CultureNews

“भारत” नावाचा इतिहास..

bhartiya culture

जियें तो सदा इसी के लिए, यही अभिमान रहे यह हर्ष ।
निछावर कर दें हम सर्वस्व, हमारा प्यारा भारतवर्ष ।।

– जयशंकर प्रसाद

दिल्लीत होणाऱ्या जी 20 (G-20) देशांच्या परिषदेत सहभागी होणाऱ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहभोजनाचे निमंत्रण पाठविले आहे. त्या निमंत्रणात राष्ट्रपतींचा उल्लेख ” प्रेसिडेंट ऑफ भारत” (president of bharat draupadi murmu) असा केला आहे. त्यावरून संबंध भारतात साधक-बाधक चर्चा सुरु झाली आहे… चला तर मग जाणून घेऊया भारत नावाचा इतिहास..

भारतीय संस्कृती..

भारतीय संस्कृती (bhartiya culture) जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीला विश्वातील सर्व संस्कृतींची जननी मानले जाते. जगण्याची कला असो किंवा विज्ञान आणि राजकीय क्षेत्र असो , भारतीय संस्कृतीचे सदैव अढळ स्थान राहिले आहे. अन्य देशांच्या संस्कृती काळानुसार नष्ट होत राहिल्या परंतु भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून आपले परंपरागत अस्तित्व टिकवून आहे.

विविधतेतून एकता हे भारताचे वैशिष्ट राहिले आहे. हिमालय पर्वत पूर्ण देशाचे गौरवाचे प्रतिक आहे. गंगा, यमुना, नर्मदा सारख्या नद्यांना माता मानले जाते. राम, कृष्ण, शिव यांची आराधना युगानुयुगे केली जाते.सर्वांमध्ये भाषेची विविधता आहे; पण संगीत, नृत्य, नाटके यांच्या मूलभूत स्वरूपांमध्ये कमालीची समानता आहे. भारतीय संस्कृती प्रेम, सन्मान, दुसऱ्यांच्या भावनांचा आदर या गुणांनी समृद्ध आहे.

भारतीय संस्कृती एक महान जीवनधारा आहे जी प्राचीन काळापासून सतत प्रवाहित आहे.जेथे ठायीठायी विविधता आढळून येते. भारतात जवळपास १६५० बोलीभाषा वापरत आहेत. परंपरा, धर्म आणि भाषा वेगवेगळ्या असून सुद्धा लोक इथे एकमेकांचा आदर करतात. अश्या या आपल्या भारताबद्दल प्रत्येक भारतीयाला नितांत आदर आहे, पण एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, ‘आपल्या देशाला भारत का म्हणतात?’

महाभारत आणि चक्रवर्ती राजा भरत :

महाभारतानुसार (mahabharat) आपल्या देशाला भारतवर्ष हे नाव, चक्रवर्ती राजा भरत याच्या नावावरून पडले. राजा भरत हे भरत राजवंशाचे संस्थापक आणि कौरव आणि पांडवांचे पूर्वज होते. ते दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचे पुत्र होतं. भरताने संपूर्ण देशातील राज्ये जिंकून एका संघटीत साम्राज्याची स्थापना केली होती, म्हणून त्यांच्या संपूर्ण साम्राज्याला भारतवर्ष अशी ओळख मिळाली.

विष्णू पुराणामध्येही याबद्दलचे दाखले मिळतात. विष्णू पुराणानुसार आपल्या देशाला भारतवर्ष नाव तेव्हा देण्यात आले जेव्हा भरतच्या वडिलांनी आपला संपूर्ण राजपाट आपल्या मुलांच्या स्वाधीन करून संन्यास घेतला आणि ते जंगलात निघून गेले.

विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आढळतो. तो असा-

उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।

या श्लोकाचा अर्थ ,

“समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेल्या भूमीला भारताची भूमी म्हणतात आणि भारताच्या या पवित्र भूमीवर राहणाऱ्या लोकांना भारतीय म्हणतात.”

भारताच्या भूमीबद्दल अधिक तपशीलवार बोलायचे झाल्यास, काश्मीर ते कन्याकुमारी आणि सिंधू नदीपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंतच्या भूमीला, जी हिमालय पर्वतरांगांच्या दक्षिणेपासून सुरू होते अश्या हिंद महासागराच्या उत्तरेस असलेल्या सर्व भूभागाला भारत म्हणतात.भारताच्या भूमीत राहणारे सर्व रहिवासी भारतीय आहेत.

