News

महामार्ग मृत्युचे प्रशस्त मार्ग

महामार्ग,रस्ते हवेच आहेत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महामार्ग अत्यंत आवश्यक आहेत. Leave sooner, drive slower, live longer.हेच सदैव लक्षात ठेवले पाहिजे.

नियतीपुढे कुणाचेच काही चालत नाही आणि नियतीला कोणतीही गोष्ट शक्य वा अशक्य देखील नाही. हे जरी मान्य असले तरी देखील वाहन चालकांच्या चुकांमुळे एकाचवेळी अनेकांना प्राण गमवावे लागते हा देखील नियतीचा खेळ म्हणायचा काय ? माणूसच यमदूत होऊन माणसाला मरणाच्या दारात नेऊन उभा करीत आहे. महामार्गांवर दिवसेंदिवस होत असलेल्या भयावह अपघातामुळे मरण स्वस्त होत चालले आहे.

देशात मोठ्या प्रमाणात महामार्गाचे जाळे विणले जात आहे. रस्ते हे विकासाचे महामार्ग असल्याने रस्त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. परंतु याच महामार्गांवर पडलेले प्रचंड खड्डे आणि त्यांच्यावर दिवसागणिक होणारे अनेक जीवघेणे अपघात पाहता हे रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित राहिलेले नसून यावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ते मृत्युचे महामार्ग बनले आहेत. डहाणूजवळ झालेल्या भीषण अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे झालेले निधन अतिशय दुर्दैवी आहे. स्वकृतदर्शनी असे लक्षात आले की मागे बसलेल्यानी सीट बेल्ट लावलेला नव्हता.आणि घातक पद्धतीनं केलेले ओव्हरटेक अपघाताचे कारण ठरले.
पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेल्या अपघातात शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या दुर्दैवी झालेल्या मृत्युने महामार्गांची सुरक्षितता आणि महामार्गांवर होणारे अपघात पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

खरेतर रस्ते या विकासाच्या वाहिन्या आहेत. ज्या देशात वा राज्यात रस्ते जास्त त्या देशाचा वा राज्याचा विकास अधिक वेगाने होतो. त्यामुळे विकास आणि प्रगतीचा मार्ग हा या देशातील महामार्गामधून जातो असे म्हणतात. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जात आहेत. त्यामुळे बऱ्याच क्षेत्रात विकास होत आहे. हे जरी खरे असले तरी हेच रस्ते अपघाती मृत्यूंना कारणीभूत ठरत आहेत. दिवसागणिक अशा रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या आणि त्यामध्ये नाहक जाणाऱ्या निष्पाप प्रवाशांचा जीव ही चिंता वाढवणारी बाब आहे. हे रस्ते नको असे कोणीच म्हणणार नाही. महामार्गांवर होणारे बरेचसे अपघात हे मानवी चुकांमुळेच होत असल्याने ते रोखणे बऱ्याच अंशी शक्य आहे.

खड्डे मुक्त रस्ते तयार केले आणि प्रचंड वेगाने चालविणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणल्यास बरेचसे अपघात कमी होऊ शकतील. मुंबई-गोवा महामार्ग असो वा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे असो आज हे दोन्ही महामार्ग मृत्यूचे महामार्ग बनू पाहताहेत. नव्हे या महामार्गांची देशात तशी ओळख होत चालली आहे. ही बाब चिंतेची आहे. म्हणूनच प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राला निश्चितच भूषणावह नाही.

मुंबई-गोवा महामार्गाची बांधणी एका तपाहून अधिक काळापासून सुरू असली तरी अजून देखील या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. तरीदेखील या महामार्गाने केवळ दहा वर्षात साडेसहा हजाराहून अधिक झालेल्या अपघातातून तब्बल १५१२ निष्पाप जिवांचा बळी घेतला आहे. तर हजारो जणांना कायमचे अपंग करून ठेवले आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे हा महामार्ग प्रवासासाठी अतिशय असुरक्षित आणि धोकादायक बनला आहे. या महामार्गावरील प्रवास सुखदायक ठरण्यापेक्षा असंख्य प्रवाशांसाठी हा प्रवास वेदनादायी आणि संतापजनक ठरत आहे. अनेकांच्या जीवाशी खेळ करणारा आणि अनेकांना कायमचे अपंगत्व बहाल करणारा हा महामार्ग विकासाचा महामार्ग तरी कसा म्हणायचा? जनतेला कोणताच पर्याय नाही जो पर्याय आहे तो महाग आहे म्हणून नाईलाजास्तव रस्त्यांचा वापर करावा लागत आहे.

