात. दुसरीकडे कृष्ण आहे; जो स्वत: तर प्रतिज्ञा तोडतोच, पण इतरांनाही त्यांच्या प्रतिज्ञा तोडायला भाग पाडतो. ते फक्त आणि फक्त धर्मासाठी!

कंसवधानंतरचा कृष्ण मला अनासक्त योगी वाटतो. कंसाचा वध केल्यावर कृष्णाने उग्रसेनला सिंहासनावर बसविले आणि स्वत: राज्याचा सेवक म्हणून राहिला. जरासंध, नरकासुर, शिशुपाल यांचेही राज्य कृष्णाने घेतले नाही. कृष्णनीतीमुळेच पांडव युद्ध जिंकले तेव्हा कृष्ण हस्तिनापूर किंवा इंद्रप्रस्थ मागू शकला असता. पण कृष्णाने कोणतीही अपेक्षा न ठेवता धर्मराजाला सिंहासनावर बसविले. कृष्ण फक्त राज्यांच्या बाबतीत अनासक्त होता का? तर नाही. वृंदावनाप्रमाणे महाभारत काळातसुद्धा कृष्णाचा अनेक स्त्रियांशी संबंध आला. त्यात नरकासुराकडून सोडवून आणलेल्या १६,१०० स्त्रिया होत्या.

कैदेतून स्वतंत्र झाल्यावर फक्त त्यांच्या रक्षणासाठी कृष्णाने त्यांना स्वत:चं नाव दिलं. भारताच्या इतिहासात आपण वाचलं आहे की, अनेक समाजसुधारकांनी पीडितांसाठी व स्त्रियांसाठी कार्य केलं, त्यांना संरक्षण देण्यासाठी स्वत:च्या घरात ठेवलं. हेच कार्य महाभारत काळात कृष्णानेही केलं आहे. मात्र, पुरुष आणि स्त्री म्हटलं की, आपल्या डोक्यात भलतेच तारे तुटायला लागतात आणि एखाद्या संकुचित निष्कर्षापर्यंत आपण पोहोचतो. कृष्ण आणि द्रौपदीच्या नात्यालासुद्धा आपण काहीतरी विचित्र स्वरूप देऊन मोकळे झालो. खरं तर वडील, भाऊ, नवरा, मुलगा, सखा या सर्वांपेक्षा पुढे असलेलं अतीव विश्‍वासाचं नातं म्हणजे कृष्ण व द्रौपदीचं नातं होय. कृष्ण महाभारतात द्रौपदीच्या रक्षकाच्या भूमिकेत होता आणि जो रक्षक वडील, भाऊ, नवरा, मुलगा, सखा नसतो; तो फक्त मित्र असतो; ही बाब आपण विसरता कामा नये.

मानवाला कर्तव्यनिष्ठपणे जीवन जगता यावे यासाठी कृष्णाने महाभारतात गीता सांगितली. मात्र सध्या मानव धर्म, संस्कृती आणि राष्ट्राप्रती आपल्या कर्तव्यापासून दूर जाताना दिसतो. वर्षातील फक्त दोन-तीन दिवस भारतीय असणारे आपण अजूनही कृष्ण समजायला असमर्थच आहोत. आज कृष्ण नाही, पण त्याची गीता आहे. कारण आजही कर्तव्य विसरलेले आणि गोंधळलेले अनेक अर्जुन भारतात आहेत. आपण ‘रामायण व महाभारत सत्य आहे की मिथ्या आहे,’ यावर चर्चा करण्यात खूप वेळ घालवला. आपण शेक्सपियरने लिहिलेल्या नाटकांना आवडीने वाचतो, मॅकबेथमधील चेटकिणींवर विश्‍वास ठेवतो, जादुगरीची दुनिया दाखविणार्‍या हॅरी पॉटरच्या कादंबर्‍यांनाही वाचतो. मग प्राचीन भारतीय वाङ्‌मय वाचतानाच आम्ही मागे का राहतो? हेच कळत नाही. इतिहास म्हणून वाचा, धार्मिक साहित्य म्हणून वाचा किंवा बोधकथा म्हणून वाचा, पण रामायण-महाभारत आपल्याकडून वाचल्या गेलं पाहिजे. दैनंदिन जीवनात त्यातील प्रसंग उदाहरण म्हणून आपल्या बोलण्यात असले पाहिजे. कारण आज राम आणि कृष्ण समजतील तरच उद्या शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद घडतील. स्वरूप थोडं भिन्न राहील, पण घडतील नक्कीच!

Back to top button