भरताच्या साम्राज्यामध्ये म्हणजेच भारतवर्षामध्ये आजचे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, इराण, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गीस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, उत्तर-पश्चिम तिबेट, नेपाळ आणि बांग्लादेश सर्व समाविष्ट होते.

“भारत” नावाचा अर्थ..

“भा” या संस्कृत शब्दाचा अर्थ “तेज” “तेजस्विता” “द्युतीमानता” असा आहे फार सुरेख अर्थ आहे तो जसा भास्कर तो सूर्य “रत” म्हणजे रममाण झालेला म्हणजे त्या तेजास्वीतेत, त्या द्युतीमानतेत रममाण झालेला देश असा जो तो आपला देश “भारत”.

राज्यघटनेतील भारत :-

भारताची घटना (bhartiya constitution) तयार करताना आपल्या संस्कृतीची, परंपरेची, ऐतिहासिक वारशाची आणि सभ्यतेची ओळख प्रतिबिंबित व्हावी ही धारणा प्रबळ होती. भारतीय संस्कृतीची ओळख पटवणारी अशी अनेक उदाहरणे संपूर्ण भारतीय राज्यघटनेत जागोजागी दिसतात. यात रामायण, महाभारतातील, तसेच गौतम बुद्ध यांच्या चित्रांचा समावेश आहेत. त्याच प्रमाणे आपल्या देशाचे ऐतिहासिक नाव पुनः स्थापित व्हावे याचा देखील प्रत्यय घटना सभेतील चर्चेवरून दिसून येतो. आपल्या देशाचे नाव India that is Bharat असे ठेवण्यामागे संविधान सभेत देखील सविस्तर चर्चा झाल्याची आपणास पाहावयास मिळते.

सेठ गोविंद दास यांनी देशाचे नाव भारत असेच असावे आणि त्यासाठी सभागृहाचे एकमत व्हावे असे मत प्रदर्शित केले. कला वेंकट राव यांनी “भारत” या नावाचे स्वागत करीत, भारत या नावाचे ऋग्वेदातील, तसेच वायू पुराणातील संदर्भ दिले.हर गोविंद पंत यांनी भारताच्या पुरातन, इतिहासाचे वर्णन करीत असताना सांगितले की “जंबूद्वीपे भारत वर्षे, भारत खंडे, आर्यावर्ते…” असे आपल्या स्थानाचा उल्लेख प्रत्येक भारतीय नैमित्तिक कर्मे करताना करतो. याचाच अर्थ की भारत या नावाचा उल्लेख पुरातन काळापासून या भूमीवर होतो आणि तो सर्वमान्य आहे.

भारताच्या जाज्वल्य इतिहासाची, संस्कृतीची मापदंडांची चर्चा होऊन “इंडिया, दॅट इज भारत” म्हणजेच “भारत” या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आणि अशा या पुरातन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारताच्या लोकांनी राज्यघटना लिहिली जिचा आपण सर्वांना सार्थ अभिमान आहे.

सिंधू ते इंडिया..

मुख्य न्यायमूर्ती गजेंद्रगडकर आणि इतर चार न्यायमूर्ती यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठाने १४ / १/ १९६६ रोजी ‘हिंदू धर्म’ या विषयावर एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला की, “हिंदू हा धर्म नसून जीवनपद्धती आहे”.त्यातील वाक्य खाली देत आहे :-

“The view generally accepted by scholars appears to be that the word ‘Hindu’ is derived from the river ‘Sindhu’. The Persians pronounced this word as ‘Hindu’. The Greeks who probably gained their first ideas of India from the Persians, dropped the hard aspirates and called the Hindus “Indoi”.

या वरून असे दिसते की, पर्शियन लोकांनी ‘सिंधू’चे ‘हिंदू’ केले आणि ग्रीकांनी ‘हिंदू’चे ‘इंदोई’ केले आणि त्याचे पुढे ‘इंडिया’ झाले.

भारत आणि इंडिया ही दोन्ही नावे आपल्या देशाची नावे म्हणून भारतीय राज्यघटनामान्य आहेत आणि या पैकी कोणतेही नाव जर राष्ट्रपती वापरत असतील तर त्यात वावगे ते काय? खरे तर, जर देशातील शासन इंडिया या नावाएवेजी “भारत” असा नामोल्लेख करीत असेल तर खऱ्या अर्थाने या अमृतकाळात आम्ही परकीय दुष्ट चक्रातून बाहेर पडून, घटनाकारांनी प्रतिपादित केलेल्या मूल्यांचेच संवर्धन आपण करीत आहोत.हे निश्चित..

भाग्यसूर्य तळपत राहो, बलसागर “भारत” होवो, विश्वात शोभुनी राहो..

Back to top button