Opinion

स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात बलिदान

इतिहासातून वगळले गेलेले क्रांतिकारक

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांच्या अमानुष सत्तेतून भारत मुक्त झाला. जगाच्या नकाशात भारत एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. आज ज्या स्वातंत्र्याचा आपण उपभोग घेत आहोत, ते स्वातंत्र्य झपाटलेल्या वीरांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला मिळाले आहे. आपल्या या वीरांनी स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली, घरदारावर, कुटुंबावर तुळशीपत्र ठेवले, अनेक हालअपेष्टा सहन केल्या. अनेकांना फाशीची शिक्षा भोगावी लागली, कित्येकांना तुरुंगवास भोगावा लागला. लाखो राष्ट्रभक्तांना युद्धाच्या या यज्ञ कुंडात प्राणांची आहुती द्यावी लागली. या सगळ्यांच्या बलिदानामुळे, योगदानामुळे भारत मोकळा श्वास घेऊ लागला. यूनियन जॅक खाली उतरला आणि तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकू लागला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व देशासाठी समर्पित करणाऱ्या अशा सर्व वीरांचे स्मरण तर आपल्याला करायला हवेच. पण यासोबतच असेही अनेक क्रांतिकारक होऊन गेले ज्यांच्याबद्दल आपल्याला कधी शिकवले गेले नाही, किंबहुना त्यांच्याबद्दल कोणी सांगितले देखील नाही. अशाच काही क्रांतिकारकांबद्दल आपण जाणून घेऊ.

बटुकेश्वर दत्त

भगतसिंग यांच्याबरोबर ‘असेम्ब्ली बॉम्ब केस’ मध्ये ज्यांचे नाव जगभर गाजले त्या बटुकेश्वर दत्त यांचा जन्म वर्ष १९०७ मध्ये कानपूरला झाला. बटुकेश्वर यांचे शिक्षण बंगाली शाळेत झाले. .पारतंत्र्यात ब्रिटीश सरकार कडून काळ्या पाण्याच्या शिक्षेवर अंदमानात धाडलेल्या या तरुण क्रांतीविराला स्वातंत्र्यात मायभूमीत झेलाव्या लागलेल्या मरणयातना अत्यंत वेदनादायक आहेत. कानपूर च्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंगांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले. याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना सुरु केला.

तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिले संसदेत मांडली होती. ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होते. याचा निषेध म्हणून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला.या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला.अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.

या सर्व घटनेत दोषी म्हणून भगतसिंह व बटुकेश्वर दत्त या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्याच वेळी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला म्हणून केलेल्या सॉंडर्स हत्येच्या लाहोर कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन भगतसिंह यांना फाशीची शिक्षा झाली तर बटुकेश्वर दत्त यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

खुदीराम बोस

खुदीराम बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९साली बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील हबीबपूर गावात झाला. बंगालची फाळणी झाल्यानंतर बोस यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सत्येन बोस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांचं क्रांतिकारी जीवन सुरू केले. नववीत असताना त्यांनी शाळा सोडली आणि पूर्ण वेळ देशासाठी दिला.

किंग्सफोर्ड चीफ प्रेसिडेंसी मॅजिस्ट्रेट हा क्रूर अधिकारी म्हणून ओळखला जात होता. फक्त क्रांतिकारकांना त्रास देणे हा त्याचा मूळ उद्देश होता. म्हणून क्रांतिकारकांनी त्यांची हत्या करण्याचा कट आखला. युगांतर क्रांतिकारी दलाचे नेते वीरेंद्र कुमार यांनी किंग्सफोर्डच्या हत्येची कामगिरी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चंद यांच्याकडे सोपवली.

किंग्सफोर्डला मारण्यासाठी बिहारला रवाना झालेल्या प्रफुल्ल चंद आणि खुदीराम बोस यांनी ३० एप्रिल १९०८ साली रात्री साडे आठच्या दरम्यान किंग्सफोर्डच्या बग्गीवर बॉम्ब हल्ला केला पण त्यांचा अंदाज चुकला आणि त्या हल्ल्यात किंग्सफर्डच्या पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला. या हल्ल्यात किग्सफोर्डचा मृत्यू झाला असे समजून दोघांनीही तिथून पळ काढला आणि पूसा रेल्वे स्थानकात पोहचले. रेल्वे स्थानकात पोहचल्यानंतर त्यांच्या हालचालीवरून पोलिसांना संशय आला आणि तिथेच त्यांना घेरण्यात आले. आता आपल्याला अटक होणार हे जाणताच प्रफुल्ल चंद यांनी स्वतःवर गोळी झाडली तर खुदीराम बोस यांना पोलिसांनी अटक केली. बोस यांच्यावर हत्येचा खटला दाखल करण्यात आला. केवळ पाच दिवस चाललेल्या या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनीही त्यांचा गुन्हा कबुल करत फाशीची शिक्षा स्वीकारली. ११ ऑगस्ट १९०८ साली त्यांना फासावर चढवण्यात आले.

