OpinionSpecial Day

“स्वामी विवेकानंद” यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा लोकमान्य टिळकांचा “केसरीमधील लेख”

श्रीस्वामी विवेकानंद हे समाधिस्थ झाले! (८ जुलै १९०२)

श्रीमत्‌ स्वामी विवेकानंद (swami vivekananda) हे कलकत्त्यास गेल्या शुक्रवारी आपल्या बेलूर मठांत समाधिस्थ झाल्याची बातमी ऐकून हिंदूधर्माविषयीं (hindu dharma)कळकळ बाळगणाऱ्या हजारों हिंदूस वाईट वाटल्यावांचून राहणार नाहीं. श्रीमत्‌ विवेकानंद स्वामी यांचें नांव ज्यास माहीत नाहीं असा हिंदू क्वचितच सांपडेल. एकोणीसावें शतक म्हणजे आधिभौतिक शास्त्रांच्या उत्कर्षाचें उच्च स्थान मानलें आहे. अशा प्रकारच्या शतकाच्या उत्तरार्धात हजारों वर्षापूर्वी हिंदुस्थानांत प्रचलित असलेले आध्यात्मिक शास्त्र पश्चिमेकडील राष्ट्रातील विद्वानांस समजून सांगून त्यांच्याकडून सदर शास्त्राच्या अपूर्वतेबद्दल मान्यता मिळविणें आणि ज्या राष्ट्रांत अशा प्रकारचे शास्त्र निर्माण झालें, त्यांतील लोकांबद्दल सहानुभूति उत्पन्न करणें, हे कांहीं लहानसहान काम नव्हे . पाश्चिमात्य आधिभौतिक शास्त्राचा ओघ इंग्रजी विद्येबरोबर इतक्या झपाट्यानें होत होता की, तो परतून लावण्यास असामान्य धैर्यांचा व बुद्धीचा पुरुष उत्पन्न होणें जरूर होतें. थिऑसॉफिकल सोसायटीनें हें काम स्वामी विवेकानंदांच्या पूर्वी सुरू केलें होतें, पण त्यांच्या उद्योगास अस्सल हिंदुत्वाचें स्वरूप स्वामी विवेकानंद यांनींच प्रथम आणिलें, ही गोष्ट निर्विवाद आहे.

अलीकडे आमच्या देशांतील शाळांतून जें शिक्षण मिळतें तें निव्वळ तार्कीक असल्यामुळे धर्मविचारांची विद्यार्थ्याँच्या मनांत जागृति न होतां उलट स्वधर्माचीच नव्हे तर, धर्ममात्राचीहि टवाळी करण्यास ते प्रवृत्त होतात, स्वामी विवेकानंद यांची लहानपणची वृत्ति अशाच प्रकारची होती. हे मूळचे बंगालचे राहणारे असून हल्लीं यांचें वय सुमारे ३५-४० वर्षाचें असावें. म्हणजे त्यास जें शिक्षण मिळालें तें सुमारें २० वर्षाच्या पूर्वीचें होतें वएवढ्यावरून तें कसें होत यांची वाचकांस सहज कल्पना करतां येईल. कारण, कलकत्याच्या इंग्रजी शाळा आणि मुंबई-पुण्याच्या इंग्रजी शाळा बहुतेक सारख्याच प्रकारच्या आहेत, असें म्हटलें तरी चालेल.

स्वामीचें पूर्वाश्रमीचें नांव नरेंद्र सेन(narendra sen) असून हे जातीनें क्षत्रिय होते, व अशी गोष्ट सांगतात कीं,लहानपण्णीच एका जोशानें यांची पत्रिका पाहून ‘हा मुलगा कधीं गृहस्थाश्रम घेणार नाहीं,” असें त्यांच्या आईस कळविलें होते, असो; आपल्या वयाच्या १८-१९ व्या वर्षी हे कलकत्ता युनिन्हर्सिटीची बी.ए.ची परीक्षा पास झाले व तेंव्हापासूनच त्यांस तत्वज्ञानाचा नाद होता. पहिल्या पहिल्यानें यांची प्रवृत्ती नास्तिक मताकडे असे व पुष्कळ धर्मगुरुशीं वादविवाद करताना “तुम्ही आपला देव तरी प्रत्यक्ष पाहिला आहे काय?” असा प्रश्न विचारून हे त्यास कुंठीत करीत असत. पण श्रीमत् रामकृष्ण परमहंस यांची गाठ पडल्या दिवसापासून यांच्या बुद्धींत फरक झाला. आणि ते सदर स्वामीचे अखेर पट्टशिष्य होऊन संन्यासी बनले. श्रीमत् रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र सुप्रसिद्ध असून इंग्रजीत प्रो. मॅक्समुलर यांनी ते लिहून काढले आहे. श्रीमत् रामकृष्ण हे १८८६ साली समाधिस्थ झाले. तेव्हां त्यांचे पश्चात् त्यांच्या अद्वैत मतांचा प्रसार करण्याचे काम त्यांच्या शिष्यशाखेनें पत्करलें, व त्यात विवेकानंदहि सामील होऊन त्यांनी अमेरिकेतील लोकांसहि अद्वैत सिद्धांताची ओळख करून दिली.

