News

आकाशाशी जडले नाते… नवी मुंबई मधील अनोखा दीपोत्सव.

दिवाळी म्हणजे जणू नभातील आकाशगंगा पृथ्वीवर दिव्यांच्या आरासीने अवतरते.

दिव्यांची आरास करताना मानवी कल्पनाशक्तीला अंत नसतो.

आता नव्या मुंबईतील Diya For Unity Forum चीच कल्पनाशक्ती बघा ना.

गेल्या वर्षी सन २०२१ साली लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने प्रभु रामचंद्राचे अयोध्या मंदिर ४५० कुटुंबांच्या सहकार्याने १५,००० दिव्यांनी साकारण्यात आले होते. आज अयोध्येतील प्रभू रामचंद्रांचे मंदिर हा जगातील प्रत्येक हिंदूच्या श्रद्धेचा विषय झालेला आहे. आजमितीस या मंदिराचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून इसवी सन २०२४ च्या सुरुवातीला हे मंदिर समस्त भाविकांसाठी खुले होईल. मात्र त्याच्या आधीच दोन अडीच वर्षे ऐन दिवाळीत Diya For Unity फोरमने प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानावरील मंदिराचे दिव्यरूप, चुकलो “दिवारूप” दर्शन भाविकांना घडवले.

“एक दिवा एकतेचा” हि टॅग लाईन घेऊन फोरमने अशा प्रकारचा दिपोत्सव दर वर्षी वेगवेगळया पद्धतीची थीम घेऊन साजरा करण्याचे निश्चित केले आहे.

२०२२-२३ हे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या ७५ वर्षातली किमान ६ दशके आम्ही आमचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक उज्वल वारसा विसरलेलो होतो. आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य हे आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन करून मिळाले होते. ज्या सिंधू नदीवरून आम्हाला हिंदू हे विशेषण प्राप्त झाले आणि ज्या नदीच्या किनाऱ्यावर आमची संस्कृती फुलत बहरत गेली ती सिंधू नदी भारतात राहिली नाही. ज्या लाहोरच्या कोट लखपतराय तुरुंगात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले ते लाहोरही आमच्याकडे उरले नाही. त्याकाळी जुळी मुंबई म्हणून ओळखले गेलेले कराची शहर आमचे राहिले नाही. शक्ती पिठातील एक, बलुचिस्तानातील हिंगलाज माता हे शक्तिपीठ देखील आमच्या हातातून निसटले. ढाक्याच्या ढाकेश्वरी मातेचे दर्शन घेण्यासाठी आम्हाला तत्कालीन पाकिस्तान सरकारकडून व्हिसा घ्यावा लागायचा. मात्र गेली ७५ वर्षे आम्ही आमच्या प्राणप्रिय मातृभूमीला पुन्हा अखंड करण्याचे अर्थात “अखंड भारता”चा निर्धार एक क्षणभर विसरलो नाही.

आणि हेच औचित्य साधून, या वर्षी फोरमने “अखंड भारता”चे मानचित्र ७५,००० दिव्यांनी १,००० कुटुंबांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ( सोमवार, दि.२४ ऑक्टोबर रोजी) खारघरच्या सेक्टर १९ मधील रामशेठ ठाकुर शाळेच्या मैदानात साकारले.

या दीपोत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक कुटुंबांने दिवे, तेल व वाती DIYA FOR UNITY फोरम कडे जमा केल्यामुळे फोरमला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागला नाही.

या दिपोत्सवात जवळ जवळ १५०० उत्सव प्रिय नागरिक उपस्थित राहिले होते. या सगळ्यांनी “अखंड भारता”चा दिपोत्सव आनंदात साजरा केला. या दिपोत्सवाचे उद्घाटन स्थानिक आमदार श्री प्रशांत ठाकुर यांनी केले. आमदार प्रशांत ठाकूर हे रात्री ८:३० ते १० पर्यंत स्वतः दिप प्रज्वलित करीत होते आणि इतरांनाही दिप प्रज्वलन करण्यासाठी प्रेरित करत होते.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या कार्यक्रमात ७५ अपरिचित क्रांतिकारकांचा थोडक्यात परिचय देणारे प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी “तेथे कर माझे जुळती” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देशातील, प्रत्येक प्रांताच्या समाजातल्या प्रत्येक घटकाने अतुलनीय असा त्याग केलेला आहे, अशी साक्षच या प्रदर्शनाने पटवून दिली.

स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवापर्यंत “अखंड भारता”चे स्वप्न पूर्ण झालेले असेल.

मात्र विना खर्च, संपूर्ण समाज जोडणारा व युवकांना प्रेरणा देणारा भारतीय विचार आणि स्वप्नपूर्तीच्या आधी २५ वर्षे “अखंड भारता”चे दर्शन घडवणारा या वर्षीचा दिपोत्सव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

या “हटके” दीपोत्सवाचे अर्थात Diya For Unity फोरमचे संयोजक श्री. आदित्य विठ्ठल कांबळे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

Back to top button