NewsOpinion

चला.. संविधान साक्षर होउ या!! – भाग ५ .

आजच्या भागात आपण पाहणार आहोत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेविषयी. काय म्हटले आहे उद्देशिकेत?

“आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय: विचार,अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता: निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.”

( ह्यातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द मूळ उद्देशिकेत नव्हते. ते १९७६ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना घातले गेले. )

अप्रतिम अशी ही उद्देशिका (preamble )आपल्याला घटनेतील भाव भावना, उद्दिष्ट्ये, आकांक्षा, हेतू अवघ्या काही ओळीत सांगते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर एक नवा समाज घडवायचा होता. नव्या युगात प्रवेश करत असताना आपला इतिहास आणि संस्कृती विसरायची नव्हती. हे दोन्हीही लीलया साध्य करणारी अशी ही प्रास्ताविका. आपली राज्यघटना, संविधान हे देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाईल, राष्ट्राची अस्मिता जागृत होईल असे आहे ह्याची चुणूक दाखवणारी ही उद्देशिका.
पाठ्यपुस्तकात उद्देशिका दिलेली असते. पण फार लक्ष देऊन वाचली मात्र जात नाही.खरे तर ही उद्देशिका वारंवार वाचली की दरवेळी त्यातून अधिकाधिक अर्थ छटा उलगडत जातात.
काय म्हटले आहे ह्यात? ‘आम्ही भारताचे लोक ‘ ! स्वतंत्र झालेल्या भारतातील नागरिकांनी हे संविधान तयार करून स्वतः प्रत म्हणजे देशाला अर्पण केलेले आहे. कोणीतरी लादलेले हे नियम नाहीत तर आपणच विचारपूर्वक तयार करून अंगिकारलेले हे नियम आहेत. इथे लोकशाहीचा जागर झाला आहे.कसे अर्पण करीत आहेत? तर बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करून! इथे आश्वासन, प्रयत्न असे शब्द न वापरता निर्धार म्हटले आहे. हे करायचेच आहे असा निर्धार व्यक्त होतो आहे.


बंधुता..आपण प्रतिज्ञेत देखील म्हणतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ एकमेकांशी सौहार्दाने, सहानुभूतीने वागणे, एकमेकांच्या मदतीला नेहमी तयार असणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सामील असणे, एकमेकांचे कल्याण व्हावे अशी इच्छा व प्रयत्न करणे म्हणजे बंधुता. बंधुता भारतीय संस्कृतीला नवीन नव्हतीच. अगदी प्राचीन काळापासून विश्वबंधुत्व हे मूल्य भारतात जोपासले जात होते. आता त्या मुल्याला उद्देशिकेत देखील महत्वाचे स्थान मिळाले आहे.
आम्ही सगळे एका साच्यात घडवले गेलेले निर्जीव पुतळे नाही. प्रत्येक जण वेगळा आहे. भारतीय समाजात देखील भाषा, भूषा आणि भोजनात विविधता आहे. तरीही प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता अखंड राखणारी अशी ही बंधुता आहे. आमच्यातील विविधता ही आमची कमजोरी नाही, तर बलस्थान आहे आणि त्या विविधतेमुळे आमच्या एकतेला बाधा येणार नाही असे भारतीय जनता निर्धार पूर्वक सांगते आहे.
असे केव्हा होऊ शकेल? तर जेव्हा प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल, स्वातंत्र्य असेल आणि समानता असेल तेव्हाच अशी बंधुता प्रस्थापित होऊ शकेल.
कोणता न्याय? तर सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. स्वातंत्र्य कशाकशाचे पाहिजे? परकीय सत्तेपासून तर आपण मुक्त झालो, स्वतंत्र झालो. पण आता आपल्याच देशात आपल्याला स्वातंत्र्य हवे आहे ते विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. समानता कोणती असेल तर दर्जाची आणि संधीची समानता असेल.
आपणच तयार केलेली राज्यघटना आणि तिची ही उद्देशिका आहे. व्यक्तिगत, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात आपण कसे वागायचे आहे ह्याचा मार्ग उजळणारा दीप असलेली ही उद्देशिका आहे.त्यामुळे उद्देशिकेतील सर्व उद्देश सत्यात आणायचे असतील तर आपल्यालाही या मूल्यांच्या नुसारच आपले वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय वर्तन ठेवायला लागेल. अन्यथा ही उद्देशिका आणि हे संविधान हे केवळ कागदावरच राहील.

संदर्भ:-

https://legislative.gov.in/constitution-of-india/preamble-to-the-constitution-of-india

https://www.evivek.com

भारतीय गणराज्याचे संविधान (Constitution of India)२६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले. संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा – पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

लेखिका :- वृंदा टिळक

Back to top button