स्वामी विवेकानंद यांनी प्रथमतः कांही वर्षे कोणास न कळत म्हणजे आपले स्वरूप प्रगट न करितां हिमालय पर्वतांत सिद्ध लोकांस भेटण्यांस व हिंदुस्थानांतून प्रवास करण्यांस घालविली. या अज्ञात प्रवासांतच ते पुणे मुक्काम सन १८९१-९२ साली आलें होतें; व येथून महाबळेश्वरांस जाऊन तेथून पुढे बेळगांव धारवाडहून मद्रास रामेश्वराकडे गेले. यांस अमेरिकंस पाठविण्याची कल्पना प्रथमतः मद्रासेत निघून तेथील लोकांनी त्यांस साह्य केलें; व सन १८९३ साली शिकागो प्रदर्शनाचे वेळी तेथें जी मोठी राष्ट्रीय धर्मपरिषद झाली त्यांत हिंदुधर्माच्या अद्वैत ज्ञानाची पताका अग्रस्थानी नेऊन लावण्याचे सर्व श्रेय स्वामी विवेकानंद यांजकडे आहे. धर्मपरिषद संपल्यानंतर अमेरिकेत एकदोन वर्षे राहून तेथे त्यांनी अद्वैत मताचा प्रसार केला व त्याचे मठ स्थापन करून तेथे शिष्यसंप्रदायहि सुरु केला.

अमेरिका खंड म्हणजे आज सर्व शास्त्रांचे माहेरघर होय. अशा देशांत ख्रिस्ती धर्मगुरुच्या समक्ष अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन करुन अद्वैत मत प्रचलित करणे हे काम सामान्य पुरुषाच्या हातून निभावणे शक्य नाही. स्वामी विवेकानंद यांचे असे मत आहे की, हिंदुस्थानांतील हिंदु लोकांस हिंदुत्व किंवा हिंदूधर्म हेच काय तें सामान्य बंधन आहे व या धर्मांतील तत्वें इतकीं श्रेष्ठ आहेत की, हिंदुस्थानांतच काय पण दुसऱ्या कोणत्याहि धर्माच्या लोकांत किंवा देशांत १९ व्या शतकाच्या अखेरीसहि त्याचा प्रसार करणे शक्य आहे; इतकेंच नव्हे तर असा प्रसार करणें हिंदुलोकांचे कर्तव्य होय. हिंदु लोकांजवळ जर आतां कांहीं अमोल वस्तू राहिली असली तर तो त्यांचा धर्म होय. तो जर ते सोडतील तर ते आपणांस जगाच्या निदेश व उपहास्यतेस पात्र करून येतील.

आज स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. लोकमान्य टिळकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा केसरीमध्ये लेख लिहिला होता. तो लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. त्या लेखाचे अभिवाचन करून मी युट्यूब वर टाकले आहे. आवर्जून ऐका व आपला अभिप्राय कळवा.
डॉ प्रशांत धर्माधिकारी

हिंदुधर्म काय आहे तो पूरा ओळखा, त्याची तत्त्व काय आहेत. याचा अभ्यास करा. ती शास्त्राच्या कसोटीस लावा आणि जगभर त्याचा प्रसार करून आपले व आपल्या देशाचे नांव चिरस्मरणीय करा, असे उद्गार त्यांच्या मुखांतून अनेक वेळा निघाले आहेत. भक्ति हें धर्माचें मुख्य लक्षण खरे, पण अद्वैत ज्ञानाची त्यास जोड असल्या खेरीज धर्मांचे स्वरूप लंगडे पडते, असे त्यांचे म्हणणे होते. परधर्माविषयी ते जेव्हा बोलत तेव्हां याच तत्त्वावर कटाक्ष ठेऊन बोलत असत. ख्रिस्ती लोकांस तुम्ही ख्रिस्ती धर्म सोडून द्या, असा त्यांनी कधीहि उपदेश केला नाहीं. तुम्ही ख्रिस्तास भजा, परंतु तुमच्या धर्मांत तत्त्वज्ञान नसल्यामुळे आमच्या हिंदूधर्मातील अद्वैत सिद्धांताची त्यास जोड देणे अवश्य आहे. किंबहुना तुमच्या धर्मगुरुनीहि तीच तत्वें स्पष्टपणे नाहीं तर अस्पष्टपणे लक्षांत ठेवून आपापल्या धर्माची रचना केली आहे तसेच ते सांगत असत.

