IslamNews

प्रेक्षकांना अंतर्बाह्य “घायाळ” करणारा नाट्यानुभव…

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या “१५ अगस्त का दिन कहता आजादी अभी अधूरी है” या हिंदुस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या कवितेत एक कडवे आहे…

“कोलकाता के फुटपाथों पर जो आंधी पानी सहते हैं
उनसे पूछो आजादी के बारे में क्या कहते हैं”…

हिंदुस्तानची फाळणी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर साधारणतः फक्त सिंध आणि पंजाबच्या विभाजनाची शोकांतिका येते… अज्ञानामुळे म्हणा किंवा आम्हाला तो इतिहास फारसा शिकवला गेला नसल्यामुळे म्हणा… फाळणीच्या वेळेची बंगालची शोकांतिका कधीच खोलपर्यंत जाणवत नाही…

त्यामुळे “कोलकाता के फुटपाथों पर” या अटलजींच्या शब्दामागील वेदना चटकन लक्षात येत नाहीत…

बंगालच्या विभाजनाच्या नेमक्या त्याच वेदना नाट्यरूपाने मांडण्याचा एक अप्रतिम प्रयत्न “काव्यशैली क्रिएशन”, मुंबईने आपल्या दोन अंकी “घायाळ” या सादरीकरणात केला आहे…

भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर उर्फ पु.भा. भावे यांनी नौखालीच्या हिंदूवरील अत्याचारांच्या बातम्या येऊ लागल्यावर पत्रकार म्हणून तेथे धाव घेतली. मुळातच सावरकर भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ असलेल्या ऐन पस्तीशीतल्या भाषाप्रभू भाव्यांच्या लेखणीला त्या स्वानुभवानंतर विलक्षण धार चढली होती. त्यातून आकराला आलेल्या चार मुठी तांदूळ, प्रायश्चित्त, दोन तास दहा मिनिटे, हिमानी, साडी या सत्य घटनांवर आधारित बंगालमधल्या हिंदूंची विदारक स्थिती मांडणाऱ्या लघुकथा. या कथांच्या “घायाळ” कथा संग्रहाचे नाट्यरूपांतर शैलेश चव्हाण व कविता विभावरी यांनी अत्यंत ताकदीने केले आहे.

१० ऑक्टोबर १९४६, म्हणजे फाळणीपूर्वी साधारणतः वर्षभर आधी, बंगालच्या नौखाली जिल्ह्यात मुस्लिम धर्मांधानी अक्षरशः नंगानाच घातला होता. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी १६ ऑगस्ट १९४६ ला मुसलमानांच्या स्वतंत्र देशासाठी दिलेल्या “डायरेक्ट ॲक्शन”च्या अग्नितांडवाची राख अजून पुरती विझली नव्हती… मागोमाग नौखालीतील हजारो हिंदू कुटुंबांची धर्मांध मुस्लिमांनी राखरांगोळी करून टाकली…

ज्या लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेली बंगालची फाळणी संपूर्ण बंगाली जनतेने ब्रिटिश सरकारला रद्द करायला लावली…त्याच बंगालचे त्यानंतर केवळ ४ दशकातच धर्माच्या आधारावर विभाजन व्हावे हा केवढा दैवीदुर्विलास…

या नाट्यानुभावात सुरुवातीलाच आजच्या मोबाइल युगातील, फाळणीच्या वेळी झालेले लक्षावधी हिंदूंचे हत्याकांड आणि हिंदू महिलांवरील अनन्वित बलात्कार याविषयी अनभिज्ञ असलेली एक शिकाऊ पत्रकार तरुणी आणि नौखालीच्या अत्याचारांच्या वेदना भोगलेल्या, शरीराने जिवंत असून मनाने मेलेल्या; तीन बंगाली वयस्कर माता यांच्यातील संवाद आपल्याला ७५ वर्षांपूर्वी घडलेल्या त्या भयानक नृशंस अत्याचारांशी सहजतेने जोडतो….

आपल्यासमोर नौखालीच्या हिंदू विटंबनेची गोष्ट सांगणाऱ्या तीनही वृद्धांकडून काळीज चिरणारे सत्य समजल्यावर पत्रकार तरुणी अक्षरशः कोलमडून पडते… आणि तिच्याबरोबर समोर बसलेला प्रेक्षक देखील…

राधा राणी असो की सोमनाथ, शेफलीका असो की हिमानी, त्यांच्यावर झालेले अत्याचार दीर्घकाळ मनाला रुखरुख लावून जातात…

त्याचवेळी इतके अनन्वित अत्याचार होऊनही बंगाली हिंदू शांत कसा राहिला याचे आश्चर्यही वाटते आणि कोडेही पडते…

आणि त्याचबरोबर अटलजींच्या त्या “कोलकाता के फूटपाथों पर” या काव्यपंक्ती मागील वेदनादेखील समजू लागतात…

सदर “घायाळ” नाट्यानुभवाचा पहिला प्रयोग १६ ऑगस्ट २०२२ रोजी काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सादर करण्यात आला…

हा नाट्यानुभव मराठी भाषेत लिहिलेला असला तरीही पात्रांची बंगाली वेशभूषा आणि नेपथ्य आपल्याला ७ दशकांपूर्वीच्या नौखालीला घेऊन जाते… अप्रतिम ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजनेमुळे संवादांचा प्रभाव कितीतरी पटीने अधिक पडतो…

प्रेक्षकांना अंतर्बाह्य “घायाळ” करून अंतर्मुख करायला लावणारा हा नाट्यानुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावाच…

मुळात भाव्यांच्या घायाळचे नाट्यरूपांतर करणे ही जोखीमपूर्ण लोकविलक्षण कल्पना सुचल्याबद्दल “काव्यशैली क्रिएशन्स” च्या निर्मात्यांचे त्रिवार अभिनंदन…

घायाळ” नाट्यानुभावाचे चे लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, ध्वनी व प्रकाश योजना करणारा संच व सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

आज पुभा असते तर तुमच्या सगळ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन म्हणाले असते… “भले बहाद्दर पोरांनो… घायाळचा अनुवाद बंगाली, हिंदी आणि सगळ्या प्रादेशिक भाषेत करून… पेटवा हा वणवा…”

Back to top button