NewsScience and Technology

अग्नि ५ च्या टप्प्यात अर्धे जग…. शेजाऱ्यांना धडकी

शस्त्रास्त्र निर्मितीत आत्मनिर्भर भारताचे दमदार पाऊल

अग्नि ५ च्या यशस्वी चाचणीसह आंतरखंडीय अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र डागू शकणाऱ्या बलाढ्य देशांच्या पंक्तीत भारत दिमाखदारपणे विराजमान. याआधी जगात केवळ रशिया, अमेरिका, चीन , फ्रान्स, ब्रिटन, इस्त्राइल , उत्तर कोरिया या बलाढ्य राष्ट्रांनाच हे शक्य झाले होते.

संरक्षण क्षेत्रातील आपली आत्मनिर्भरता वाढविण्याचा सरकारचा कल,त्यांनी बजेटमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीसाठी केलेल्या तरतूदीतूनच स्पष्ट झाला होता. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था( DRDO ) च्या पाठीशी सरकार आता भक्कमपणे उभे आहे. जास्तीत जास्त शस्त्रास्त्रांची निर्मिती देशातच करून,प्रसंगी ती निर्यात करण्याचीही क्षमता नव्या भारताने ठेवलेली आहे. DRDO आणि ISRO सारख्या संस्था हातात हात घालून सातत्याने अचाट व अतुलनीय प्रयोग यशस्वी करून दाखवत आहेत. आत्मनिर्भर भारताने क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र निर्मितीत दमदार पावले टाकली आहेत.

गुरुवार दिनांक १५ डिसेंबरच्या रात्री दहाच्या सुमारास ओडिसाच्या एपीजे अब्दुल कलाम तळावरून, भारताने आपल्या अग्नी ५ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची नियोजित चाचणी, नवीन तंत्रज्ञान व उपकरणे प्रमाणित करण्यासाठी, रात्रीच्या वेळी केली. अग्नी ५ ने ५००० किलोमीटर वरील लक्ष्य,रात्रीच्या अंधारातही अचूक भेदले. त्यामुळे त्याची night vision क्षमताही सिद्ध झाली.
भारताच्या डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने,हे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) विकसित करण्यात आले आहे. याची मारक क्षमता ५००० किलोमीटर वरून ८००० किलोमीटर पर्यंत वाढवली जाऊ शकते.

संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नि ५ची ही चाचणी नियोजित होती. आधीच्या क्षेपणास्त्रात सुधार करून ,अधिक हलके व नवीन तंत्रज्ञानासह ही प्रमाणित चाचणी रात्री घेण्यात आली. परंतु ९ डिसेंबर रोजी तवांग येथील सीमारेषेवरील चिनी सैनिकांशी झालेल्या धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर ,पुढील सातच दिवसात ही यशस्वी चाचणी झाली. ज्यात चीनची राजधानी बीजिंगसह संपूर्ण चीनच टप्प्यात आल्यामुळे, चीनलाही धडकी भरली.आणि नेहमीप्रमाणे चीनने रडारड सुरू केली. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिआन म्हणाले की, आशियातील शांतता भंग करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कौन्सिल( UNSC )च्या ठराव क्रमांक ११७२ नुसार भारत अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करू शकत नाही.

नव्या आत्मनिर्भर भारताने मात्र आता संरक्षणसज्ज सामर्थ्यवान भारत बनविण्याच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली आहे. अग्नी ५चे पुढील टप्पे भारताला अधिक सामर्थ्यशाली व सक्षम राष्ट्र म्हणून उदयास आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

अग्नि ५ ची वैशिष्ट्ये :-

 • पन्नास हजार किलो वजन , १७.५ मीटर उंच , २ मीटर व्यास
 • दीड टन (१५०० किलो) अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता
 • ५००० किलोमीटर म्हणजे जवळजवळ अर्धे जग याच्या टप्प्यात, क्षमता वाढून ८००० किलोमीटर पर्यंत नेता येईल
 • ताशी २९ हजार ४०१ किलोमीटर वेग म्हणजेच सेकंदाला ८.१६ किलोमीटर वेग
 • ध्वनीच्या २४ पट वेग
 • “लोड करा आणि विसरून जा” इतका अचूक लक्ष्यभेद
 • भारताचे पहिले आणि एकमेव आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे
  Intercontinental ballistic missile ( ICBM)
 • एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी सक्षम
 • Multiple Independent Reentry Vehicle ( MIRV) म्हणजेच बहुउद्देशीय स्वतंत्र लक्षित पुनरागमन वाहनाने सुसज्ज म्हणजे एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदणे शक्य होणार
 • याच्या प्रक्षेपण प्रणालीमध्ये कॅनिस्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे देशात ते कुठेही तैनात करता येऊ शकते. अगदी रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा हमरस्त्यावरूनही डागता येऊ शकते.
 • तीन स्टेज बूस्टर आहे, घन इंधनासह उड्डाण करते
 • हवामानाचा याच्यावर काहीही परिणाम होत नाही
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कोणाच्याही पकडीत /नजरेत येऊ शकत नाही.

अग्नि ५ या क्षेपणास्त्राच्या याआधी झालेल्या यशस्वी सुधारित चाचण्या

१९ एप्रिल २०१२
१५ सप्टेंबर २०१३
३१ जानेवारी २०१५
२६ डिसेंबर २०१६
१८ जानेवारी २०१८
०३ जुन २०१८
२७ ऑक्टोबर २०२१

१९८९ सालापासूनच भारतात अग्नि मालिकेतील क्षेपणास्त्रांवर संशोधन व सुधारणा सुरु आहे

अग्नि १ -७०० किमी २२ मे १९८९
अग्नि २ -२०००किमी ११ एप्रिल १९९९
अग्नि ३ -३००० किमी ९ जुलै २००६
अग्नि ४.-४००० किमी १० डिसेंबर २०१०
अग्नि ५-५००० किमी १९ एप्रिल २०१२

मागील दहा वर्षात अग्नि ५च्या मारक क्षमतेत वाढ करण्याबरोबरच, तो अधिक हलका करण्यात यश आले आहे. येत्या काही वर्षात ,अधिक संशोधन व सुधारणांसह अग्नी ५,हा जगातील सर्वात घातक अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र बनल्यास नवल वाटू नये.
भारताची निती ही नेहमीच प्रथम हल्ला न करण्याची,ही त्याच्या पुर्वासूरींपासूनच राहिली आहे.

अटलजींच्या शब्दात सांगायचे झाले तर :-

गोपाल-राम के नाम पर कब मैंने अत्याचार किए?

कब दुनिया को हिन्दू करने घर-घर में नरसंहार किए?

कब बतलाए काबुल में जा कर कितनी मस्जिद तोड़ीं?

भूभाग नहीं, शत-शत मानव के हृदय जीतने का निश्चय।

हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय !

पण जसे नाग जोपर्यंत त्याच्या वाट्याला कोणी जात नाही तोपर्यंत हल्ला करत नाही, त्याचा केवळ फुत्कारच समोरच्याला धडकी भरविण्यास पुरेसा असतो, तद्वतच भारत केवळ संरक्षण सिद्ध होत आहे आणि ही यशस्वी चाचणी शत्रुला धडकी भरविण्यास पुरेशी आहे.

हा नवीन भारत आहे,

ओतप्रोत आत्मविश्वासाने भरलेला

आत्मनिर्भर भारताची मोहोर जगावर उमटविण्यास सज्ज झालेला..

https://economictimes.indiatimes.com/news/defence/india-successfully-carries-out-night-trials-for-agni-5-nuclear-capable-ballistic-missile/videoshow/96257835.cms

Back to top button