शिववर्मा

हरयाणामधील खेटली गावात शिववर्मा यांचा १९०५ साली जन्म झाला. हिंदू संस्कृतीचा आणि हिंदू परंपरेचा अभिमान असलेल्या शिववर्मा यांना १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले, तेव्हा त्यांना त्याचा भयंकर संताप आला होता. प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते हरदोईला सरकारी प्रशाळेत दाखल झाले. पुढे ‘बालहीतकारिणी’ या सभेचे सभासद झाले. भावी आयुष्यात त्यांनी या सभेचे कार्यवाह म्हणून काम पाहिले. या ग्रंथालयात लाहोर मधून प्रसिद्ध होणारे ‘वंदेमातरम’ पत्र आणि कानपूरहूनही प्रसिद्ध होणारे ‘प्रताप’ नावाचे पत्र ते वाचत. या पत्रांनी देशकार्याची प्रेरणा दिली.

वर्ष १९२१ मध्ये त्यांनी शाळा सोडली आणि असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यावेळी त्यांना अटकही झाली. या आंदोलनाचा बोजवारा वाजला. त्यावेळी ज्या आंदोलनकर्त्यांची वाताहत झाली. त्यांच्यासाठी शिववर्मा यांनी पैसे आणि धान्य जमा करून त्यांना मदत केली. आता असहकारामुळे देश स्वतंत्र होणार नाही, याची खात्री पटली . पुढे गयाप्रसाद ब्रह्मचारी यांच्याकडून त्यांना सशस्त्र क्रांतीचे महत्व कळले. सशस्त्र क्रांतिकारकांना सुशिक्षित तरुण हवे आहेत, असे गयाप्रसाद यांनी सांगितले. त्याचा योग्य तो परिणाम होऊन पुन्हा ज्ञान संपादनासाठी ते शाळेत जाऊ लागले. वर्ष १९२५ मध्ये शिववर्मा डी. ए. व्ही. महाविद्यालयाच्या वसतिगृहात ‘सायन्स ब्लॉक’ मधल्या एका खोलीत राहत.

सदाशिवराव मलकापूरकर

सदाशिवराव यांचा जन्म वर्ष १९०८ मध्ये झाला. ते झाशी येथे राहात होते. शालेय जीवनातच त्यांच्या हातात वीर सावरकरांची ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक पडले. तर भगवानदास यांनी भाई परमानंद यांची ‘काराकथा’ वाचली. दोघांनाही देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्रक्रांतीचा मार्गच योग्य वाटला. त्यांची मने या ग्रंथांनी चेतवली गेली. एवढेच नव्हे तर त्यांच्याप्रमाणे शारीरिक कष्ट, हालअपेष्टा आणि कोणतेही अग्नीदिव्य आपल्या मातृभूमीसाठी करण्यासाठी त्यांनी मानसिक सिद्धताही केली.
अशाप्रकारे वीर सावरकरांचे सशस्त्रक्रांतीचे संस्कार पुढच्या पिढीत संक्रमित होत होते. ‘अभिनव भारता’ प्रमाणे वेगवेगळ्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघटना स्थापन होत होत्या. विद्यार्थीदशेतच राष्ट्रभक्तीचे, त्यागाचे, समर्पणाचे आणि हौतात्म्याची ओढ निर्माण करणारे संस्कार होत होते. देशस्वातंत्र्याचे परमोच्च ध्येय त्यावेळच्या तरुणांसमोर, विद्यार्थ्यांसमोर होते.

गजानन सदाशिव पोतदार

गजानन यांचा जन्म १९१० मध्ये झाला. कोकणातल्या या पोतदारांचे मूळचे नाव ओरपे. पुढे दिल्लीमधल्या करोल बागेत ते स्थायिक झाले. गजानन रावांच्या वडिलांची १९२७ मध्ये झाशीला बदली झाली. त्यामुळे गजानरावांचे शिक्षण आता तिथल्या इंटरमिजिएट कॉलेजमध्ये सुरु झाले. तिथेच त्यांची विश्वनाथ वैशंपायन यांच्याशी मैत्री झाली. गजाननराव ‘सुबालसमाज’ या संस्थेत जाऊ लागले. तिथे त्यांचा परिचय सदाशिवराव मलकापूरकर यांच्याशी आणि भगवानदास माहौरांशी झाला.
त्याकाळात झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित ‘रणरागिणी’ नावाचे नाटक प्रदर्शित केले जात होते. सरकारने या नाटकावर बंदी घातली होती. तरीसुद्धा या तरुणांनी गणेशोत्सवात हे नाटक सादर केले. नाटकातून स्वातंत्र्याचा ध्येयवाद लोकांसमोर मांडला जात होता. त्याचा परिणाम गजाननराव पोतदारांच्या संवेदनशील मनावर झाला आणि देशकार्यासाठी ते प्रभावित झाले.

