Opinion

शतायुषी शिवऋषि

चंडिके दे अंबिके दे शारदे वरदान दे
रक्त दे मज स्वेद दे तुज अर्घ्य देण्या अश्रू दे।।

असे मागणे मागणारा हा शतायुषी शिवऋषि.
परवा निधनाची अफवा आली आणि ती खोटी ठरल्याचे कळल्यावर वाटले ..आयुष्य वाढले. शंभराव्या वर्षात प्रवेश केला आहेच आता नक्की ते पूर्ण करणार. पण तसे होणे नव्हते.

ज्या मुहूर्तावर रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची मंगल वाद्ये वाजली, राजे सिंहासनारूढ झाले, त्याच मुहूर्तावर काल या शिवशाहिरानी ह्या भूमी वरून प्रयाण केले. महानिर्वाणच ते.

त्यांनीच म्हटले होते की एखाद्या कामाचे वेड लागल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही आणि त्यांना तर झपाटलेले होते शिवचरित्राने. गेली कमीत कमी 70 वर्षे प्रत्येक श्वास एकाच ध्यासाने घेतलेला होता आणि तो ध्यास म्हणजे शिवाजी महाराजांचे चरित्र आणि गुणगौरव जनसामान्यांपर्यंत पोचवणे.

संशोधन हे केवळ अभ्यासकांच्यासाठी न राहता सर्वांना रुचेल, पचेल अशा सोप्या भाषेत सांगितले गेले तरच त्याची गोडी लोकांना लागेल हे लक्षात घेऊन त्यांनी शिवचरित्र अगदी सोप्या रसाळ भाषेत सांगायला सुरुवात केली, लिहीत राहिले आणि अनेक पिढ्या त्यांनी शिवचरित्राच्या वेडाने झपाटून टाकल्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या विचारांनी, वक्तृत्वाने ते भारून गेले होते. नाना पालकर ह्यांनी आपल्याला कशासाठी बोलायचे हे दाखवले, असे ते सांगत. माझ्या आयुष्यातून शिवचरित्र वजा केले तर बाकी काहीच राहत नाही अशीच त्यांची भावना होती.

माझ्याच काय पण माझ्या आधीच्या आणि नंतरच्याही कित्येक पिढ्यांना शिवचरित्र आठवते ते ब. मो. अर्थात बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी लिहिलेले. शिवाजी महाराजांचा गुणगौरव करताना ‘जाणता राजा’ हा शब्द रामदास स्वामींनी जेवढ्या विचारपूर्वक उपयोगात आणला, तेवढाच बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील.

‘जाणता राजा’ हा प्रयोग केवळ अद्भुत असाच होता. भव्य, नेत्रदीपक, कुठेही तडजोड नाही. शिवाजी महाराजांचे चरित्र तितक्याच उत्तम रीतीने साकार झाले पाहिजे ह्या भावनेने त्यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि यशस्वीपणे पेलले देखील.

आयुष्यभरात त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. आदर सत्कार झाले, पुरस्कार मिळाले आणि त्याच वेळी त्यांच्यावर अत्यंत विखारी टीका देखील झाली. गलिच्छ आरोप केले गेले. त्यांच्या पुरस्कारांच्या निमित्ताने तर आरोपांचे वादळ उठवण्याचा प्रयत्न झाला.

पण बाबासाहेब या सगळ्यांपासून अलिप्त होते. शिवचरित्र जनमानसावर ठसवण्यासाठी, त्यांचे गुण सर्वांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा म्हणून भव्य स्वप्ने पाहत होते. योजना आखत होते आणि योजना प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेत होते. शिवसृष्टीचे काम चालूच होते.

बाबासाहेबांच्या कामाचे महत्त्व महाराष्ट्रातील जनतेने जाणले होते. सर्वांच्या मनातले ह्या उत्तम लेखक, इतिहास अभ्यासक, प्रभावी वक्ता असलेल्या शिव शाहिराचे स्थान कधीच ढळले नाही. हे अमोघ व्यक्तित्व म्हणजे आपला भाग्य योग आहे अशीच भावना प्रत्येकाची होती आणि आहे.

बाबासाहेब पुरंदरे देह रूपाने आपल्यात नसले तरी चेतना रूपाने कायम राहतील. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे, कोणत्याही विखारी टीकेला, अप प्रचाराला बळी न पडता,आपला खरा इतिहास जाणून घेणे, शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करणे, त्यांचे लोकोत्तर गुण अनुसरणे हीच बाबासाहेबाना खरी श्रद्धांजली ठरेल.

  • वृंदा टिळक.
Back to top button