परंतु जीव धोक्यात घालून असा किती दिवस प्रवास करायचा ? रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहने हाकणे अवघड जात असल्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. आधीच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे त्यातच लवकर जाण्याची घाई अपघातास निमंत्रण देणारी ठरत आहे. दहा-बारा वर्षांचा काळ लोटल्यानंतर देखील या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना देखील दीड हजाराहून अधिक निष्पाप प्रवाशांचे या महामार्गाने बळी घेतल्याने अजून किती जणांचा बळी घेतल्यानंतर या महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे ? अशी विचारणा आता प्रवासी करत आहेत. रस्ते बांधणीचे काम जितक्या मोठ्या प्रमाणात हाती घ्यावयास हवे तितक्याच वेगाने ते काम पूर्ण करावयास हवे आणि ते रस्ते खड्डेमुक्त असावयास हवेत हे महत्त्वाचे आहे आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग देखील याला अपवाद नाही. या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. खरतर अपघात हीच या महामार्गाची ओळख बनली आहे. एकही असा दिवस जात नाही की त्या दिवशी राज्यात रस्ते अपघात झालेले नाहीत. आणि त्यामध्ये निष्पाप जीव गेलेले नाहीत. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघातांमुळे पुन्हा एकदा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे द्रुतगती महामार्गावरील अपघात आणि ते रोखण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न आदी मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१८ पासून आतापर्यंत ३३७ प्राणांतिक अपघातात चारशे जणांचा मृत्यू झाला असून २६५ गंभीर जखमी अपघातात ६२६ जण जखमी झाले आहेत. वाहनांसाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील घाट परिसरात प्रतितास ५० किलोमीटर तर अन्य ठिकाणी प्रति तास शंभर किलोमीटर वेग मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे.असे असले तरी या महामार्गावर निश्चित केलेल्या वेगमर्यादेचे पालन वाहनचालकांकडून होत नाही. परिणामी भरधाव वेगामुळे वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि निष्पाप प्रवासी मृत्यूच्या जाळ्यात ओढले जातात.

या उदाहरणातून अशा द्रुतगती महामार्गावर चालक नेमून दिलेल्या वेगापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवितात हे लक्षात येते. अशा बेदरकारपणे प्रचंड वेगाने गाड्या चालविल्या तर अपघात होणार नाहीत तर काय होणार? महामार्गावर गाडी चालविताना या महामार्गावर पोलिसांकडून आखून दिलेले नियम पाळणे हे नुसते सर्वांचेच कर्तव्य आहे असे नाही तर आपल्या स्वतःच्या सुरक्षित प्रवासासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. गाड्यांमधील यांत्रिक बिघाड यांपेक्षा मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, आखून दिलेल्या मार्गीकेची शिस्त न पाळणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, अपुरी झोप, कामाचा ताण ,लवकर पोहोचण्याच्या नादात सतत केले जाणारे ओव्हरटेक आणि गाड्यांमधील नादुरुस्ती या अशा विविध कारणांनी महामार्गांवर अपघात होत आहेत.

रस्त्यांची दुर्दशा, रस्त्यांवर काही ठिकाणी उभे केलेले अडथळे आणि नागमोडी वळणे या देखील बाबी अपघातास कारणीभूत ठरतआहेत. हे दुर्लक्षित करून चालणार नाही. खरंतर रस्ते अपघात ही जागतिक समस्या आहे.परंतु रस्ते अपघातात भारत वरच्या क्रमांकावर आहे. दरवर्षी देशात दोन ते अडीच लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. बहुतांशी अपघातामागील कारणांचा शोध घेतल्यानंतर ते अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्ते अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या या मानवी चुकांना पायबंद घालावयास हवा. अन्यथा रस्ते कितीही मोठे झाले तरी अपघात होत राहतील. त्यामध्ये निष्पाप जीव जातील आणि महामार्ग मृत्यूचे महामार्ग बनतील. तेव्हा याकडे सर्वांनीच गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. केवळ सरकारी उपाययोजनांनीच अपघात कमी होतील असे नाही, तर गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाने वेगावर आणि मनावर नियंत्रण ठेवल्यास अर्धे अधिक अपघात रोखता येतील.

Back to top button