सारांश, ज्ञानयोग, कर्मयोग किंवा राजयोग हे खऱ्या धर्माचे सार्वत्रिक मार्ग असल्यामुळे कोणत्याहि धर्मांशी त्यांचा विरोध नाहीं, इतकेच नव्हे तर, सर्वांनी ते घेण्यासारखे असून हें ज्ञान पिढीजाद ज्यांस प्राप्त झाले आहे त्यांनी याचा प्रसार करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असा ते उपदेश करीत असत. हिंदुस्थानांतील लोकांची धर्माबद्दल हयगय पाहून त्यांचे अंतःकरण तिळतिळ तुटत असे, व धर्माची उन्नती झाल्याखेरीज राष्ट्र वर यावयाचे नाहीं, असा त्यांच्या मनाचा ग्रह झालेला होता; व त्याकरितां त्यांची जिवापाड मेहनत चालू असे. अमेरिकेत शिष्यपरंपरा स्थापून व अद्वैत मताचा प्रसार करून ते इकडे आल्यावर प्रथमतः सिलोनमधून मद्रासेत आले; व तेथून कलकत्यांत व हिमालयांत त्यांचा अलमोरा येथें मठ आहे तेथे गेले. या सफरीत त्यांचा सर्वत्र जयजयकार होऊन त्यांनी दिलेली व्याख्यानेंहि कळकळीची आहेत.

अमेरिकन (america) लोकांच्या सहाय्यानेच त्यांनी कलकत्त्यास हुगळीच्या काठी बेलूरमठ स्थापन करून तेथे आपल्या मताप्रमाणे धर्मोपदेशक तयार करण्याची सोय केली आहे, व मठास जोडून रामकृष्ण परमहंस यांचे समाधी मंदीर बांधले आहे. अलमोरा येथे ‘प्रबुद्ध भारत’ पत्र निघत असे ते त्यांच्याच मित्रमंडळीकडून निघत असे व ९६-९७ सालच्या दुष्काळांत राजपुतान्यांत रामकृष्ण परमहंस मिशनची मंडळी जाऊन ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या हातांत बरीच अनाथ मंडळी पडण्याचे यांनी बंद केले. धर्मोपदेशकांचा जितका भरणा असावा तितका शिष्यसंप्रदाय वाढला नसल्यामुळे हिंदुस्थानांत सर्व ठिकाणी आपले उपदेशक ठेवावे, अशी त्यांची जी इच्छा होती, ती सफल झाली नाही.

तथापि कलकत्ता, अलमोरा, अजमीर , मद्रास वगैरे ठिकाणी त्यांचे उपदेशक असत. व अमेरिकेत एक दोन शिष्य असत. १९०० साली जे पॅरिस येथे प्रदर्शन झाले त्यावेळी सहा महिन्यांत फ्रेंच भाषेचा अभ्यास करून स्वामी विवेकानंद यांनी वेदांत विषयावर तेथें व्याख्यान दिले होते व त्याबद्दल त्यांची तिकडच्या पत्रांतून पुष्कळ प्रशंसा झाली होती. हल्ली वर्षभर हें छातीच्या दुखण्याने अस्वस्थ होते, त्यामुळे जपानांतून यांस निमंत्रण आलें असतांहि तिकडे जाण्यास त्यांस फावले नाही. गेल्या शुक्रवारी नित्याप्रमाणे हे संध्याकाळी फिरून आले व अस्वस्थता वाटल्यावरून शिष्यांस हांक मारून आपण आतां हा लोक सोडून जाणार, असे सांगून त्रिवार दीर्घोश्वास करून समाधिस्थ झाले, असे आम्हांस आलेल्या तारेवरून समजते.