श्रीराम सावरगावकर

सावरगावकरांचे घराणे मूळचे परभणी जिल्ह्यातल्या सावरगावचे. लाठीकाठी, बोथाटी, पट्टा, मल्लखांब अशा विद्येत पारंगत असलेल्या श्रीरामांनी वेदशास्त्राचाही अभ्यास केला. नीतिशास्त्रप्रवेश, निबंधमाला, गीतारहस्य, संत वाडगमयावरील ग्रंथांचाही त्यांनी अभ्यास केला होता. पुण्यात शिक्षण घेत असताना वीर सावरकरांनी लिहिलेला ‘जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र आणि राजकारण’ ग्रंथ त्यांच्या वाचनात आला. या ग्रंथातली सावरकरांनी लिहिलेली २६ पृष्ठांची प्रस्तावना त्यांनी तोंडपाठ केली. या ग्रंथावर ‘काळ’ आणि ‘केसरी’ या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले लेखही त्यांनी वाचले. याचा परिणाम त्यांच्या मनावर आणि बुद्धीवर झाला. राष्ट्रासाठी काम करण्याची आणि कष्ट सहन करण्याची प्रेरणा त्यांना याच ग्रंथांनी नि वृत्तपत्रांनी दिली. आपली देशभक्ती आणि आपली राष्ट्रनिष्ठा सोळा आणे आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर खादी कपडेच वापरले.

विश्वनाथ गंगाधर वैशंपायन

विश्वनाथ वैशंपायन यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९१० रोजी बांद्याला झाला. वर्ष १९२१ मध्ये असहकार आंदोलन सुरु झाले . त्याचा मनावर खोलवर परिणाम झालेल्या विश्वनाथने कोवळ्या वयात खादीच वापरणार अशी शपथ घेतली. ते सभांमध्ये आणि मिरवणुकीत सहभाग घेऊ लागले. सरस्वती विद्यालयात त्यांची ज्ञानसाधना सुरु झाली, तीच राष्ट्रीय पाठशाळा झाली. असहकार आंदोलनाचा बहर ओसरला. त्यांची राष्ट्रीय कार्यात सहभाग घेण्याची तळमळ मात्र तीळमात्रही कमी झाली नाही. त्यांच्या वडिलांनी झाशीच्या इंटरमिजिएट कॉलेजमध्ये त्यांचे नाव घातले. तिथे ते सहाव्या इयत्तेत शिकू लागले.

मास्तर रुद्रनारायण नावाचे एक शिक्षक होते. ते चित्रकलेचे शिक्षक असले तरी मूर्तिकार होते. डबलबार, कुस्ती, मल्लखांब या खेळात ते पटाईत होते. या सर्व कला विश्वनाथने त्यांच्याकडून आत्मसात केल्या. पुढे विश्वनाथ आर्यसमाज मंदिराच्या व्यायामशाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना या कला शिकवू लागले.
झाशीला असतानाच विश्वनाथचा परिचय सचींद्र बक्षी यांच्याशी झाला. सदाशिवराव मलकापूरकर यांच्याशीही परिचय तो सुबालसमाज या संस्थेत.अशाप्रकारे विश्वनाथ गंगाधर वैशंपायन देशभक्त क्रांतिकारकांच्या समूहात सहभागी झाले.

भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला विस्मरण झाले आहे. किंबहुना सशस्त्र क्रांती करू केलेल्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र क्रांती केलेल्या तरुणांच्या यादीत आपण एकवेळ भगतसिंह व त्यांच्या सोबत राजगुरू,सुखदेव यांची वर्षातून एकदा मार्च महिन्यात आठवण काढतो. पण असे कित्येक क्रांतिकारक होऊन गेले ज्यांच्यावर इतिहासात एक पानभर माहिती सुद्धा आपण वाचली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही. हे जाणूनच यासाठी झालेल्या प्रयत्नांचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यामार्गांचे ध्येय एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अशाच अनेक वीरांचे स्मरण करणे आवश्यक आहे. आपल्या प्रत्येक पिढ्यान पिढ्यांना या क्रांतिकारकांचे स्मरण होणे आवश्यक आहे.

**

Back to top button