NewsOpinion

चला.. संविधान साक्षर होउ या!! – भाग ३

संविधानाची निर्मिती कशी झाली?

भारतीय संविधान हे जगातील कोणत्याही स्वतंत्र राष्ट्राचे सर्वाधिक विस्तृत संविधान आहे.किती मोठे आहे? तर त्यात १,४६,३८५ शब्द आहेत.राज्यघटना तयार व्हायला किती वेळ लागला? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला थोडे भूतकाळात जावे लागेल. भारत ब्रिटिश अंमलाखाली होता तेव्हाची ही गोष्ट.

१८५७च्या स्वातंत्र्यसमराने संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतील जनतेत आपण सगळे एक आहोत ही भावना जागृत केली. अन्यायी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढून आपल्याला देश स्वतंत्र करायचा आहे असा विचार लोकांच्या मनात जागवला.
जोपर्यंत ब्रिटिश सत्ता जगभरात सामर्थ्यशाली होती तोपर्यंत भारताविषयी विचार करण्याची त्यांना फारशी गरज वाटली नव्हती. पण दुसऱ्या महायुध्दाच्या वेळे पासून ब्रिटनची परिस्थिती बदलू लागली. भारतीय जनता देखील जागृत होऊ लागली होती. १९४५ मध्ये ब्रिटनमध्ये मजूरपक्षाचे सरकार निवडून आले आणि भारतविषयक हालचालींना वेग आला. भारत स्वतंत्र होणार अशी चिन्हे स्पष्ट झाली.
९ डिसेंबर १९४६ ला सच्चीदानंद सिंह हे हंगामी अध्यक्ष असलेली घटना समिती तयार झाली. त्या समितीची पहिली बैठक नवी दिल्ली येथील संविधान गृहात झाली. आता ह्याला सेंट्रल हॉल म्हणतात.११ डिसेम्बरला डॉ. राजेंद्रप्रसाद ज्या समितीचे कायम अध्यक्ष आहेत अशा घटना समितीचे कामकाज सुरु झाले. ह्यात ३८९ सदस्य होते. फाळणीनंतर ही संख्या कमी होऊन २९२ झाली.
विविध विषयांवर काम आणि अभ्यास करण्यासाठी १९ उपसमित्या कार्यरत होत्या. संघ अधिकार, संघ सरकार घटना, राज्य सरकार घटना, अल्पसंख्याक व मूलभूत अधिकारविषयक समिती इ. उपसमित्या घटनासमितीचे काम करत होत्या. ह्यातील सर्वात महत्वाची होती ती मसुदा तयार करणारी समिती. तिचे अध्यक्ष होते डॉ. आंबेडकर. मसुदा समितीचे सात सदस्य होते. घटनासमितीने एकूण २ वर्षे ११ महिने १८ दिवस काम केले. ११ सत्रांमध्ये एकूण १६५ दिवस एकत्रित काम चालले. घटनेच्या मसुद्यावर सर्वांगीण चर्चा करण्यात आली.
कच्च्या मसुद्यात २४३ कलमे आणि १२ सूची होत्या. त्यावर बराच विचार विमर्श होऊन मसुदा समितीने घटना समितीसमोर सादर केलेल्या पहिल्या मसुद्यात ३९५ कलमे आणि ८ सूची होत्या.घटना समितीतील सदस्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून त्यात काही दुरुस्त्या सुचवल्या. त्यांची एकूण संख्या होती. ७६३५. पण त्यातल्या काही सूचना परत परत आल्या होत्या. त्यामुळे एकूण २४७३ सूचनांवर विचार झाला. घटना समिती सदस्यांनी चर्चा केली.त्यानंतर घटनेला अंतिम स्वरूप दिले गेले. तेव्हा घटनेत २२ विभाग, ३६५ कलमे आणि १२ परिशिष्टे निश्चित केली गेली.संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले. २६ जानेवारी १९५० पासून घटना अमलात आली आणि भारतीय प्रजासत्ताक (गणराज्य) जन्मास आले.
भारताच्या संविधानातील अनेक तरतुदी वेगवेगळ्या देशांच्या संविधानातून घेतल्या आहेत. त्यांना भारतीय संदर्भात आणि घटनेत कसे उपयोगात आणता येईल ह्याचा विचार करूनच त्या घेतल्या गेल्या. असे म्हटले जाते की मार्गदर्शक तत्वे आयर्लंडच्या घटनेतून घेऊन भारतीय घटनेत समाविष्ट केली गेली. स्वातंत्र्य,समता, बंधुता हे फ्रांस कडून, सर्वोच्च न्यायालयाची यंत्रणा जपानकडून, पंचवार्षिक योजना रशियाकडून घेतली. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी इत्यादि देशांच्या राज्यघटनेतून देखील काही मुद्दे घेतले गेले.
पण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी मात्र आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे आपण भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतली आहेत असे स्पष्टपणे म्हटले आहे. किंबहुना प्राचीन भारतीय संस्कृतीची, अगदी वैदिक काळापासूनची वैशिष्ट्ये आपल्याला संविधानात दिसून येतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता, विचार आणि अभिव्यक्ती यांचा आदर, श्रद्धा, विश्वास, उपासना यांचे स्वातंत्र्य यांना अधिकृतरित्या स्वीकारले गेले. राष्ट्र कधीच एक होऊ नये ह्या कुटील हेतूने परकीय आक्रमकांनी समाजात रुजवलेल्या भेदभावांना तिलांजली दिली गेली. राष्ट्राची एकता आणि एकात्मता पुन्हा एकदा प्रस्थापित केले गेली.

आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, घटना समितीचे सदस्य कोण कोण होते?

लेखिका:- वृंदा टिळक

संदर्भ:-

-https://vishwakosh.marathi.gov.in/30091/

-भारतीय राज्यघटना – एक दृष्टिक्षेप – संपादक – श्री. अरुण करमरकर

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले.संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.
संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा – पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

Back to top button