भर तारुण्यांत स्वामी समाधिस्थ होण्याची वेळ यावी हे आमच्या देशाचे मोठे दुदैव होय. श्रीरामकृष्ण परमहंस हे आमच्या इकडील अक्कलकोटच्या स्वामीप्रमाणे पुरे ब्रह्मनिष्ठ होते खरे; पण सर्व जगांतील देशांत अद्वैत मतांची पताका फडकत लावून हिंदुधर्माची अर्थात् हिंदुलोकांची महती सर्व जगभर करून धर्म संस्थापना करण्याचे काम श्री. विवेकानंदांनीच हाती घेतलें होतें व आपल्या विद्वत्तेनें, वक्तृत्वानें उत्साहाने, व कळकळीनें त्या कामाचा पाया त्यांनी भक्कम घातला होता. या पायावर इमारत उभी होऊन तिच्यावरील कळस स्वामी विवेकानंद यांच्याच हस्तानें बसविण्यांत येईल अशी सर्वांस आशा व उमेद होती. पण ती स्वामी समाधिस्थ झाल्यानें आतां नाहींशी होण्याचा प्रसंग आला आहे.

हिंदुधर्माचें उज्वल स्वरूप कोणतें, अशा प्रकारचा धर्म आमच्या देशांत झाला हेंच आमचें अमूल्य धन व बळ आणि त्याचा सर्व जगभर प्रसार करणे हेच आमचें खरें कर्तव्य असे बोलणारे नव्हे तर जगास सिद्ध करून दाखविणारे सत्पुरुष हजारबाराशे वर्षांपूर्वी एक शंकराचार्य होऊन गेले व १९व्या शतकाच्या अखेरीस दुसरे स्वामी विवेकानंद झाले. परंतु स्वामी विवेकानंदांचें काम अद्याप परिपूर्ण व्हावयाचे आहे. व ते त्यांच्या शिष्यवर्गापैकी अगर दुसऱ्या कोणीतरी हाती घेऊन परिपूर्ण करावें, अशी आमची त्यांस विनंति आहे. आमच्याजवळ जर कांहीं महत्त्वाचा ठेवा असेल तर तो आमचा धर्मच होय. आमचें वैभव, आमचें स्वातंत्र्य सर्व काही लुप्त झालें आहे. परंतु आमचा धर्म आमचेपाशीं शिल्लक आहे; व तो असा नव्हे तर सुधारलेल्या राष्ट्रांत उघड रीतीने कसोटीस लावला असतांहि त्याचा कस शुद्ध व उत्कृष्ट येतो, हे आतां अनुभवास आलेलें आहे. अशा स्थितीत जर आम्हीं त्यास सोडून देऊं तर इसाबनितीतील कोंबडयाप्रमाणे आम्हीं रत्नपारखी आहों अशी आमची सर्व जगभर नालस्ती होईल, हे लक्षांत ठेविलें पाहिजे.

हल्लींचा कालच असा आहे की, आपल्याजवळ कोणतीहि उत्तम वस्तू असली तर जगाच्या चढाओढीच्या बाजारांत ती मांडून तिची योग्यता स्थापन केली पाहिजे. स्वामी विवेकानंद यांनी हे काम केले होते. आणि आमच्या सुदैवाने आणखी काही दिवस ते वांचते तर राष्ट्राला राष्ट्रीयत्व येण्यास जें कांहीं तेज लागतें तें थोडें बहुत तरी त्यांच्यापासून आम्हास प्राप्त झालें असतें, असो; त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांस उत्तम गती प्राप्त होईल यांत शंकाच नाहीं; पण त्यांनी जें आम्हावर उपकार करून ठेवले आहेत त्याची उतराई होण्यास त्यांनी घालून दिलेलाच धडा आम्हांस गिरविला पाहिजे, हें उघड आहे. करितां त्यांच्या चरित्रावरून अशा त-हेची उत्तरोत्तर लोकांची प्रवृत्ति होवो आणि सर्व धर्माचे अद्वैत मतांत एकीकरण करण्याचे श्रेय आमच्या ऋषींच्या अर्वाचीन वंशजास प्राप्त होवो, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून स्वामी विवेकानंद यांचें हें स्वल्प चरित्र येथें समाप्त करतों.

अमेरिकेतून परत आल्यावर पुण्यास येण्याबद्दल स्वामींना दोन तीन आमंत्रणे केली होती. पण एकदां स्वामी आजारी असल्यामुळे व दुसऱ्या वेळीं कांहीं अन्य कारणांमुळे स्वामींची व्याख्यानें प्रत्यक्ष ऐकण्याचा योग पुणेकरांस आला नाहीं हें मोठे दुर्दैव होय.

Back to top button